टी-२० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर उसळलेल्या जनसागरानंतर गुरूवारी रात्रभर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल पाच जीप भरून चप्पल-बूट तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पालिकेच्या ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे १०० कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीतून एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलित करण्यात आला. रात्री सुमारे ११.३०पासून सुरु झालेली ही कार्यवाही सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे मॉर्निंक वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सकाळी नेहमीप्रमाणे स्वच्छ मरीन ड्राईव्ह उपलब्ध झाला.

या स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल आणि इतर वस्तूदेखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱ्यापैकी सुमारे ५ जीप भरुन संकलित बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू इत्यादी क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.

टी २० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात बुधवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला.

मरीन ड्राइव्ह परिसरात दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण रात्रभर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली.
