जीवनाला कंटाळलेला एक उमदा लेखक शिरीष कणेकर मृत्यूला मिठी मारून आपल्यातून निघून गेला…
त्यांनी आपल्याला कायमच हसवलं… अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते… शेवटपर्यंत हसवत होते. मात्र ते स्वतः अंतर्यामी उदास होते. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाल्याने त्यांना एकाकी वाटत होतं. त्यांची आई फार लवकर गेली होती. त्या आईला ते आयुष्यभर शोधत राहिले आणि म्हातारपणी तर तिची त्यांना फारच आठवण येत होती. त्यांचा तो शोध, तो स्मृतींचा जागरही यानिमित्ताने संपला!
त्यांची-माझी पहिली भेट झाली ती लोकप्रभामध्ये. कारण ते माझा सहकारी अभिजीत देसाई यांच्याकडे सतत यायचे. त्या दोघांच्या गप्पा हा एक धमाल प्रकार होता. त्या ऐकूनसुद्धा दिवस खूप छान जायचा. नंतर मी लोकप्रभा सोडलं. त्यांच्याशी संपर्क संपला. मात्र काही वर्षांपूर्वी अजब प्रकाशनने लेखकांचं एक मिनी गेट-टुगेदर प्रभादेवीला आयोजित केलं होतं. तिथे त्यांचा माझा पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. तोवर त्यांनी मी घेतलेल्या लतादीदींच्या मुलाखती वाचल्या होत्या आणि लतादीदी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने आमच्या गप्पा त्यानंतर ‘लतादीदी’, ‘त्यांचं गाणं’ या विषयावरच व्हायला लागल्या. पण त्या काळात त्यांचा आणि लतादीदींचा संपर्क तुटला होता. तो सुरू करून देण्यात मला यश आलं आणि त्याचा मला खूप आनंद आहे.
झालं असं होतं की मी गेली काही वर्षं रोज त्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायची. पण एक दिवस ते मला म्हणाले की, मला नका पाठवत जाऊ हे गुड मॉर्निंग मेसेज. माझी मॉर्निंग आता गुड कधीच नसते… ते ऐकल्यावर मला पोटात गलबल्यासारखं झालं आणि मी तेव्हापासून त्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवणे बंद केलं. हे मी लतादीदींनाही सांगितलं. कणेकरांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला होता हे त्यांना कळलं नव्हतं. पण कणेकरांच्या मनाची ही अवस्था कळल्यावर दीदींनी मला त्यांचा नंबर द्यायला सांगितलाच, पण त्यांचं मोठेपण हे की त्या स्वतः कणेकरांना फोन करून, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करत असत.
हे असे गुड मॉर्निंग मेसेज थांबले तरी कणेकरांबरोबर बाकी मेसेजेस, लेखांचं आदान-प्रदान चालू होतं. मात्र एक दिवस हे रोजचं आदान-प्रदानही थांबलं आणि त्याला कारण झालं वाणी जयराम यांच्या मृत्यूचं. वाणी जयराम यांचा मृतदेह घरी सापडला ही बातमी मी त्यांना कळवली. ते आधीच हळवे झालेले होतेच. या बातमीने ते आणखी विकल झाले आणि त्यांनी अशा काही बातम्या किंवा रोज काही पोस्ट न पाठवण्याची विनंती केली. मला आता कशातही रस राहिलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे तेही थांबलं.
ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासमवेत शिरीष कणेकर ..
त्यांना फक्त एकाच गोष्टीत रस उरला होता आणि तो म्हणजे लतादीदींचं गाणं. ते गाणं म्हणजे त्यांचा श्वास होता. आणि लतादीदींशी गप्पा हा विरंगुळा… दीदी गेल्यावर्षी गेल्या. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला हा विरंगुळाही संपला होता. त्यांची गाणी ते ऐकत असत, पण त्यांच्या गप्पांमध्ये खंड पडला होता… दीदी गेल्यावर्षी गेल्या. आता कणेकर गेले… आता स्वर्गात त्यांच्या गप्पांचा फड रंगेल हे नक्की! कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!