अजितदादा पवार बदलताहेत. अप्रिय सत्य तोंडावर संगणारे, ही प्रतिमा कायम ठेवत अजितदादा आता विनोदबुद्धी जोपासू लागले आहेत. भाषणात शेरोशायरी, कविता उद्धृत करू लागले आहेत आणि त्यामुळेच दादा कुठे गेला तुमचा वादा, असं विचारणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की,
जिसे निभा ना सकू, ऐसा वादा नही करता
मै बाते अपने ताकत से, ज्यादा नही करता
तमन्ना रखता हूं, आसमान छू लेने की
लेकिन औरोंको गिराने का, इरादा नही रखता..
निवडणुकीच्या आधी एका एजन्सीच्या सल्ल्यानुसार गुलाबी जॅकेट घालू लागलेले अजित पवार पूर्वी त्यांच्या रुक्ष भाषणांसाठी ओळखले जायचे. सडेतोड म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्याकडे विनोदबुद्धी नाही आणि ते गंभीर असतात, असे म्हटले जायचे. पण, गुलाबी जॅकेटच्या बदलाबरोबरच आता अजित पवारांच्या भाषणातही कविता, शेरोशायरी आणि काव्यपंक्तींचा, ओव्या-अभंगांचा पुरेपूर वापर असतो आणि त्याचेच प्रत्यंतर सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला त्यांनी दिलेल्या उत्तराच्या भाषणात आले.

चर्चेच्या दरम्यान अर्थसंकल्पासाठी आपले कौतुक करणाऱ्यांचे आभार मानताना अजितदादा म्हणाले की,
ऐकल्या शिव्या दुनियेच्या, जाहली जरी बदनामी
हे काय कमी मजसाठी, मी तुम्हा आवडलो आहे…
त्यांच्या या काव्यपंक्ती ऐकताच संपूर्ण सभागृहाने त्यांना दाद दिली.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील प्रसंग सांगून अजित पवार म्हणाले की, यशवंतराव यांच्या मातोश्री जात्यावर दळण दळताना एक ओवी म्हणायच्या आणि ती ओवी चव्हाणसाहेबांना संघर्ष करण्यासाठी बळ आणि धीर द्यायची. ती ओवी अशी होती,
नका बाळांनो डगमगू, चंद्र सूर्यावरील जाई ढगू…
सध्या जागतिक पातळीपासून सर्वत्र आर्थिक वाढीवर विपरित परिणाम होण्याचा काळ आहे. अशावेळी ही ओवी आठवली आणि विश्वास वाटला की, सध्याचे अडचणींचे ढग जाऊन आकाश पुन्हा स्वच्छ होईल, असे ते म्हणाले.
पूर्वाश्रमीचे आपले सहकारी असलेले आमदार आज आपल्या अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत आहेत. मी त्या सर्वांना इतकेच सांगू इच्छितो…
कमजोरिया मत खोज मुझमे मेरे दोस्त,
एक तूभी शामिल है, मेरी कमजोरियों मे..
असे दादांनी म्हणताच सभागृहाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचा आपला संकल्प आहे. हे सांगताना अजितदादा म्हणाले की,
तमन्ना सच है तो रास्ते निकल आते है
तमन्ना झूठ है, तो बहाने निकल आते है
अर्थसंकल्प मंजूर झाला आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हेही अजित पवारांनी ठासून सांगितले. पण त्यांच्या ९८ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सादर केलेली शेरोशायरी आणि काव्यपंक्तीच चर्चेचा विषय ठरल्या.
मंत्रिमहोदयांचा सूर्योदयाकडे तर माझा सूर्यास्ताकडे प्रवास…
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद एका लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत बोलून दाखवली आणि त्यांच्या त्याबद्दलच्या टिप्पणीवर संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहोत आणि मंत्रिमहोदय सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहेत, असे ते म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य म्हणून फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाची भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी बजावली. त्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विविध राजकीय निर्णयांमध्येही ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख पाच नेत्यांमधे समाविष्ट होते. पण, लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्ता आल्यानंतरही मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. मुनगंटीवार यांनी या अधिवेशनात अनेक प्रश्नांवर सरकारला अडचणीचे ठरतील असे मुद्दे मांडले आणि जणू विरोधी पक्षनेत्याचीच भूमिका बजावली. विरोधी पक्षांपैकी कोणालाही विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतके आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेत आज विरोधी पक्षनेता हे पद रिकामेच आहे. त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्यानेच मुनगंटीवारच प्रभावी आमदार कम अघोषित विरोधी पक्षनेता अशी भूमिका बजावत आहेत.

काल त्यांनी मनातील खदखद आणि पुढच्या प्रवासाची लागलेली चाहूल विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान चर्चेत करून दिली. वाळूच्या अवैध उत्खननाच्या संदर्भातील लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी मुनगंटीवार बावनकुळे यांना म्हणाले, लहानपणी शाळेत सर्वांनी
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे..
अशी म्हण ऐकली आहे. पण हल्ली..
प्रयत्ने वाळूचे, कण चोरिता धन मिळे…
असं झालं आहे.
इतकेच बोलून ते थांबले नाहीत. त्यानंतर मुनगंटीवार मंत्री बावनकुळे यांना म्हणाले की, आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहोत आणि मंत्रिमहोदय सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहेत.. त्यावर सभागृहात एकच हंशा उसळला आणि बावनकुळेही जोरदार हसू लपवण्यासाठी तोंड दाबून खाली वाकू लागले. मात्र, मुनगंटीवार यांनी या वाक्यातून आपली खदखदही व्यक्त केली आणि राजकारणातील संभाव्य प्रवासही अधोरेखित केला.
लेख झकास शैलेंद्रजी. तुमचं निरिक्षण नेहमीच मार्मिक असतं !