Homeपब्लिक फिगरबारसूतल्या उपऱ्यांची सुपारी...

बारसूतल्या उपऱ्यांची सुपारी घेऊन मला विरोध करता?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथे आपल्याला विरोध करण्यासाठी तुम्ही कोणाची सुपारी घेऊन येत आहात? ज्या उपऱ्यांनी तेथे जमिनी घेऊन भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवायचे ठरवले आहे, त्यांची सुपारी घेऊन तुम्ही मला विरोध करत आहात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरीचा एक चांगला प्रकल्प येत आहे, असे मला आता मोर्चे काढणाऱ्या लोकांकडून सांगण्यात आले होते. तसा आग्रह झाल्यामुळे मी केंद्र सरकारकडे या रिफायनरीसंदर्भात पत्र दिले होते. पण पत्र दिले होते याचा अर्थ पोलिसी बळ वापरून तो राबवा असा होत नाही. माझे सरकार पाडल्यानंतर सर्व चांगले प्रकल्प गुजरातला गेले. याचा अर्थ राख इकडे आणि रांगोळी तिकडे असे समजायचे का? हा प्रकल्प इतका चांगला असेल तर लोकांसमोर त्याचे सादरीकरण करा आणि त्यांचे गैरसमज दूर करा. नाहीतर हा प्रकल्प तरी दूर करा. डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेण्याचे कारण काय, असा सवालही  त्यांनी केला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजून अंतिम झालेला नाही. तो निर्णय झाला की मग त्यावर भाष्य करीन. त्यांनी तसा निर्णय घ्यावा की नाही हा त्यांचा अंतर्गत भाग आहे. मी त्यांना सल्ला देणारा कोण? आणि माझा सल्ला उद्या त्यांनी मान्य केला नाही मग काय करणार, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी जरी राजीनामा दिला तरीही महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. माझ्याकडून महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसने बजरंग दलाचा उल्लेख केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीचा उल्लेख केला. मला समजत नाही की काँग्रेस आणि भाजप यांना बजरंगाचे बळ कशाला पाहिजे? त्यांच्या स्वतःमध्ये बळ नाही का असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात बजरंग बलीचा उल्लेख करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता. आता मोदी जे शब्दप्रयोग करत आहेत ते पाहता निवडणूक आयोगाच्या कायद्यात काही बदल झाले असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपला विरोध पंतप्रधान मोदी या व्यक्तीला नाही तर त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला आहे आणि भाजपच्या या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये सर्व पक्षांनीच नव्हे तर जनतेनेही एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी काही भाष्य करण्यास नकार दिला. मी केलेले काम जनतेसमोर आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. पवार यांनी लोक माझे सांगाती, या आत्मचरित्रपर पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून फक्त दोन दिवस मंत्रालयात जाणे हे आम्हाला मान्य नाही, असे म्हटले आहे.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content