Homeकल्चर +त्यागराज खाडिलकर यांना...

त्यागराज खाडिलकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार प्रदान

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला.

कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे हा कार्यक्रम साजरा होत आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते आणि कविता पौडवाल-तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या मुंबईतल्या खार येथील निवास्थानी खाडिलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, अरुणजी स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे म्युझिशिअन-संगीतकार होते. त्यामुळे कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्त्व आहे. आजचा हा २७वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या-ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहित आहे अशा कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे. काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता. अशा मुलांसोबत केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे, असं मला वाटतंय. इतकं सुंदर संगीत आणि संयोजन करून त्यांनी पूर्ण न्याय दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टला पुढे आणावं ही गोष्ट, ही कल्पना फार महत्त्वाची आहे. त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना त्यागराज खाडिलकर म्हणाले की, माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. गेल्या २६ वर्षांतील पुरस्कार्थींची यादी पाहिल्यावर खरंतर मी थरारून गेलो. अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या यादीमध्ये माझीही नोंद झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरुणजींच्या संगीताचे आणि संगीतसंयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतातसुद्धा. या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात. त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते.. ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे.

हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानीस्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याच वेळी ‘स्वरकुल ट्रस्ट’तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बममधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांनादेखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिला.

याप्रसंगी त्यागराजजींनी दिव्यांग गायकांच्या हिंदी अल्बमची,तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत ‘भजनगंगा’ या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अरुण पौडवाल यांचे निस्सीःम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी केले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content