Details
मराठा आरक्षण : राष्ट्रवादीला मोठा धक्का
04-Dec-2018
| 0
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
काँग्रेस, राष्ट्रवादीचं मराठा आरक्षणाचं भिजतं घोंगडं बाजूला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या चतुराईने सर्व पक्षांना एकत्र आणून “मराठा आरक्षण विधेयक” दोन्ही सभागृहात मंजूर केले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरांच्या वेळी जो अनुभव राज्याच्या वाट्याला आला होता, तसेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते. मराठा मूक मोर्चा, त्यानंतर मराठा ठोक मोर्चा असे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघालेत. तेही शांततेने. त्यात ना कोणा समाजावर राग, ना चीड. फक्त आम्हाला न्याय द्या… एवढी साधी मागणी त्या समाजाची होती. त्यामुळे मराठा समाजाने इतरांसमोर एक आदर्श ठेवताना “महाराष्ट्र धर्म ” कसा वाढवायचा याचेही सर्वांना दर्शन घडविले.
महाराष्ट्र धर्म म्हणजे देवळात जाऊन घंटा बडवायचं नाही तर सर्व समाजबांधवांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहून महाराष्ट्राचा विकास करायचा. विकास म्हणजे धर्म, कर्तव्य होय. कदाचित देशभरातील इतर राज्यांनाही मराठा मोर्चा व फडणवीस सरकारचे कौतुक करावेसे वाटले असेल. राज्यात तेल लावलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ पहिलवान असताना एका तरूण मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी ‘फड’ जिंकावा ही किमया जरी मोठी असली तरी त्यांनी महाराष्ट्रातील काहींची मक्तेदारी मोडली याची इतिहासात नोंद होईल.
देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि स्वयंघोषित जाणता राजाने जातीचे राजकारण करण्यास सुरूवात केली. पूर्वी राजे पेशवे नेमायचे आता पेशवे राजांना खासदारकी देऊ लागले, असे जातीवाचक विधान करून विष कालवण्याचा प्रयोग पवारांनी केला. पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मराठयांनी ना मराठेतरांनी साथ दिली. आज काय परिस्थिती आहे? शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष बॅकफुटवर गेला आहे. ५० वर्षांच्या राजकारणात आपल्याला पाहिजे तशी भाकरी फिरवून स्वतःच्या प्रतिमेभोवती गिरक्या मारून त्यांनी धन्यता मानली. साखरसम्राट, शिक्षण सम्राट, सहकारी बँका,
पतपेढ्या यांना जहागिरी वाटून शेतकरी, कामगारांना वोटबँकेच्या छावणीत आणले. देशातील शेतकर्यांना कर्जमाफीसाठी ७१ हजार कोटी देऊन कर्जमाफीची बिरूदावली स्वतःच्या छातीवर लावून घेतली. त्यापैकी सात हजार कोटी महाराष्ट्राच्या वाटेला आलेत आणि शेतकर्यांची कर्जमाफी होण्याऐवजी बँकांचाच फायदा झाला. शेतकरी पुन्हा हातात कटोरा घेऊन सावकारांच्या दारात उभा राहिला. त्यावेळी शरद पवारांना ना दुःख, ना चिंता… त्या शेतक-यांची. मराठा समाजावर आपलीच मक्तेदारी आहे या विचाराने प्रेरित असलेल्या पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. तेव्हापासून मराठा समाजातील तेच तेच जहागिरी चेहरे व त्यांचे सगेसोयरे पक्षात वावरू लागले. जो सोयीचा त्याला गोंजारायाचे आणि जो नकोसा त्याला दारात उभे करायचे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रशासनात काम करण्यात ‘बाप माणूस’ आहेत. कामाचा फडशा कसा उडवायचा ते त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे. सन २००४ मध्ये काँग्रेस पक्षापेक्षा अधिक तीन आमदार राष्ट्रवादीकडे होते आणि त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतले असते तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मात्र प्रशासनाचा दांडगा अभ्यास असलेले ‘बुलेट ट्रेन’ अजितदादा यांना आलेली संधी गमावून केवळ गृह, सार्वजनिक बांधकाम अशी क्रीम खाती घेऊन राष्ट्रवादीची रसद वाढविण्याकडे पवारांनी लक्ष दिले. मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊन शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाची घसरण झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळा बाहेर काढून क्रीम खात्यावर उड्या मारणार्या राष्ट्रवादीला त्यांनी वेसण घातले. राष्ट्रवादीकडे गृहखाते द्यायला नको होते, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादी घोटाळेबाज आहे याची जाण महाराष्ट्राला करून दिली.
राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, गणेश नाईक, भास्करराव जाधव, सुनील देशमुख या नेत्यांना खासदारकीसाठी दस्तुरखुद्द शरद पवारांना विनवणी करावी लागत आहे. पण या पहिल्या फळीतील नेत्यांना खासदार म्हणून आगामी निवडणूक लढवून पायावर दगड मारून घ्यायचा नाही. लोकसभेत जाऊन मतदारसंघातील मक्तेदारी त्यांना घालवावयाची नाही. ही राष्ट्रवादीची खरी शोकांतिका आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या आज्ञेत आहे हे जरी चित्र दिसत असले तरी हेच नेते राज्यातील सत्ता गेल्यावर शरद पवारांना कसे विचारात घेत नाहीत त्याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे. पवारसाहेबांचा ७५ वा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ७५ लाख वह्या वाटण्याचा संकल्प असल्याचे भर पत्रकार परिषदेत सांगितले होते आणि त्याची जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमराज शाह यांच्यावर टाकण्यात आली होती. मात्र हेच हेमराज शाह ७५ लाख वह्यांसाठी माजी मंत्री व खासदारांकडे पैसे मागायला जात तेव्हा त्यांना ते तारीख पे तारीख द्यायचे. परंतु विद्यार्थ्यांसाठी वह्या छापण्यासाठी कोणी पवारप्रेमी मंत्री, आमदार पुढे आला नाही. उलट हेमराज शाह समोर दिसताच हेच नेते त्यांना टाळत होते. शेवटी त्यांनी हा नाद सोडला व शिवसेना गाठली.
यापुढचे चित्र वेगळे असणार आहे. राष्ट्रवादीतील साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सहकारी बँकेच्या कॅश बॉक्सवर बसलेले नेते स्वतःचं साम्राज्य सावरण्यासाठी शरद पवारांना सोडचिठ्ठी देऊन कमळ किंवा धनुष्यबाण केव्हा हातात घेतील हे सांगता येत नाही. ताजं उदाहरण म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘मी पवारांना कमळाचा बुके देऊन आलोय’ असे सांगितले. असले बुके द्यायला राष्ट्रवादीचे अनेक पवारनिष्ठ वाटेवर आहेत. पवारांची ही शोकांतिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रताळे जमिनीखाली की जमिनीवर उगवतं हे ठाऊक नाही अशी त्यांची टिंगल करत शरद पवारांनी राजकारण केलं. त्याच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत मागील विधानसभा निवडणुकीत सेनेचे 63 आमदार निवडून आणले होते आणि स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणारे शरद पवारांना 41 आमदार निवडून आणताना धाप लागली. सत्तेच्या जवळ वावरणारे पवार यांनी भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर त्यांना पाठींबा न मागताही पाठींबा देण्याचे महान कार्य केले आणि तेव्हाच त्यांची पत घसरत गेली. गेली चार वर्षे भाजपाबरोबर सत्तेत राहून मोदींच्या आणि फडणवीस यांच्या कारभारावर बाण सोडणारे उद्धव ठाकरे यांचे राजकारण उजवे ठरले. नाणार रिफायनरी प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवत असल्याचे सांगण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. त्यांनी शरद पवारांशी दोस्ताना करणार्या खासदार नारायण राणे यांनाही त्यांची जागा दाखवून दिली. लोकहिताच्या प्रश्नावर ठामपणे उभे राहिल्यास मित्रपक्षाला दखल घ्यावी लागते हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. मात्र सत्ता जाताच नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करण्याचे नाटक शरद पवारांच्या अंगाशी आले. त्यामुळे त्यांचा मित्र पक्ष काँग्रेसही त्यांच्याबरोबर हटकून वागत आहे. आज राष्ट्रवादी महाआघाडीबरोबर आहे. पण पवारांवर राहुल गांधीही विश्वास ठेवायला तयार नाहीत. भाकरी केव्हा फिरवायची यात तरबेज असलेले शरद पवार हे पूर्णतः अपयशी ठरले आहेत. पण त्यांच्या हाता-खांद्यावर खेळलेले उद्धव ठाकरे उजवे ठरले आहेत. नाईलाजाने त्यांना बंद पडलेल्या इंजिनाचा आता आधार घ्यावा लागत आहे. घरातला अनुभवी उत्तम प्रशासक असलेले अजित पवार यांना कायमचे अडगळीत ठेवून आता त्यांना महाराष्ट्राला नकोसा झालेले राज ठाकरे ‘वेळेला केळ बरं’ म्हणून त्यांचा हात पकडला आहे. महाराष्ट्राच्या जाणता राजावर ही वेळ यावी, ही शोकांतिका मानावी लागेल.
आजचा मराठा तरूण समजूतदार आहे, शिकलेला आहे. आपल्या जातीच्या माणसाने तोंडात माती घातल्यावर त्याला आता वेगळा विचार करावा लागत आहे. मराठा जातीच्या नावावर यापुढे राजकारण करता येणार नाही, सर्वांना घेऊनच पुढची वाटचाल करता येईल. न जाणो, मराठा आरक्षणातून पुढे आलेलं नवं नेतृत्व प्रस्थापित मराठा नेत्यांविरोधात दिसेल. राष्ट्रवादीकडे पक्का विचार नि आचार नसल्याने त्यांची होडी किनार्यावर कधीच लागली नाही. सोयीचं राजकारण हेच धोरण ठेवल्याने नेते स्थिरावले पण कार्यकर्ते मात्र भिकेला लागले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे पाप यापुढे फेडायचे आहे. काळ कठीण आहे, पण हे नाकारण्याचे धाडस राष्ट्रवादीचे नेते करणार नाहीत. मराठा आरक्षण लढा महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार हे आता अधोरेखित झाले आहे.”

