Saturday, October 26, 2024
Homeमाय व्हॉईसमुंबईत झुळूझुळू नदी...

मुंबईत झुळूझुळू नदी वाहते.. पण गुळगुळीत कागदावर!

गेले सतत दोन आठवडे मी मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात येणाऱ्या व पहिल्या पानावर विराजमान होणाऱ्या चिकन्याचुपड्या भाषेत लिहिलेल्या तसेच छायाचित्रांनी नटलेल्या भरगच्च जाहिराती पाहत होतो. कालच्या शनिवारी तर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिली चक्क पूर्ण दहा पाने निवासी संकुलांच्या जाहिरातीनी नटवलेली होती. कधी कधी याच जाहिराती गुळगुळीत चमकदार कागदावरही असतात. अर्थात गुळगुळीत चमकदार कागदाची किंमतही तितकीच मोठी चमकदार असते हे मी सांगायला नको.

मुंबई हे देशातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र असल्याने देशभरातील नोकरदारांचा लोंढा मुंबई-ठाणे- डोंबिवली-कल्याण-विरार या एमएमआर परिसरातच येत असल्याने परवडणाऱ्या घरांची तसेच मोठ्या घरांचीही मोठी मागणी असते. एकटे राज्य सरकार वा महापालिका यंत्रणा ही सतत वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्यात असमर्थ ठरतात. साहजिकच खासगी बिल्डर्सना रान मोकळे मिळाल्याने नामवंत बिल्डर व इतर छोटे बिल्डर्स यांची जणू चांदीच होत आहे. काही नामवंत बिल्डर्स आपल्या नावाला कोणताही बट्टा लागू नये म्हणून नाकासमोर काम करत असतात. परंतु यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीही नाही हे दुर्दैव आहे.

या बिल्डर्सचे गैरप्रकार ठरलेले आहेत. भूखंडाचे क्षेत्रफळ चोरायचे म्हणजेच फायदा असेल तेथे वाढवून दाखवायचे व जेव्हा सरकार वा महापालिका यांच्याकडून सवलती हव्या असतील तेव्हा ते कमी दाखवायचे! इमारतीमधील लॉबी छोटी दाखवून चटईक्षेत्र चोरायचे आणि जर एसआरए प्रकल्प असेल तर मज्जाच मज्जा!! बिल्डरची, चाळ समितीची, राजकीय नेत्यांची, नेत्यांच्या पंन्टर्सची मजाच होते. मात्र रहिवाशांना सजाच होते.

शिवाय एसआरए असो वा नॉर्मल इमारत असो, बिल्डर्सची जाहिरातबाजी नेहमीच शिगेला पोहोचलेली दिसते. ‘जे न देखे रवी, ते पाहे कवी’ या धर्तीवर जाहिरातीचे कॉपीरायटर्स तुटून पडत असतात. नवीननवीन नोकरी असते. काहीतरी चमक दाखवून बॉसकडून शाबासकी हवी असते. मग काय मुंबई, ठाण्यात, डोंबिवलीत सर्वत्र झोपड्या उघड्या डोळ्यांना दिसत असूनही कुणा कॉपी रायटरची कल्पना झेप घेते आणि चक्क डोंबिवलीत नसलेली नदी ते जाहिरातीत घुसवून टाकतात. मग एक चमकदार टॅगलाईन येते, ‘ब्लॉकची खिडकी उघडलीत की एकदम मन प्रसन्न करणारी व झूळूझूळू वाहणारी नदी’ आणि ही टॅगलाईन पुढचेमागचे काही न पाहता एकदम पहिल्या पानावर व लुसलुशीत कागदावर! खरेतर मुंबई आणि आसपासाच्या परिसरात झुळूझुळू वाहणारी निर्मल पाण्याची नदी याने कुठून शोधली याचाच शोध घ्यायची वेळ आली आली आहे. असल्या थापेबाज जाहिरातींविरुद्ध महारेराने खरंतर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

आणखी एक मजेशीर व संताप आणणारी एक जाहिरात पाहण्यात आली. चेंबूर व ठाणे परिसरात दिवाणखान्याची खिडकी उघडली की साक्षात डोळे थंड करणारा ‘निसर्ग ‘! हा म्हणजे थापेबाजीचा कळसच.. माझे या बिल्डर कंपनीला आव्हान आहे की संपूर्ण मुंबई परिसरात निसर्ग दाखवा आणि माझ्याकडून बक्षीस घेऊन जा!! कारण या परिसरात कोठेही नजर फिरवा जेथे जाल तेथे झोपड्याच दिसतात आणि राहिलेल्या ठिकाणी उंचच उंच इमारती दिसतात.

ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, चेंबूर आदी परिसरतातील रहिवासी सरकार व बिल्डर्सविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही आम्हाला निसर्ग दाखवणार होता, शुद्ध हवा देणार होता. नावातच ओझोन असलेल्या टॉवर्समधील रहिवासी म्हणतात ओझोन राहिला बाजूला आम्हाला या गलिच्छ झोपड्या पाहण्याची शिक्षा देणारे तुम्ही कोण? आम्ही दीड-दोन कोटी रुपये खर्चून या झोपड्या पाहण्यासाठी येथे ब्लॉक घेतला का? डोंबिवलीच्या पलावा संकुलाच्या बिल्डरने तर इमारतीच्या जाहिरातीत नवीन मुंबईपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. ते उड्डाणपूल वगैरे सोडा तेथे गटाराची समस्याही अजून सुटलेली नाही. उलट गेल्या पावसात चक्क दीड-दोन मजल्याच्या उंचीचे पाणी साचले होते. महारेराने या प्रकाराची स्वतःहून दखल घेणे जरुरीचे होते. परंतु नेहमीप्रमाणे गप्प बसणेच त्यांच्या भाळी लिहिलेले होते.

“आकाशाचे पोट फाडीत घुसणारे स्कायक्रॅपर्स 

आणि समुद्राची आतडी पिळवटून टाकणाऱ्या क्रेन्स 

जिथे धडधडत असले हवा हर क्षणी नाण्यांसाठी 

दरेक श्वास, हव्यास होण्यासाठी

मित्रा,  त्याच देशात राहून तू चितरतो आहेस 

निळे डोंगर… हिरवी झाडे… स्वप्नांचे मेघपुंज 

नाजूक वेलींचं, ताजं टवटवीत तारुण्य 

सुगंधी पाण्याचं मुग्ध लावण्य…

किती निष्पाप आहेस तू अजूनही” (महेश केळुस्कर)

सद्य परिस्थितीवर यापेक्षा थेट भाष्य मला तरी दुसरे आठवत नाही.

सध्याच्या जाहिराती आपण काहीवेळ बाजूला ठेवू. गेल्या 15/20 वर्षांतील बिल्डर्सचे काही मोजकेच प्रकल्प घेऊ. त्यात त्यांनी त्यावेळी केलेली आश्वासने निसर्ग, तरणतलाव आजूबाजूला नयनरम्य लँडस्केप यातील किती आश्वासने पूर्ण केलीत याची शहानिशा महारेरानेच करावी अशी माझी मागणी राहील. तसेच या गोष्टी प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा होत्या का? नसल्यास किती विलंबाने त्या अंमलात आल्या याचीही नोंद घेतली जावी.

आता राहिला प्रश्न बांधकाम साहित्याचा. ठाणे शहर आणि ग्रामीण भाग तसेच मुंबईची दोन्ही उपनगरे तसेच वसई-विरारमधील बांधकाम साहित्याचे परीक्षण करण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. कारण हजारो घरांच्या भिंती व न्हाणीघरे बकवास झालेली आहेत. इतकेच नव्हे तर इमारतीत बसवण्यात आलेली फायर फायटिंग व्यवस्थेची आताची दशा काय आहे त्याचाही शोध घेतला जावा. माझ्या माहितीनुसार या कंपन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एक-दीड वर्षातच बंद पडलेल्या आहेत. आता बोला!

छायाचित्र- अंजू भडसावळे, मांडणी- प्रवीण वराडकर

Continue reading

बाबा सिद्दीकींची हत्त्या नेमकी झाली तरी कशासाठी?

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे,...

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...

बाबा सिद्दीकींची हत्त्या दीड एकराच्या भूखंडासाठी?   

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या (पू.)च्या एका टोकाला असलेल्या साकीनाका विभागातील झोपड्या व छोट्या कारखाने तसेच गॅरेजनी किचाट झालेला सुमारे...
Skip to content