भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत मुंबईत चेंबूरच्या भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानात लवकरच उभारली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येणार असून ही भीमज्योत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देत राहील.
चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महामानवाची जयंती साजरी केली जाते. राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. याठिकाणी भीमज्योत उभारावी, अशी मागणी काही महिन्यांपासून केली जात होती. खासदार शेवाळे यांनी याबाबत पाठपुरावा करून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करून घेतल्या होत्या. आता लवकरच चेंबूरमध्ये ही अखंड भीमज्योत उभारली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या आंबेडकर जयंतीला या उद्यानात बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत हे नवे आकर्षण असणार आहे.
अशोक स्तंभ आणि भीमज्योत
चेंबूरचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आंबेडकरी अनुयायांसाठी आस्थेचे ठिकाण आहे. याठिकाणी आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार गेल्या वर्षी शेवाळे यांच्या पाठपुराव्याने अशोक स्तंभ उभारण्यात आला. आता लवकरच इथे भीमज्योतदेखील उभारली जाणार आहे.

