Homeमाय व्हॉईसभोळ्या आईची रे...

भोळ्या आईची रे मोठी अपेक्षा…

भोळ्या आईची मोठी अपेक्षा असली तर कायकाय घडू शकते याची प्रचिती पुन्हा वांद्रे एके वांद्रे होण्यात दिसून आली. विधान परिषदेतील निवडणुकीत झालेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असताना मात्र सर्वसामान्य शिवसैनिक व ज्येष्ठ नेत्यांमध्ये मात्र वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे. खरंतर ही कुजबूज गेल्या दोन-चार वर्षांपासून सुरू आहे. युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी माघार घेतली होती तसेच त्याच मतदारसंघातले सचिनभाऊ अहिर यांनीही तेव्हा नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपचे वरळीतले संभाव्य उमेदवार सुनील राणेंना विनोद तावडेंचे तिकीट कापायला लावून बोरीवली मतदारसंघातून द्यायला लावले होते. त्या निवडणुकीतही आदित्य यांचा 30/35 हजार मतांनीच विजय झाला होता. त्यानंतर त्याच विभागाच्या सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांना विधान परिषद मिळाली.

भोळ्या आईची

अगदी तंतोतंत तसेच मुंबईतल्या वांद्रे विभागाबाबतही यावर्षी झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर आहेतच. त्यात आता अनिल परब व मिलिंद नार्वेकर या दोघा वांद्रेवासियांची भर पडली आहे. महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता होती तेव्हाही असेच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वांद्र्याचे. त्यांचे चिरंजीव मंत्री आदित्यही त्याच घरातले. पर्यायाने वांद्र्यातलेच आणि आणखी एक मंत्री अनिल परबही वांद्र्याचेच. त्यामुळे सहाजिकच शिवसैनिक व ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे. सेनेची कार्यपद्धती पाहता उघड कुणीच बोलणार नाही. परंतु एकाच विभागातील अनेकांना संधी देण्यापेक्षा इतर विभागांनाही थोडीफार संधी मिळायला हवी. शिवसेना पक्षफुटीनंतर तरी सत्तेचा समतोल राखला गेला पाहिजे असे एका ज्येष्ठ नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माझ्याशी बोलताना सांगितले.

भोळ्या आईची

या संबंधात वांद्रे, खार, कांदिवली, शीव, माटुंगा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर आदी अनेक ठिकाणी अनेकांशी संपर्क साधला असता पडद्याआड घडलेल्या अनेक गोष्टी समजल्या. खरंतर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी शहकाटशहाचे राजकारण केले होते. जणू काही एकमेकांवर गुप्तहेरच सोडले होते असे वाटावे असे वातावरण होते. दोन्ही बाजू तयार होत्या. त्यातच एका आईने आपल्या युवराजाला पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. याच काय? कोणत्याही आईला आपला युवराज पुढे जावा, नावारूपाला यावा असे वाटत असतेच. जर तो जास्त हुशार वा चतुर दिसला की आईला वाटते की, याला परीक्षेला न बसवताच आणखी पुढल्या वर्गात नाही का टाकता येणार? तसेच याही आईला वाटले. मुलगा आमदार झाला हे बरंच झालं. आता आणखी किती वाट पाहयची? थेट राज्याभिषेकच करू या!! आणि मग येथेच पाहिला ब्रेक लागला.

भोळ्या आईची

हा विचार मनात ठेवून व्यूहरचना सुरू झाली होती. अशी माहिती हाती लागली आहे की शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचीही तयारी भाजपने तयारी दर्शवली होती. स्पष्ट नाही तरी सूचित जरूर केलेले होते. मात्र युवराजाविषयींची अपेक्षा ऐकताच श्रेष्ठींनी शब्द मागे घेतला आणि नंतर इतिहास घडला तो कसा आणि कधी हा सर्व राज्याला आता माहित आहे. शरद पवार यांनीही न बोलता अनेक गोष्टी केल्या. सर्वाना एकत्र आणले आणि जेव्हा पत्र देण्याची वेळ आली तेव्हा नेमका काँग्रेसला थोपवून धरले. सरकारच्या पाठिंब्याचा फॅक्स काँग्रेसकडून राजभवनावर पोहोचलाच नाही आणि राजभवनाच्या गेटवर सरकार स्थापन करण्याचे पत्र घेऊन ताटकळत राहिलेले युवराज माघारी परतले. या सर्व रंजक कथा वाटल्या तरी खऱ्या आहेत. त्या दोन दिवसातले सर्वांचे दिनक्रम आठवून पाहा म्हणजे तुम्हालाही त्यात तथ्य वाटू लागेल..

भोळ्या आईची

“नातीगोती शुद्ध गुंतवळ

निमित्तमात्रांची भुतावळ”

असं कितीही असलं तरी रक्ताचा माणूस पुढे जायला पाहिजे असतो, हे साधे मानसशास्त्र आहे. यासाठी कुठल्याही विद्यापीठाची पदवी लागत नाही. राजपुत्राच्या आईच्या हट्टापायी खरंतर पक्षात फूट पडली हे पुढे न आलेलं महत्त्वाचं कारण आहे. हे नाकारलं जाईल. ही कथा ठरवली जाईलही. खोका देऊन लिहून आणलेली गोष्ट आहे, असाही सूर आळवला जाईल. कसंही बोला, कसाही सूर लावा.. त्यात नेमके ‘सूत’ आहे आणि सुतावरून स्वर्ग वा एखादी गोष्ट खरी की खोटी ठरवता येते हे आधुनिक शल्यविशारदही सांगेल.

Continue reading

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...

देवाभाऊ गरिबांची कशाला चेष्टा करता?

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत. अन्य कुठल्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येते. परंतु मुख्यमंत्रीपदावरील हुशार व्यक्तीने (देवाभाऊ)...

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या 'झेंडूची फुले' या विडंबनात्मक काव्याला 100...
Skip to content