विजय वडेट्टीवार आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात आज विविध नेत्यांकडून जी राजकीय टोलेबाजी झाली त्याच्या फटक्यांनी सभागृहात मात्र तब्बल अडीच तास सदस्यांचे निखळ मनोरंजन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या फटकेबाजीला सुरूवात केली. विजयभाऊ हे मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र त्यांनी सांभाळला. 80 टक्के समाजकार्य आणि 20 टक्के राजकारण हे त्यांनी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही चालू ठेवले. बाळासाहेबांचे विचारच असे आहेत की एकदा ते रूजले, त्या विचाराने प्रभावित झाले तरी तो माणूस जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी तसाच वागत असतो. मात्र काहींना त्यांचा सहवास लाभला. पण त्यांच्यावर विचारांचे संस्कार झालेले दिसत नाहीत, असे ते म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.
2019मध्ये चार महिने विजयभाऊ विरोधी पक्षनेते होते. परंतु तेव्हा त्यांनी जबरदस्त काम केले. विरोधी पक्षांची वेगवेगळी आंदोलने केली. विजयभाऊ वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. ते रस्त्यावर उतरून काम करतात. रस्त्यावर उतरल्याशिवाय अडीअडचणी कळत नाहीत. रस्त्यावर उतरण्यासाठी हिंमत लागते. सगळ्यांचे ते काम नसते. विरोधात वातावरण असले तर लपायचे नसते. ते ऐकून, समजून घ्यायचे असते. तो गुण विजयभाऊंमध्ये पाहिला. नाहीतर दुर्घटना घडली तरी खुर्च्या खाली करा, अशी सांगणारी विजयभाऊ तुमची वृत्ती नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच पुन्हा एकदा हास्याची लकीर उमटली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना भरपूर टोलेबाजी केली. 2019मध्ये अनेक विक्रम घडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर सत्ता परिवर्तनच केले. 2019चे हिरो तेच. दुसरे अजितदादा. सुरुवातीला मी मुख्यमंत्री झालो. ते उपमुख्यमंत्री झाले. नंतर ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले. मी विरोधी पक्षनेता झालो. आता ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि मीही उपमुख्यमंत्री झालो आहे. मात्र आता पुढे काही बदल होणार नाहीत.. असे ते म्हणताच सभागृहात हंशा पिकला.
मागे सत्तेत असताना वडेट्टीवार यांना त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे चांगले खाते मिळाले नाही म्हणून ते नाराज असल्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष नाना मंत्री होतील आणि वडेट्टीवर प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा होती. पण नंतर त्यांनी मदत आणि पुनर्वसन हे खाते सांभाळले आणि नुसते सांभाळले नाही तर ते खाते जिवंत करण्याचे काम केले. कार्यकर्त्याचा स्वभाव जर काम करणारा असेल तर तो कुठेही जिवंत असतो. त्यांचे विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर होण्यात थोडा उशिर झाला. पण देर है, अंधेर नाही. मात्र संग्रामचे नेमके काय झाले हे समजू शकले नाही. कोण म्हणाले, त्यांच्या फायलीवर सही झाली. चिठ्ठी निघाली. पण ती चिठ्ठी कुठे अडली हे काय माहित नाही. विजूभाऊंना मात्र न्याय मिळाला. जर कोणाला न्याय मिळाला नसेल तर त्यांना न्याय आम्हाला द्यावा लागतो. विजुभाऊंना मिळाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून ते व्यवस्थित काम पाहतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

मी अडीच वर्षे विरोधी पक्षनेते होतो. पोटतिडकेने भाषण करत होतो. पण मला उत्तर शिवाजीपार्कचे मिळत होते. कधी विधानसभेचे उत्तर शिवाजीपार्कला मिळायचे तर कधी शिवाजीपार्क उत्तर विधानसभेत मिळायचे. पण विजुभाऊ तुम्ही खात्री बाळगा.. तुम्हाला विधानसभेतले उत्तर विधानसभेतच मिळेल असे फडणवीस यांनी सांगताच पुन्हा एकदा हास्याची खसखस पिकली.
अजित पवार यांनीही वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना काही टोमणे लगावले. जेव्हा सरकार आले तेव्हा वडेट्टीवार यांना बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अशोक चव्हाण यांना मिळालेल्या खात्यांपैकी कोणतेतरी खाते मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. तेव्हा विजयभाऊ आपल्याला काय बोलले हे मी आता येथे सांगणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. पण जेव्हा लढायची वेळ असते तेव्हा तुम्ही लढा आणि सरकार येते तेव्हा आम्ही आहोत, अशी भूमिका विजयभाऊंची नाही असे दादा म्हणाले. मागच्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर विखे पाटील तिकडे गेले. त्यावेळी चार महिन्यांसाठी विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले. आता वर्ष-सव्वा वर्ष आहे. चांगले काम कराल अशी अपेक्षा आहे. यापुढे तुम्हाला कमी कालावधी मिळणार नाही. विरोधी पक्षनेते म्हणून वर्षानुवर्षे तुम्हाला ही संधी मिळावी, अशा शुभेच्छा देतो असे सांगत त्यांनी पुन्हा एक टोला लगावला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यावर भाषण केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही सभागृहात उपस्थित होते. पण ते पक्षाच्या आमदारांची काही कामे करत होते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाच्या वेळीही हे तिघे कागदपत्रांमधे, फायलींमध्ये व्यस्त दिसत होते.
जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताना मुख्यमंत्री भाषण ऐकताहेत पण दोन्ही उपमुख्यमंत्री काही लक्ष देत नाहीयेत, असे सांगितले. त्यावर फडणवीस म्हणाले की, जयंतराव आमचे लक्ष तुमच्याकडेच आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, जयंतराव, आमचे दोघांचेही तुमच्याकडेच लक्ष आहे. पण तुम्हीच आमच्याकडे लक्ष देत नाही. (जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांची पार्श्वभूमी असल्याने) या टिप्पणीवर सभागृहात हंशा उसळला.
जयंत पाटील म्हणाले की, आता मुख्यमंत्र्यांनीच सांगायला हवे की उपमुख्यमंत्री क्रमांक १ कोण आहे आणि क्रमांक २ कोण आहे, ते सांगावे. त्यावर अजित पवार पटकन फडणवीस यांच्याकडे हात दाखवून म्हणाले की, हे क्रमांक एक आणि मी क्रमांक २. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उत्तर देत नाहीत आणि बाकीचेच बोलतात. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हात दाखवत म्हणाले की, हे एक नंबर आणि ते दोन नंबर. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसून फडणविसांना डोळा मारू नका, असे सांगितले. त्यावर फडणवीस बसल्या जागेवरूनच म्हणाले की, भास्करराव आम्ही डोळा मारत नाही तर थेट मिठीच मारतो.

