Friday, September 20, 2024
Homeडेली पल्सआदित्यजी.. पवारांपेक्षा तरूण...

आदित्यजी.. पवारांपेक्षा तरूण मुख्यमंत्री व्हा!

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोना महामारीशी झगडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कंबर कसून कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. एका बाजूला आई रश्मी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला कोरोनाची बाधा होऊनही आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे सांभाळण्याचा विडा उचलला आहे.

सोमवार, 30 डिसेंबर 2019 रोजी शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वात तरुण मंत्री होण्याचा बहुमान मिळविला. “मी, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, ईश्वर साक्ष शपथ घेतो की.. आणि महाराष्ट्र विधानभवनाच्या प्रांगणातील प्रचंड मोठ्या शामियान्यात उपस्थित असलेल्या तरुणाईने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. आई रश्मीच्या चेहऱ्यावरील भाव आनंदातिरेकाने ओसंडून वाहत होते तर पाठचा भाऊ तेजस कौतुकाने मोठ्या भावाला न्याहाळत होता. पिताश्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या या युवराजाला सुटाबुटात राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेताना त्याच्यामध्ये आपला कर्तबगार उत्तराधिकारी पाहत होते.

आपल्याकडे आईचे महत्त्व आहेच. पण ते आताशा व्यवहारात प्रकर्षाने पुढे येतेय. आमचे एक स्नेही महेश वैजयंती भगवान पावसकर असे नाव आवर्जून लिहितात. किशोर शांताबाई काळे यांचीही आठवण येते. भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांनीही मंत्रीपदाची विनोद श्रीधर विजया तावडे अशी शपथ घेतली होती. आदित्य ठाकरे यांनी आधी आईचे नाव आणि मग वडिलांचे नाव शपथेमध्ये घेऊन हेच दाखवून दिले.

आदित्य ठाकरे ठाकरे घराण्यातील पहिले आमदार. तसं पाहायला गेले तर ठाकरे परिवाराने कधी लालदिव्याच्या गाडीचा हव्यास धरलेला नाही. प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रेसर राहून संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे सुपूत्र बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. तोवर त्यांनी अनेकांना विविध प्रकारची पदे दिली. अगदी मनोहर जोशी यांना लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत नेऊन बसविले. पण चालून आलेली संधीसुद्धा त्यांनी स्वीकारली नाही.

२०१४ साली १५१+ हा नारा देत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार हे ठणकावून सांगितले. देशातील राजकीय परिस्थिती नरेंद्र मोदी यांनी बदलून टाकली असल्याने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या हाती १२३ जागा आल्या आणि अभिमन्यूसारखी लढत देत उद्धव ठाकरे यांनी एकहाती ६३ जागा जिंकल्या. २०१४ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्यासाठी राजकीय प्रशिक्षणाची होती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्याने करुन शिवसेनेची, युवा सेनेची संपूर्ण फळी जबरदस्त मेहनतीने पुढे झेपावली.

याआधीच बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या व्यासपीठावर आणून पुढच्या पाऊलखुणा दाखवून देण्यात आल्या होत्या. ५ डिसेंबर २०१४ रोजी भाजपबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. काळाची पावले ओळखणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र पाच वर्षांत स्वतः सत्ताधीश झाले आणि हे करतानाच असंख्य शिवसैनिकांनी आग्रह केल्याने आदित्य ठाकरे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वरळी मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिले.

आदित्य

उच्चविद्याविभूषित असलेल्या निव्वळ एकोणतीस वर्षे वयाच्या या युवा नेत्याने भल्याभल्यांना ‘मोहिनी’ घातली. सचिन अहिर यांनी तर हातावरचे घड्याळ बाजूला ठेवून देत मनगटावर शिवबंधन बांधले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून आणण्यासाठी कंबर कसली. तेव्हाचे आमदार सुनील शिंदे यांनीही परिश्रम घेतले आणि आदित्य ठाकरे प्रचंड बहुमताने निवडून आले. ठाकरे घराण्यातील पहिल्या आमदाराची नोंद आदित्य ठाकरे यांच्या नांवावर झाली.

आधीच्या सरकारमध्ये रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या कामाची पद्धत, त्यांनी केलेल्या कामाचे जवळून अवलोकन केल्यामुळे ३० डिसेंबर २०१९ रोजी “मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, ईश्वर साक्ष शपथ घेतो की..’ म्हणण्यात त्यांना कोणतीही अडचण आली नाही. पर्यावरण हे आवडते खाते तर मिळालेच पण पर्यटन आणि राजशिष्टाचार ही खातीसुद्धा मिळाली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही प्राप्त झाले. त्यामुळे, ‘हीच वेळ आहे, करुन दाखविण्याची’ असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

पर्यावरण विभागाचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल हा नामविस्तार करण्यात आला आहे. त्यायोगे कार्यकक्षा रुंदावल्या आहेत. मनात येणारे चांगले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संधी चालून आली आहे आणि त्याचा उपयोग आदित्य ठाकरे निश्चित करीत आहेत. वानगीदाखल उदाहरण द्यायचे झाले तर २२ वर्षे रखडलेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील पर्यटन विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर करून ताज समुहाच्या हॉटेल स्थापनेचा प्रश्न मार्गी लावला. कोकणातल्या या सुंदर हॉटेलच्या स्थापनेमुळे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत अशा शाश्वत पर्यटन आणि शाश्वत विकासात भर पडणार आहे.

कोरोनात चंद्रपूर येथे एका बाळंतिणीला नवजात अर्भकासाठी कपडे मिळू शकत नाहीत हे कळल्यावर आदित्य ठाकरे यांनी तिथल्या जिल्हाप्रमुखामार्फत मुंबईत बसून कपड्यांचा संच उपलब्ध करुन दिला तेव्हा त्या माऊलीने दिलेले आशीर्वाद सिंधुताई सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या आशीर्वादाइतकेच मोलाचे आहेत. मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे हजरजबाबी पद्धतीने उत्तरे देतानाच आपल्या खानदानाच्या सुसंस्कृत परंपरेला कुठेही धक्का लागणार नाही, हे आदित्य ठाकरे यांनी निक्षून सांगितले आहे.

आदित्य ठाकरे आज तीस वर्षांचे आहेत. सह्याद्रीच्या दुर्घटनेत ते थोडक्यात वाचले. नियतीच्या मनात आपल्या हातून देशसेवा, लोकहिताचे कार्य घडावे हेच आहे. शरद पवार यांनी वयाच्या सदतीसाव्या वर्षी, १९७८ साली मुख्यमंत्रीपद मिळविले होते. शरद पवार यांचा सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम मोडण्याची सुसंधी आदित्य ठाकरे यांना मिळू शकते. शिवसेनेचे भावी पक्षप्रमुख म्हणून तुमच्याकडे तमाम शिवसैनिक आशेने पाहात आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
error: Content is protected !!
Skip to content