Homeमाय व्हॉईसशरद पवार, उद्धव...

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खंजिर!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जातील तिथे एकच सांगत आहेत की, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. कार्यकर्त्यांशी त्यांनी परवा सवला जबाब केले: “पाठीत खंजिर खुपसणे, असे म्हणताच पूर्वी एकच चेहरा समोर येत होता. तो कोणाचा होता?” यावर श्रोत्यांमधून सहाजिकच उत्तर दिले जाते की ‘शरद पवारांचा!’.. दादा पुढे म्हणतात की, “आता, अलिकडे पाठीत खंजिर खुपसणे या वाक्प्रचारासाठी दुसरा एक चेहरा समोर येतो. तो कोणाचा?” त्यावर शेजारीच बसलेले नेते म्हणतात, ‘उद्धव ठाकरेंचा!’..

चंद्रकांतदादांनी ही पक्षाची नवीन ऱणनीती ठरवलेली दिसते. महाराष्ट्रभर ते हीच टेप लावत सुटले आहेत की, “शिवसेनेने आमच्या पाठीत खंजिर खुपसला आणि छप्पन्न आमदार असणारे नेते मुख्यमंत्री बनले..” 105 आमदार पाठीशी असूनही देवेन्द्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत. हा भाग ते बोलत नसले तरी त्यांना तेही ठसवायचे असते. भाजपा प्रदेशाध्यक्ष असेही सांगत आहेत की, “भाजपा आता स्वतःच्या पायावर मजबूत होत चालली आहे. ज्यांनी मोदींच्या नावाने आणि पाच वर्षे उत्तम चाललेल्या भाजपा राज्याच्या जोरावर मत मिळवली आणि ५६वर मुख्यमंत्री झाले, ५४वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसूलमंत्री झाले. अशा विश्वासघातक्यांबरोबर आम्हाला कामच करायचं नाही.” त्यामुळे यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये जे मित्रपक्ष प्रामाणिकपणाने सोबत करत आहेत त्यांना सोबत घेणार, अन्य कुणालाही सोबत न घेता आपण निवडणुका लढवायच्या व जिंकायच्या आहेत असेही दादा म्हणतात.

हे प्रामाणिक मित्रपक्ष कोणते? तर, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे. अशा सगळ्यांना बरोबर घेऊन भाजपा एकट्याच्या जिवावर पुढच्या सर्व नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, विधानसभा आणि लोकसभेच्याही निवडणुका लढवणार आणि जिंकणार असा त्यांचा निर्धार आहे. या मित्रांच्या यादीमध्ये अद्यापी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश केलेला नाही. पण मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपा मनसेचा हात हाती घेणार अशी चिन्हे आहेत. मुंबई मनपाच्या सत्तेच्या पोपटातच शिवसेनेचा जीव आहे, म्हणून त्यांना झटका देण्यासाठी मुंबई मनपा जिंकणारच असेही दादांचे म्हणणे आहे.

शरद

यापुढच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचा समावेश अजिबात करणार नाही अशाही घोषणा ते सध्या वारंवार करत आहेत. यापैकी शिवसेनेच्या बाबतीत भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सध्या काहीच बोलत नाहीत. सेनेबरोबरची चर्चेची दारे बहुधा त्यांना बंद करण्याची इच्छा सध्या नसावी. नारायण राणेंनी जेव्हा ठाकरेंवर हल्ले चढवले आणि त्यासाठी मग शिवसेनेच्या तक्रारींवरून राणेंच्या विरोधात पोलिसांनी अटकेच्या कारवाया केल्या तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नाराजी प्रकट केली. पक्ष राणेंच्या विधानांशी जरी सहमत नसला, तरी राणेंच्या पाठीशी मात्र ठामपणाने राहणार हे देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले. शाहांनी व मोदींनीही नारायण राणेंची विचारपूस केली. असे जरी असले तरी शिवसेना नेते संजय राऊत मधूनमधून भाजपाबोरबर शिवसेनेची युती पुन्हा होऊ शकते असे सुचवत असतात.

परवा पुण्यात बोलताना हे ठाकरे सरकार आहे अशी गर्जना करत राऊतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर दुगाण्या झाडल्या. पण त्याचवेळी भाजपालाही सेनेचीच गरज लागते असेही राऊत म्हणाले. आता या वाक्याचा अर्थ काय लावायचा, त्याच्या चिंता काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. फडणवीसही सेनेच्या बाबतीत तीव्र स्वर लावताना दिसत नाहीत. पण मग दादा पाटील सेनेला टोचून व चिडवून बोलत आहेत ते का, असाही प्रश्न तयार होतो. भारतीय जनता पक्ष हा असा एक पक्ष आहे की जिथे सहज वा उत्फूर्तपणाने काहीही बोलले वा केले जात नाही. प्रत्येक बोलणे चर्चा होऊन, वर्तुळात नीट ठरल्यानुसारच बोलले जाते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणूनच भाजपाचे प्रवक्ते एकाच पद्धतीच्या प्रतिक्रिया देत असतात. पण पाठीत खंजीर खुपसण्यासारखी तीव्र आणि कर्कश्श भाषा जेव्हा प्रांताध्यक्ष वापरतात तेव्हा ती नक्कीच ठरलेल्या व सर्व नेतृत्त्व स्तरावर मान्य झालेली अशीच भाषा मानावी लागेल.

शरद

पाठीत खंजीर हा प्रकार 1978-79पासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकत आहोत. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले, त्याचा संदर्भ या खंजीर प्रकरणाला आहे. काँग्रेस एस व काँग्रेस आयचे ते संयुक्त सरकार, आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत आले होते. देशात सर्वत्र जनता पार्टीचे आमदार अधिक संख्येने आलेले असताना महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन्ही गटांची सदस्यसंख्या अधिक होती. काँग्रेस आयचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांच्याकडे गृहखाते होते व कृषीमंत्रीपद संभाळणाऱ्या शरद पवारांकडे जुने काँग्रेसवाले हे सरकार टिकणे कसे घातक आहे हे दररोज सांगत होते. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा आशिर्वाद घेऊन दादांचे सरकार पाडायला हवे, त्याला पर्याय नाही, असे पवारांकडे काही नेते दररोज सांगत होते. पण दादांच्या कानी अशा गोष्टी जरी पडत असल्या तरी शरद मला दगा देणार नाही असेच दादा म्हणत राहिले. आणि एक मार्च 1978ला विधानसभेचे कामकाज सुरू होत असताना शरद पवारांच्या सवंगड्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले. दुसऱ्याच दिवशी पुरोगामी लोकशाही आघाडी नावाचे जनता पार्टी व फुटीर शरद पवार काँग्रेसचे सरकार सत्तेत आले.

या सरकारमध्ये पूर्वाश्रमीचे जनसंघाचे उत्तमराव पाटील जसे होते तसेच समाजवादी सदानंद वर्देंसारखे नेतेही होते. त्या राजकीय उत्पाताने पोळलेले दादा म्हणाले होते की, शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. त्या वाक्याने पवारांची पाठ नंतर कधीच सोडली नाही. खरेतर पुढच्या सात-आठ वर्षांतच दादा व पवारांचे सबंध पूर्ववत चांगले झाले. दोघांनी मिळून अ. र. अंतुलेंचे राज्य संपवले. आणि दादांच्याच आशिर्वादाने पवारांना राजीव गांधींनी 1986मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन मुख्यमंत्री केले. पण तरीही पवारांनी दादांचा विश्वासघात केला हे मात्र कायमचे महाराष्ट्राच्या ध्यानीमनी बसून गेले.

आता चंद्रकांतदादा खंजिराच्या संदर्भात ठाकरेंचा चेहरा जनतेला दाखवू पाहात आहेत. पण ती बाब तितकी घट्टपणाने जनतेच्या डोक्यात बसेल अशी शक्यता नाही. कारण अमित शाह आणि उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या एका बंद खोलीत नेमकी काय चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन होण्याच्या टप्प्यावर अचानक अजितदादा-फडणवीसांचे अडीच दिवसांचे राज्य कसे काय अवतरले, याही बाबींचा खुलासा जनतेला हवा आहे. ठाकरेंनी वारंवार सांगितले आहे की, सत्तेचा पन्नास टक्के वाटा ही मागणी शाहांनी मान्य केली होती. संजय राऊत आदि सेनानेते पुढचा मुख्यमंत्री शिवेसनेचाच असणार हे त्याच शाह-ठाकरे भेटीनंतर म्हणत राहिले. पण भाजपाला त्या शंकाकुशंका खोडून काढता आलेल्या नाहीत. अनेक प्रश्न त्या सत्ताकारणात गूढ बनून आहेत. म्हणूनच त्यांचा स्पष्ट खुलासा न करता, फक्त खंजिराची भाषा करणे टिकणारे नाही…!! 

Continue reading

राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते...

मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेने ट्रम्पचा इराणवरील हल्ला!

“युद्ध नको, मज बुद्ध हवा” असे म्हणणाऱ्या भारताला युद्धाच्या झळा जाणवत आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांच्या हट्टाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप बळी पडल्यामुळे सुरु झालेले इराणविरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि कट्टर इस्रायल, हे युद्ध आता तिसऱ्या सप्ताहात पोहोचले आहे. त्याचा...

नातवाबरोबर ‘खेळण्या’साठी थोरले पवार राज्यसभेत?

दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च 16ला निवडणुका होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जागाही आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, 5 मार्च...
Skip to content