दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफडीसी-एनएफएआय) वतीने त्यांच्या ‘तिसरी मंजील’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आज, शनिवार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता हा चित्रपट नव्या 4K स्वरुपात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल.
‘तिसरी मंजील’ हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शम्मी कपूर यांच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो.

शम्मी कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एनएफडीसी-एनएफएआयच्या वतीने एनएफडीसीच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (एनएफएचएम) अंतर्गत जुन्या रिळांच्या स्वरुपात असलेल्या अनेक दर्जेदार चित्रपटांना आधुनिक काळातील 4K आणि 35एमएम स्वरुपात आणण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

याअंतर्गत देव आनंद यांच्या बाजी (1951), सी.आय.डी. (1956), असली-नकली (1962), तेरे घर के सामने (1963), गाईड (1965), ज्वेल थिफ (1967) आणि जॉनी मेरा नाम असे अनेक लोकप्रिय चित्रपट नव्या स्वरुपात आणण्यात आले आहेत.
जुन्या काळातील चित्रपटांचा वारसा जतन करण्यासाठी एनएफएचएम ही मोहीम 2015 साली सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ही मोहीम जगातील सर्वात मोठी चित्रपट जतन मोहिमांपैकी एक आहे.

तिसरी मंजील’ हा चित्रपटही याच मोहिमेअंतर्गत नव्या स्वरुपात आणण्यात आला. चित्रपटाच्या मूळ प्रती एनएफएआयच्या संग्रहालयात विशिष्ट तापमानात व नियंत्रित वातावरणात गेल्या कित्येक दशकांपासून जतन करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे योग्य प्रकारे जतन केलेले असल्यामुळेच त्यांना आजच्या काळातील 4K स्वरुपात आणणे शक्य झाले आहे.
जुन्या पद्धतीने रिळांच्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या चित्रपटांना सध्याच्या 4K स्वरुपात रुपांतरीत करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागला. त्यासाठी त्याच्या मूळ प्रतींना काही महत्त्वाच्या टप्प्यातून जावे लागते. यामध्ये प्रत्येक फ्रेमवरील धूळ, घाण, डाग, चिरा आदी तंत्रज्ञानाच्या मदतीने हटवण्यात येतात. यादरम्यान चित्रपटाच्या रंगसंगती आणि आवाज यांचाही विचार करण्यात येत असतो. साधारणपणे, एका तीन तासाच्या चित्रपटात अडीच लाखांपेक्षाही जास्त फ्रेम असतात. त्यामुळे हे काम अत्यंत लक्षपूर्वक करणे आवश्यक असते. अशा प्रकारे, रुपांतरण पूर्ण झालेल्या चित्रपटाची अंतिम आवृत्ती प्रेक्षकांना अतिशय नवा अनुभव देते. चित्रपट जणू काही नव्यानेच चित्रीत करण्यात आला आहे, याचा आभास यामुळे निर्माण होतो.

सद्यस्थितीत अशा प्रकारे 4k स्वरुपात रुपांतरित करण्यात आलेले दर्जेदार चित्रपट देशात इतर कोणत्याही संस्थांकडे उपलब्ध नसून त्यांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना या निमित्ताने मिळाली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन एनएफडीसी-एनएफएआयने केले आहे.
एनएफडीसी-एनएफएआयमार्फत लॉ कॉलेज रोडवरील संग्रहालयात दर शनिवारी अशा प्रकारे विशेष शोंचे आयोजन करण्यात येत असते. संग्रहालयाचं सदस्यत्व घेणाऱ्या नागरिकांना मोफत चित्रपट शोमध्ये राखीव जागा ठेवण्यात येतात. त्यासोबतच येथील वाचनालय, चित्रपट महोत्सवांच्या तिकिटांवर सवलत अशा सुविधाही त्यांना मिळतात. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी संग्रहालयाचे सदस्यत्व घ्यावे, असे आवाहन एनएफडीसी-एनएफएआयने केले आहे.

अधिक माहितीसाठी एनएफडीसीच्या सोशल मीडिया पेजवर अथवा nfai.nfdcindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.