अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वीच साजरी झाली. “साहित्यरत्न लोकशाहीर” हे बिरूद अण्णाभाऊ साठे यांनाच शोभून दिसतं. सगळ्यांनाच अचंबित करणारा आणि थक्क करून सोडणारा त्यांचा जीवनप्रवास आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात, वाटेगाव येथे अण्णाभाऊ यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला. भाऊराव आणि वालबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या अण्णाभाऊ (म्हणजेच तुकाराम- मूळ नाव) यांनी आपल्या आयुष्यात फक्त दीड दिवस शाळा शिकली. अण्णाभाऊ यांनी आपल्या आयुष्यात दोन लग्न केली. त्यांना एकूण तीन अपत्ये झाली.
सुरुवातीच्या काळात साम्यवादी विचारसरणीचा पगडा त्यांच्या साहित्यावर होता. मात्र, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी त्यांना मोहिनी घातली. अण्णाभाऊ यांनी अस्सल ग्रामीण ढंगातील आपल्या आगळ्या शैलीत विपुल लेखन केले. १९६१ साली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या सहा कादंबऱ्यावर सहा मराठी चित्रपट निघाले. वैजयंता कादंबरी– वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा कादंबरी– आवडी, डोंगरची मैना कादंबरी- माकडीचा माळ, मुरळी मल्हारीरायाची कादंबरी– चिखलातील कमळ, वारणेचा वाघ कादंबरी– वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा कादंबरी– अलगूज, फकिरा कादंबरी– फकिरा, यावरूनच त्यांच्या साहित्याच्या लोकप्रियतेची सहज कल्पना येते. त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी आणि जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने “अष्टाक्षरी” काव्य प्रकारातून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा एक प्रयत्न आहे.
अण्णाभाऊंनी कामगारलढ्यात असताना “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली”… ही छक्कड लिहिली. “छक्कड” म्हणजे लावणीचा प्रकार आहे. त्या काळात ती रचना तुफान लोकप्रिय होती. शाहीर विठ्ठल उमप यांनी ती गायली आहे. सुलतान, वैर, फरारी, मथुरा, आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळवणारी “फकीरा” ही कादंबरी म्हणजे मैलाचे दगड आहेत. वारणेचा वाघ, माकडीचा माळ, रानगंगा रानबोका, या अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या साहित्यकृती विशेष म्हणजे वारणेचा वाघ हा सिनेमाही त्याकाळी तुफान गाजला होता. “अकलेची गोष्ट” हे लोकनाट्य तर “पुढारी मिळाला” हे वगनाट्य अण्णाभाऊ यांच्या चतुरस्त्र लेखणीची साक्ष देतात. कथा, कादंबरी, लोकनाट्य (वगनाट्य) या मधील गण, गवळण, बतावणी, रंगबाजी आणि वग या लोककला प्रकारातील त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या लेखणीला जबरदस्त धार आली होती. अशा बहुरंगी आणि अशिक्षित असूनही वंचितांची, शोषितांची आणि दलितांची दुःखे जगासमोर मांडून त्यावर परखड भाष्य करणारा साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नवोदितांसाठी पथदर्शी आहे. असा हा थोर साहित्याचा उपासक १८ जुलै १९६९ रोजी निजधामास निघून गेला. त्यांच्या साहित्याचे जमेल तितके वाचन प्रत्येकाने करायला हवे. कष्टातून आणि विषमतेतून आलेल्या अनुभवाने बावनकशी साहित्य निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने मनोभावे वंदन करुया….!!!
अष्टाक्षरी मध्ये अण्णाभाऊ साठे यांची निवडक ग्रंथसंपदा आणि त्यांनी हाताळलेले साहित्यप्रकार गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखणीचा सुलतान
दिली साहित्याची फुले
दूर सारूनिया काटे
होता जाणता शाहीर
नाव अण्णाभाऊ साठे
घाटी भाषेचाच बाज
शब्द होते दावणीला
बहु पोवाडे लिहिले
फुलविले लावणीला
शाहिरीच्या शब्दांवर
होती अचाट पक्कड
कामगार हलविला
त्यांनी लिहून “छक्कड”
लेखणीचा “सुलतान”
वैर, फरारी, मथुरा
होतं बीज विद्रोहाचं
असा भन्नाट “फकीरा”
ब्रिटिशांची धावपळ
नाही लागलाच माग
त्याचा दरारा तुफानी
मर्द “वारणेचा वाघ”
असा अजब लेखक
उपसला सारा गाळ
कधी वाचून पाहावा
त्याचा “माकडीचा माळ”
“रानगंगा”, “रानबोका”
ढंग ग्रामीण अस्सल
होता नादखुळा गडी
नाही कुणाची नक्कल
पाहा अकलेची गोष्ट
लोकनाट्य बहुरंगी
मग पुढारी मिळाला
कलाकार बहुढंगी
आई वालबाई त्यांची
बाप असे भाऊराव
कष्ट करुनी खेळला
गरिबीशी लपंडाव
मोठी साहित्य संपदा
नीट करावे वाचन
अशा थोर मानवाचे गुण गाई गजानन