आदित्य ठाकरे निवडणुका घेण्याच्या वल्गना करतात. त्यांना हरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कुणा नेत्याची गरज नाही. कुणीही कार्यकर्ता त्यांना हरवू शकतो. त्यासाठी मला येण्याची गरज नाही. जे आपली पार्टी सांभाळू शकले नाहीत त्यांच्याविषयी काय बोलायचे? अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
चेंबूर येथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. प्रविण दरेकर, कालिदास कोळंबकर, कॅप्ट. तमिळ सेल्वन, प्रसाद लाड, राजेश शिरवडकर, निरंजन उभारे, श्वेता परुळकर, श्रीनिवास शुक्ला, विलास आंबेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईतील दक्षिणमध्य मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भाजपने नेहमी युतीचा धर्म पाळला आहे. त्याबरोबरच संघटन मजबूत करण्यावरही भर दिला आहे. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर लोकप्रिय नेतृत्त्व आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे. देशाला तोडण्याचे काम करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे. कोरोना काळात मोदींनी अर्थव्यवस्था वाचवण्याचे काम केले असेही ठाकूर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे शानदार बजेट सादर केले आहे. समाजातील सर्वच घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारताची पायाभरणी करणारे यंदाचे बजेट आहे. रेल्वेचे २०१४च्या तुलनेत नऊपट बजेट वाढले. काँग्रेस सरकारच्या काळात ११७१ करोड महाराष्ट्रासाठी मिळत होते. आज १३ हजार ७०० करोड एका वित्तीय वर्षात महाराष्ट्रासाठी देण्यात येणार आहे. काँग्रेसने दिलेल्या निधीपेक्षा महाराष्ट्राला साडे अकरा पट अधिक निधी मिळाला आहे. कोविड काळात लघु उद्योगांना मदत करण्यात आली. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुरळीत झाली. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. परकीय गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील अशा योजना येत आहेत. गरिबांना मोफत धान्य पुरवण्याचे काम मोदी सरकारने केले. रस्ते विकासात १४०३ प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाले. महाराष्ट्रातील शहरांसाठी २०१५पासून १५३६ प्रकल्प मंजूर झाले आहेत. मेट्रोला भरघोस निधी आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला दिल्या. महिला आणि युवकांच्या आर्थिक सक्षमकरणासाठी निधीची तरतूद केली आहे. एकूणच सर्वच घटकांच्या विकासाचा विचार मोदी सरकारने केला आहे, असेही ते म्हणाले.

