Details
किती निर्लज्ज आहेत हे नेते!
21-Feb-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
गेल्या आठवड्यात भारताचे ४४ जवान भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचे चोख उत्तर देण्याची प्रतिज्ञा भारतीय जवानांनी केली. जवान म्हणजे पुढारी नव्हेत. वचन देऊन ते न पाळणारे भ्रष्ट सत्ताधारी नव्हेत. किंबहुना, `प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीप्रमाणे वागणारे भारतीय जवान सर्वश्रेष्ठ देशभक्त आहेत. त्यांनी आपल्या देशभक्तीचा सज्जड पुरावा सोमवारी दिला. ज्या ठिकाणी ४४ जवान शहीद झाले त्या ठिकाणापासून जवळच त्यांनी या हल्ल्यामागील सूत्रधाराला घेरले. त्याला त्यांनी टिपून मारले. भ्याड अतिरेकी हल्ल्याचे चोख उत्तर देण्याची प्रतिज्ञा भारतीय जवानांनी काही तासांत अंमलात आणली. पण हे करत असताना भारताचे चार जवान शहीद झाले.
त्यापैकी विजयकुमार (वय 27) हा एक होता. विजयकुमार हा पश्चिम उत्तर प्रदेशातील मिरत जिल्ह्यात असलेल्या बस्सी गावचा रहिवासी होता. त्याचे वडीलदेखील लष्करात होते. त्याने 2011 साली लष्करात प्रवेश केला. 2015 साली त्याचा विवाह झाला. त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. पण आपल्या प्राणांची अथवा आपल्या कुटुंबियांच्या भवितव्याची पर्वा न करता विजयकुमार शहीद झाला. त्याच्या बलिदानाने त्याच्या गावावर शोककळा पसरली. त्याच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले. पण या नेत्यांना खरंच दु:ख झाले होते का? विजयकुमारच्या बलिदानाने ते हळहळले होते का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने त्रिवार नाही, असेच द्यावे लागेल. केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह आणि मिरतचे भाजपचे खासदार राजेंद्र अगरवाल हे अंत्यविधीच्या परिसरात पायात जोडे घालून गप्पा मारत बसले होते. विजयकुमार यांच्या नातेवाईकांच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी या नेत्यांवर ओरडून त्यांना त्यांच्या संवेदनाहीनतेची जाणिव करून दिली. त्यानंतर या नेत्यांनी हात जोडून लोकांची माफी मागितली. पण `बूंद से गयी वो हौद से नही आती’ या म्हणीनुसार त्या नेत्यांच्या हात जोडण्यामुळे त्यांचा निर्लज्जपणा काही दडला नाही. त्यांची गेलेली अब्रू परत आली नाही.
दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सत्यपाल सिंह आणि अगरवाल हे हसताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. हा तर निर्लज्जपणाचा कळस होता. किती निर्लज्ज आहेत हे नेते! असे आम्ही म्हणूनच उद्वेगाने म्हटले आहे. एखादा जवान देशासाठी शहीद होतो तेव्हा तो कायमचा अमर होतो. इतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जाते. त्याच्या कुटुंबियांकडे सदैव आदराने पाहिले जाते. म्हणूनच 1965 च्या भारत-पाक युद्धात अंगावर पाकिस्तानच्या गोळ्या झेलत शहीद झालेला अब्दुल हमीद आजही आठवतो. त्याने पाकिस्तानी लष्कराशी दिलेली कडवी झुंज आजही भारतीयांची छाती अभिमानाने फुलवते. अब्दुल हमीद यांच्यासारखे जांबाज जवान भारतीय सैन्यात आहेत म्हणूनच भारतीय सीमा सुरक्षित आहेत. आपण भारतीय सुरक्षित आहोत. पण सैनिक सीमेवर शहीद होत असताना राजकीय पुढारी मात्र प्रत्येक आघाडीवर लाजिरवाणे कृत्य करीत आहेत, याला काय म्हणावे?
एखाद्याच्या अंत्यविधीला गेल्यानंतर चेहरा गंभीर राखून मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करणे, हा साधा शिष्टाचार झाला. पण आपल्या पुढाऱ्यांकडे ते सौजन्यदेखील असू नये? लोकप्रतिनिधी होण्यास अथवा मंत्री होण्यास शिक्षणाची किंवा वयाची अट नाही. म्हणूनच अडाणी माणूसदेखील मंत्री होऊ शकतो. पण वरील प्रसंगातील मंत्रीमहोदय हे अडाणी नाहीत. चांगले उच्चशिक्षित आहेत. सत्यपाल सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आयुक्तपदाचा राजीनामा देऊन ते राजकारणात दाखल झाले. त्यांनीदेखील असे लाजिरवाणे कृत्य करावे, याचा खेद होतो. ज्या भारतीयांसाठी आपले जवान बलिदान देत आहेत, ते भारतीय त्या लायकीचे आहेत का, असा प्रश्नदेखील पुढाऱ्यांच्या निर्लज्जपणामुळे पडतो. शहीद जवानांनो, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. आम्हाला क्षमा करा!”

