छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अत्युत्कृष्ट प्रशासक आणि धडाडीचे सेनापती निर्माण केले. हिंदू हे, राष्ट्र निर्माण करू शकतात, त्या राष्ट्राच्या संरक्षणाकरिता सेना उभी करू शकतात, त्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता व्यवस्था निर्माण करू शकतात, शेतकऱ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, व्यापार, उद्योगधंदे आणि अर्थव्यवस्था या गोष्टींना चालना देऊ शकतात, तसेच सागरी आक्रमकांना पायबंद घालण्यासाठी आरमार निर्माण करू शकतात; अशा सर्व गोष्टींची उदाहरणे शिवाजीमहाराजांनी स्वतःच्या कृतीतून घालून दिली आहेत.

भारतवर्षाचे नवनिर्माण करून दिल्ली जिंकण्याचे उच्चतम ध्येय शिवाजीमहाराजांनी मराठ्यांपुढे ठेवले. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला. तब्बल पंचवीस वर्षे जीवन-मरणाचा संघर्ष करून मराठ्यांनी हे राज्य वाचविले. अखेर पराभूत मानसिकतेत औरंगजेबाचा महाराष्ट्रातच मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर मुघल साम्राज्याचे अतिशय वेगाने पतन झाले. पुढे अठरावे शतक शिवाजीमहाराजांच्या राजकीय वारसदारांनी गाजविले. संपूर्ण देश मराठ्यांनी व्यापला. मराठ्यांची घोडी सिंधू, गंगा तसेच कावेरी नदीचे पाणी प्यायली. मराठ्यांनी ओडिसा जिंकून बंगालवर स्वाऱ्या केल्या आणि दिल्लीवरदेखील भगवा फडकविला. अटक ते कटक आणि कुमाऊँ ते कावेरी असे विशाल साम्राज्य मराठ्यांनी निर्माण केले. आधुनिक भारतालादेखील सर्वांगसुंदर बनविण्याचे बहुतांश श्रेय मराठ्यांनाच जाते आणि हे सर्व मराठे शिवाजीमहाराजांचेच अनुयायी आहेत.
भारताला सुजलाम् सुफलाम् बनविण्याचा पाया घालणाऱ्या शिवशाहीचा इतिहास डॉ. केदार फाळके यांनी या ग्रंथात संशोधकीय पद्धतीने मांडला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट देण्यासारखे हे पुस्तक आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज
लेखक: डॉ. केदार फाळके
मूल्य- १२० ₹. पृष्ठे- १२४
कुरिअर खर्च- ५० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)