Homeपब्लिक फिगरअजितदादांनी पुरवला चोपदारांच्या...

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेकीचा हट्ट!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी… करड्या शिस्तीसाठी… वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजितदादा मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीच्या, कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अजितदादांचं अनोखं रुप काल मंत्रालयातील उपस्थितांनी अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातल्या चोपदारांची मुलगी आणि जावयाची भेटीची इच्छा पूर्ण केली.

दादांनी चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला नुसती भेटच दिली नाही, तर त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. संवाद साधताना अजितदादांनी त्यांना अनेक प्रश्नही विचारले. मुंबईत कुठे राहता, कुठल्या शाळेत शिकलात, अमेरिकेत कधी गेलात, अमेरिकेत कुठे राहत होता, तिथं कामाची वेळ कशी होती, कामाचं स्वरूप कसं असतं, तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळत होतं, असे प्रश्न दादांनी विचारले. इतकंच नव्हे तर दादांनी त्यांना लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज? हा प्रश्नही विचारला. दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीनं चौकशी केली. अजितदादांच्या या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे तर कृतार्थ झालेच, पण त्यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले.

त्याचं झालं असं की, उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे चोपदार पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या सेवाकाळत सचोटीनं सेवा केली. येत्या काही दिवसांत ते सेवानिवृत्त होत आहेत. चोपदार विलास मोरे यांची मुलगी स्नेहा हिचं चार वर्षांपूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झालं. त्यांचे जावई आयटी कंपनीत अमेरिकेत नोकरीला होते. हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक होतं. मात्र, कोरोनामुळं ते पुन्हा भारतात परतले आणि इथूनंच ते काम करत आहेत. विलास मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडे व्यक्त करत होते.

लेकीची आणि जावयाची ही इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन दादांकडे मन मोकळं केलं. आपल्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर अजितदादांनी तत्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही दुसऱ्या दिवशीच त्यांनी या दोघांना भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनीही आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजितदादांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजितदादांनी केलेलं कौतुक पाहून चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तर त्यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content