जी भाषा उद्धव ठाकरे बोलतात, शरद पवार बोलतात तीच भाषा आज जरांगे पाटील बोलत आहेत. त्यांची भाषा राजकीय आहे. डोळ्यासमोर निवडणुका दिसत असल्यामुळे राजकीय पोळ्या भाजण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की कायदा सर्वांना सारखाच असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मर्यादेतच राहवे. सरकारने बराच संयम ठेवला आहे. आमच्या संयमाचा कोणी अंत पाहू नये, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री एका पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानांमुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची फूस असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जरांगेंच्या मागे कोण आहेत याची माहिती आमच्याकडे आहे. सर्व परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्ही दिले आहे. हे आरक्षण टिकण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेण्याऐवजी ते टिकणार नाही.. टिकणार नाही असे सांगत जनतेत संभ्रम पसरवण्याचे काम काही जण करत आहेत. पण हे आरक्षण कसे टिकणार नाही हे कोणीही सांगत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सागर बंगल्यावर कोणीही यावे – फडणवीस
त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सागर, हे शासकीय निवासस्थान सरकारी असून त्यावर कोणीही येऊ शकते, असे स्पष्ट केले. जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहे हे आम्हाला माहित आहे. योग्य वेळी त्याचा खुलासा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी फक्त चार महिन्यांचा अर्थसंकल्प – अजित पवार
यावेळी निवडणुका असल्यामुळे फक्त अंतरीम अर्थसंकल्प माडला जाणार आहे. यात फक्त चार महिन्यांच्या खर्चासाठी मान्यता घेतली जाणार आहे. नियमित अर्थसंकल्प जुलै महिन्यात मांडला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली. मराठा समाजाने संयम पाळावा आणि काही नेते बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांनी स्वतःला आवर घालावा. कायदा सर्वांना सारखा असतो, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील माघारी
सरकारने काल घेतलेल्या या भूमिकेनंतर लगेचच पोलिसांनी आंतरवाली सराटी तसेच त्याच्या आसपासच्या गावांमध्ये जमावबंदी लागू केली. मुंबईतही जमावबंदीचे आदेश जारी आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच जालना जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. एकूण परिस्थितीचा अंदाज घेत मनोज जरांगे पाटील यांनीही मुंबईकडे निघण्याचा निर्णय मागे घेत पुन्हा आंतरवाली सराटी गाठले. आपल्या समर्थकांनी आपापल्या मुक्कामी जावे, पुढचा निर्णय घेईपर्यंत कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य कोणीही करू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार
राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारकडून बोलाविण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. राज्याला उद्धवस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी आम्ही होणार नाही, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँगेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयात रिल बनवतात. पुण्यात 200 गुंडांची परेड होते. त्यानंतर पुण्यात 2200 कोटींचे ड्रग सापडते, तरी सरकार गप्प आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांना गुंड जुमानत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलीसठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करून राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनीविषयी काहीही बोलले तरीदेखील सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला.