जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचे पाहिले पाऊल कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.
पश्चिम बंगालच्या निकालावरुन कालपासून भाजपाला लक्ष करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना चोख प्रत्त्युत्तर देताना ते बोलत होते. भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरे आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपाकडेच आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली.
पंढरपुरात काय झाले?
पंढरपुरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असा प्रकार म्हणतात. नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का? असा सवालही त्यांनी केला.
नाना पटोलेंचे आयुष्य कालाकांडीत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आयुष्यच कालाकांडीच्या कामात गेले. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. माहितीविना बोलणे म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद, अशी टीकाही शेलार यांनी केली.
पुनावालांना धमकी देणाऱ्यांची माहिती आमच्याकडे
अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपले कामे चोख केले आहे. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यात गैर काय? आज यावर राजकारण करायचे नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांना उघडे करण्याचे काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहितीसुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार राहवे, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांचा इशारा गर्भितच
देवेन्द्रजी कोणतीही वाक्ये वापरतात त्याचा गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे त्यांनी पंढरपुरात केलेले विधानही गर्भितच होते, असेही शेलार म्हणाले.
महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे. ज्यावेळी आम्ही बोलत असलेल्या भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा पाचही बोटे राष्ट्रवादीकडे जातात. भाजपाच्या नेत्यांविषयी, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याविषयी, राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्याविषयी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सभेमध्ये, सोशल मीडियावर काय बोलत आहेत हे एकदा पाहा. अजूनही आम्ही संयमाने वागत आहोत, हे लक्षात ठेवा. आमची भूमिका स्पष्ट आहे, जनतेला मदत करणे. सर्व नेते राज्यातील जनतेला आधार वाटावा यासाठी फिरत आहेत. आम्ही योग्य वेळी धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

