Homeबॅक पेजमनजीऺशिवाय 'अमर अकबर...

मनजीऺशिवाय ‘अमर अकबर अँथनी’? छे.. छे.. कल्पनाच करवत नाही!

व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या युगात पोस्टर डिझाईनपासून फेक व्हिडिओपर्यंत नवकल्पनाना नुसता ऊत आला आहे. खरं काय नि खोटं कोणतं असं झालंय. असेच एक जन्माला घातलेले पोस्टर “अमर अकबर अँथनी २”चे! तशी कल्पना वाईट नाही. मूळ चित्रपटातील अमर साकारलेल्या विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्ना (सध्या याची सेल व्ह्यॅल्यू एकदम भारी आहे. “धुरंदर” याला जास्त फळला.), अकबर साकारलेल्या ऋषि कपूरचा मुलगा रणबीर कपूर‌ (हा आपले पिता आणि दोन्ही काका या तिघांपेक्षाही सरस कामगिरी करतोय. होय. मोजकेच चित्रपट करतोय. पण भारी करतो. मग तो “संजू” असो वा “ॲनिमल”) आणि ॲन्थनी अर्थात अमिताभ बच्चनचा सुपुत्र अभिषेक बच्चन (बरेच दिवस झाले, याचा चित्रपट पाहिलेला नाही. त्यापेक्षा अमिताभचा जुना चित्रपट पाहावा) असे तिघे स्टार पुत्र या रिमेकमध्ये म्हणा अथवा पुढील भागात म्हणजे सिक्वेलमध्ये असे हे भन्नाट पोस्टर आहे. ज्याला सुचलं त्याला दाद. पोस्टर बनले म्हणून पिक्चर बनेलच असे नाही. आणि आज अमर अकबर अँथनी बनवायचा तर मुळात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या शैलीचा फिल्ममेकर हवा. मनमोहन देसाई (मनजी) पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक नव्हते पण प्रेक्षकप्रिय होते. “फन”मोहन देसाई अथवा “जन”मोहन देसाई असेही कौतुकाने म्हटले जाई.

मनजी आमचे गिरगावकर. खेतवाडीतील प्रताप निवासचे रहिवासी. एकामागोमाग एक सुपरडुपर हिट‌ पिक्चर देऊनही ते पेडर रोड, पाली हिल अथवा जुहू, वर्सोवा येथे राहयला गेले नाहीत. अखेरपर्यंत गिरगावातच राहिले. त्यांचे चित्रपट सर्वसामान्य स्वप्नाळू, आशावादी आणि उत्साही प्रेक्षकांसाठीच असत आणि त्याची पाळेमुळे ते कायमच गिरगावकरच राहिले त्यात आहेत. त्यांचा भाऊ सुभाष देसाई यांच्या निर्मिती “छलिया” (१९६०)पासून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले तरी अनेक वर्षे ते अन्य निर्मात्यांसाठी चित्रपट दिग्दर्शित करीत (आपला भाऊ सुभाष देसाई याच्यासाठी असो वा ए. ए. नाडियादवाला,‌ कधी ए. के. नाडियादवाला वा बलदेव पुष्पर्णा यांच्यासाठी असो). १९७७ या एकाच वर्षात त्यांचे चाचा भतीजा, धरमवीर, अमर अकबर अँथनी आणि परवरीश असे प्रदर्शित झालेले चारही चित्रपट सुपरडुपर हिट‌ ठरले. हा रेकाॅर्ड अबाधित आहे.

अमर अकबर अँथनीपासून ते चित्रपट निर्माते झाले. मुंबईत ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात या “एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट” चित्रपटाने खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. इस्पितळात एकाच वेळेस तीन खाटांवर असलेल्या अमर, अकबर, अँथनी यांच्या हातातून रक्त त्यांच्याच आईला (निरुपा रॉय) ते दिले जाते, असा अवैद्यकीय रक्तदान हास्यास्पद प्रसंग तेच सहजतेने दाखवू शकतात आणि त्यांनी दाखवलाय म्हणून आपण तो पाहू शकतो, एन्जॉय करु शकतो, हे त्या काळातील हाऊसफुल्ल गर्दीतील पब्लिकला रुचत होते. हे मनजीचे सर्वात मोठे यश. त्यांची आपली एक शैली होती. कोणी त्यांना नाॅनसेन्स मनोरंजन म्हणत.‌ “गंगा जमुना सरस्वती” (१९८८) हा चित्रपट सुपरफ्लॉप होईपर्यंत ते जे जे सांगतील ते ते अमिताभ बच्चन करीत होता आणि स्टाॅल, अप्पर स्टॉल आणि बाल्कनीच्या पब्लिकला आवडत असे. हुकमी टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घेतले जाई. गंगा जमुना सरस्वती आपल्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट असेल हे त्यांनी अगोदरच जाहीर केले ते ठीक आहे, पण मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना हा चित्रपट मेट्रो चित्रपटगृहात प्रेक्षकांसह दाखवला जात असताना चित्रपटाच्या मध्यंतरात आम्हाला भेटायला आलेल्या मनजी आणि त्यांचा मुलगा केतन देसाई यांचा आत्मविश्वास हरवलेला दिसावा, हे आश्चर्यकारक होते.

अन्यथा मनजी एकदम धमाल माणूस. मनसोक्त मनमुराद बोलणं हे त्यांचे वैशिष्ट्य. आज अमर अकबर अँथनी बनवायचा तर असे मनमोहन देसाई आणणार कुठून? पहिल्या चित्रपटाची काॅपी करायची तरी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी पब्लिकला जे आणि जसं आवडलं ते आजच्या मल्टीप्लेक्समधील प्रेक्षकांना पाहावयास आवडेल का? के. के. शुक्ला, कादर खान आणि प्रयाग राज यांनी अमर अकबर अँथनीचे लेखन करताना मनमोहन देसाई यांनाच डोळ्यासमोर ठेवून लिहिले असावे, असे चित्रपटभर जाणवते. आज असे पटकथा, संवादलेखन करणार कोण? नवीन पोस्टरपुरता अमर अकबर अँथनी राहिला तरी चालेल, पण मनजीऺशिवाय त्याचा पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपट… ही कल्पनाच न पटणारी!

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तिची ‘संस्कृती’च वेगळी!

तुम्हालाही माहित्येय आज मराठी व हिंदी चित्रपट, मालिका, रियॅलिटी शो, वेबसिरीज, ओटीटी, जाहिराती, इव्हेंटस इतकेच नव्हे तर अगदी सोशल मीडियातील "रिल स्टार" यातून सतत इतके आणि असे जुने आणि नवीन चेहरे समोर येताहेत की, त्यातील ओळखीचे चेहरे नावासह माहीत...

ढोल वाजले! शाहरुख खानचा ‘किंग’ येणार वर्षाअखेरीला!!

नुकतेच, होय नुकतेच आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाचे "इकडून आलेले मेसेज" तिकडे पाठवले, ते येताहेत / पोहचाहेत तोच व्हाॅट्सएपवर एकमेकांना तिळगूळ पाठवलेही.. आपण आपल्या याच आनंदात असतानाच यंदा वर्षाच्या अखेरीला, २६ डिसेंबरला शाहरुख खानचा "किंग" प्रदर्शित होईल हे...

नवं वर्ष सुरु झालं आणि साऊथच्या फिल्मचे आक्रमणही…

आजच्या ग्लोबल युगातील स्पर्धेच्या वेगात साऊथच्या (दाक्षिणात्य) चित्रपटांनी आपली धाव कायम राहील याची सकारात्मक व्यावसायिक रणनीती आखल्याचे दिसतेय.‌ येथे धाव याचा अर्थ आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे गणित. तुम्हालाही माहित्येय ९ जानेवारी रोजी प्रभासची अष्टपैलू अदाकारी असलेला मारुती दिग्दर्शित "राजासाब"...
Skip to content