अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग असलेल्या नवोदित मुंबई श्री स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला दिनेश राठोड गवसला. परब फिटनेसच्या दिनेशने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या विजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे नवोदित मुंबई श्रीचे जेतेपद पटकावले. स्ट्रेंथ जिमचा हितेन तामोरे उपविजेता ठरला.
मुंबईत परळच्या कामगार मैदानाला शरीरसौष्ठवपटूंची गर्दी उसळली होती. दिंडीतल्या वारकर्यांना जशी विठू माऊलीच्या दर्शनाची आस जशी लागलेली असते तशीच आस नवोदित शरीरसौष्ठवपटूंना या स्पर्धेची लागली होती. त्यामुळे या स्पर्धेत आपले पीळदार स्नायू दाखवण्यासाठी तब्बल २८० स्पर्धकांची विक्रमी उपस्थिती लाभल्याने आयोजकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहात होता. या नवोदितांबरोबर त्यांचे पाठीराखेही शेकडोंच्या संख्येने आल्यामुळे कामगार स्टेडियम अक्षरशः फुलले होते. प्रत्येक गटात ४०पेक्षा अधिक स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत ६० किलो वजनीगटात स्पर्धकांच्या अभूतपूर्व सहभागाने अर्धशतक ओलांडले होते. गेल्यावेळी २३० स्पर्धकांची उपस्थिती लाभलेल्या या स्पर्धेत एकंदर सात गटात मुंबईच्या शरीरसौष्ठवाचे २८० भावी स्टार्स अवतरले होते. स्पर्धकांची उपस्थिती इतकी प्रचंड होती की भव्यदिव्य स्टेजही अपुरा पडत होता.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेला खरी ताकद लाभली ती आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाईची. शरीरसौष्ठवावर असलेल्या प्रेमापोटी त्यानेच या स्पर्धेचे शिवधनुष्य लीलया पेलले आणि एका दिमाखदार स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखाची रोख बक्षीसे नव्हती. पण शरीरसौष्ठवाचे हितचिंतक तसेच संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक सहकार्य करत स्पर्धेचा आर्थिक डोलारा सावरला. या स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचे स्पर्धेच्या अभूतपूर्व गर्दीवरून दिसून आले. प्रत्येक गटात ४०पेक्षा अधिक खेळाडू असल्यामुळे गटातील अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना फार कष्ट घ्यावे लागले. प्रत्येक गटातून पाच खेळाडू निवडताना उपस्थित चाहते निराश होत होते. कारण प्रत्येक गटात किमान दहा खेळाडू तयारीतले असल्यामुळे आपल्या मित्राला गटात काहीही न मिळाल्याचे दुःख त्यांच्या चेहर्यावर सहज टिपले जात होते.
स्पर्धेचा प्रत्येक गट आव्हानात्मक होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या ५५ किलो वजनी गटात अनंत व्यायामशाळेचा सय्यद शाहवेज, ६० किलो वजनी गटात बॉडीवर्क शॉप दुर्गेश मेहेर सरस ठरला. ६५ किलोत मसल एम्पायरचा रोहित यादव अव्वल आला तर ७० किलो वजनी गटात स्ट्रेंथ जिमच्या हितेन तामोरेने बाजी मारली. पुढच्या तिन्ही गटांत गटविजेतेपदासाठी काँटे की टक्कर झाली, ज्यात वाली अन्सारी, दिनेश राठोड आणि गणेश म्हाब्दी पहिले आले.
नवोदित मुंबई श्रीचा किताब जिंकण्यासाठी झालेल्या लढतीत टॉपचे चार गट जबरदस्त होते. यात दिनेश राठोड, गणेश म्हाब्दी, हितेन तामोरे, रोहित यादव यांच्यात जोरदार पीळदार चुरस पाहयला मिळाली. अखेर दिनेशने हितेनवर मात करत आपले संस्मरणीय जेतेपद संपादले. स्पर्धेच्या विजेत्याला नवोदित मुंबई श्रीच्या किताबासह २१ हजारांचे रोख इनाम मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, किट्टी फणसेका, सुनील शेगडे आणि आयोजक विक्रांत देसाई यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तसेच शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा अमोल कीर्तिकर, शिवडी विधानसभा समन्वयक सुधीर साळवी आणि माजी नगरसेवक नाना आंबोले यांनीही खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी उपस्थिती लावली.
मुंबई शरीरसौष्ठवाची नर्सरी असलेल्या नवोदित मुंबई श्रीमध्ये सहभागी झालेल्या हौशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कामगार मैदानात शरीरसौष्ठव जगतातल्या स्टार्सनी हजेरी लावली. पीळदार तरूणाईचा मार्गदर्शक असलेला अनिल राऊत, सुजल पिळणकर, जालिंदर आपके, संतोष भरणकर, हरमीत सिंह आणि मुंबई श्रीचा गतविजेता उमेश गुप्ता या दिग्गजांनीही स्पर्धेतील खेळाडूंचे कौतुक केले.
नवोदित मुंबई श्री निकाल
५५ किलो: १. सय्यद शाहवेज (अनंत व्या.), २. विनय घाडीगावकर (राज जिम), ३. दर्शन सावंत (क्लाऊड नाईन), ४. प्रणय मुरकर (पॉवर फिटनेस), सिद्धांत लाड (परब फिटनेस);
६० किलो: १. दुर्गेश मेहेर (बॉडीवर्क शॉप), २. नईम सय्यद (परब फिटनेस), ३. शुभम अडांगळे (माँसाहेब), ४. कादिर शेख (ए.के. फिटनेस), ५. अर्पण सकपाळ (परब फिटनेस);
६५ किलो: १. रोहित यादव (मसल एम्पायर), २. संतोष घाटाळ (बॉडीवर्क शॉप), ३. अदनान तिवारी (बाल मित्र जिम), ४. याज्ञिक मांदाडकर (अपूर्व जिम), ५. शिवम जाधव (परब फिटनेस);
७० किलो: १. हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम), २. लक्ष्मण पाटील (एस.पी. फिटनेस), ३. दर्शन सणस (जय भवानी जिम), ४. मंगेश भोसले (बॉडीवर्क शॉप), ५. किरण पाटील (छत्रपती शिवाजी व्या.);
७५ किलो: १. वाली अन्सारी (परब फिटनेस), २.मनीष वाघेला (आयर्न पॅराडाईज), ३. रोशन पांडा (परब फिटनेस), ४. विपुल कांबळे (परब फिटनेस), ५. योगेश मर्दे (परब फिटनेस);
८० किलो: १. दिपेश राठोड (परब फिटनेस), २. दिपेश कलमकर (माँसाहेब), ३. ओमकार कालके (फिटनेस पॉइंट), ४. राज घोले (जय भवानी), ५. शुभम चौधरी (मॅडनेस);
८० किलोवरील: १. गणेश म्हाब्दी (अनंत जिम), २. निलेश रेमजे (परब फिटनेस), इरफान रेमजे ( बाल मित्र जिम), ४. आयुष तांडेल (परब फिटनेस), रियन कोळी (गुरुदत्त जिम).
किताब विजेता- दिनेश राठोड (परब फिटनेस), उपविजेता- हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम).