भारत जोडो यात्रेत स्वा. सावरकरांवर ब्रिटिशांना मदत केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचा आज भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दाखले देत चांगलाच समाचार घेतला.
गुजरातच्या निवडणूक प्रचारासाठी गेलेले फडणवीस यांनी ट्विटरवरून राहुल गांधींचा हिंदीत समाचार घेतला आहे. राहुलजी, काल आपण मला एका पत्राच्या अंतीम ओळी वाचण्यास सांगितल्या. चला, आता काही दस्तावेज मी आपल्याला वाचायला देतो. आपले सर्वांचे आदरणीय महात्मा गांधीजींचे हे पत्र आपण वाचले का? का तशाच शेवटच्या ओळी यात आहेत, ज्या आपण मला वाचायला सांगत होता, असे त्यांनी विचारले.
आता जरा भारताच्या दिवंगत पंतप्रधान, आपल्या आजी इंदिरा गांधींनी स्वा. सावरकरांबद्दल काय म्हटले होते तेही वाचा… वीर सावरकर स्वातंत्र्यलढ्याचे आधारस्तंभ होते. भारताला सदैव लक्षात राहणारे सुपुत्र होते, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातल्या राजकारणात आपले विशेष स्थान ठेवणारे शरद पवार, वीर सावरकरांबद्दल काय म्हणतात तेही वाचा… याच पत्रात ते सावरकरांना दोनदा आजन्म कारावास झाल्याचे म्हणतात. काँग्रेसचे नेते, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव म्हणतात की, स्वा. सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी होते. सामाजिक सुधारणांसाठी त्यांची प्रतिबद्धता आजच्या पिढीला ऊर्जा देणारी आहे. हेही वाचा…, असे फडणवीस म्हणाले.

आम्ही महाराष्ट्रातून आहोत. म्हणून वाचा.. काँग्रेसचे नेते बाळासाहेब देसाई काय म्हणत होते ते… स्वा. सावरकरांची प्रखर देशभक्ती, त्यांचा असीम त्याग आणि सर्वांच्या अंतःकरणात सन्मान, यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही भावना त्यांच्याबद्दल राहणे शक्य नाही, असे ते म्हणतात. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्राला जर सामर्थ्यशाली बनवायचे असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आपल्याला चालावे लागेल, असेही देसाई म्हणतात. काँग्रेसचे नेतेच नाहीत तर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनीही स्वा. सावरकरांना आद्यक्रांतिकारक म्हटले आहे. त्यांच्या प्ररणेनेच स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी पर्व सुरू झाले, असेही त्यांनी सांगितले आहे, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशाचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणतात की, सावरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात ब्रिटिश सत्तेला कधी जुमानले नाही आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार कष्ट घेतले. (हे पत्र त्यांनी वीर सावरकरांचे चिरंजीव विश्वास सावरकरांना पाठवले होते.) इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यम्सनी स्वा. सावरकरांच्या मृत्यूनंतर आपल्या श्रद्धांजलीत म्हटले होते की, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले जीवन व्यतित केले आणि विजयी मुद्रेने मृत्यूचा सामना केला. इंदिरा गांधींनीही सावरकरांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते की, सावरकर साहस आणि देशभक्तीचे प्रतिक आहेत… तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की, स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी कितीतरी विस्मयजनक मार्ग स्वीकारले होते. त्यांचे चरित्र नव्या पिढीला सदैव मार्गदर्शन करेल…
मग, आता प्रश्न हा पडतो की, वारंवार सावरकरांबद्दल वदग्रस्त विधाने करून आपण काय फक्त आपल्या व्होट बँकेची चिंता करत आहात का? वास्तवात याबद्दल आपली जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे. तसेही देश आपल्याला सतत विचारतोच आहे की, जर आपण असेच सिलेक्टिव्ह गोष्टी वाचत राहणार का? मग देशातल्या पुढच्या कितीतरी पिढ्या आपल्याला हाच प्रश्न विचारेल की.. अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो…?, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

