Details
जातीचे किडे आणि जातीचेच राडे!
10-May-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि अठरापगड जातींना समतेच्या एकाच झेंड्याखाली आणणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरोगामी महाराष्ट्र. संतांच्या विचारधनाचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आजही जातीसाठी माती खायला तयार असतो आणि आहे? या मतासाठी तुम्ही-आम्ही समंत आहोत? ‘जात’ नावाचं हे बीज जात नि धर्मच सर्व काही मानणार्यांच्या मनात, नसानसांत आजही भिनलं आहे. तो शिकला सवरलेला आहे, दिसायला सुसंस्कृत आहे. नव्या जगासोबत स्पर्धाही करतो आहे, आधुनिकतेची भाषा बोलतो आहे. गावाशिवात राहून स्वत:ला विचारांनी मॉर्डन मानतो आहे. पण, आचरणात आजही तो ‘जातीवंत’ आहे. तो, ती, हा खालच्या जातीतला, मी वरच्या जातीतला. आता जात उरलीच कुठे आहे? हा समाजातील बर्याचअंशी झालेला बदल सुखावणारा असला तरी पुरोगामी महाराष्ट्राची लाज आजही याच ‘जाती’साठी माणसाची खांडोळी करायला निघालेले लोक काढत आहेत.
जन्मदात्या आई-वडिलांपासून स्वत:चा आणि प्रियकराचा जीव वाचवण्यासाठी एका तरुणीचा लढा सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. पुण्याजवळील नवलाख उंबरे गावची रहिवासी असलेली प्रियांका शेटे नावाची ही तरुणी मातंग समाजातील एका तरुणावर जिवापाड प्रेम करते. त्याच्यासोबत लग्न करून सुखद संसाराची स्वप्नेही ती पाहत आहे. परंतु या सर्व प्रकियेत या तरुणाची ‘जात’ तिला आडवी येते आहे. हा तरुण खालच्या जातीतला असल्याने प्रियांकाच्या माता-पित्यांचा आणि कुटुंबियांचा या दोघांच्या लग्नाला तीव्र विरोध आहे. अगदी आपलचं कुटुंब आम्हा दोघांच्या जिवावर उठल्याचेही ही तरुणी सांगत आहे. प्रियांकाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत दाखल केलेल्या याचिकेत स्वत:चा व प्रियकर विराजचा जीव वाचवावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
आंतरजातीय विवाह आणि प्रेमप्रकरणाला कौटुंबिक विरोध असलेलं प्रियांका आणि विराज हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलंच उदाहरण नाही. अशा सैराट रूपाचं दर्शन आजही गाव आणि गावकुसाबाहेर, शहरात घडते आहे. तिथं आपल्या मनावर जाती-धर्माचा मळवट किती घट्ट बसला आहे, हे समाजासमोर वास्तव रूपात आपल्या भवताली येते. पिढ्यान्पिढ्या समाजासमाजात वाढत चाललेली जातीपातीची दरी कमी करून माणूस म्हणून माणसाचा स्वीकार करू! पुरूष आणि स्त्री या दोनच मानवजाती आहेत, हा विज्ञानवाद आपणही खुल्या दिलाने स्वीकारू! पण, माझ्या, तुझ्या, त्याच्या, याच्या आणि आपल्या मनातील ‘जात’ नावाची मळमळ, तळमळ बाहेर आल्याशिवाय राहत नाही. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, आरक्षण, शिक्षण हा विषय निघाला की आपल्या जातींची टक्केवारी वारूळातून मुंग्या बाहेर पडल्यागत झरझर वर यायला सुरूवात होते. खैरलांजी ते कोपर्डी, गुजरातमधील उना ते उत्तर प्रदेशातील अखलाक येथे माणूस मेल्याची, माणूस गमावल्याची चर्चा होताना होत नाही. पण, ‘सोशली’ जातीची मळमळ अधिक प्रकर्षाने बाहेर पडते. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध, जैन अशा विविधतेत एकता सांगणार्या आपल्या देशात आंतरधर्मीय प्रेमसंबंधातून तरुणाला पेटवले जाते. ठिकाण आपणच म्हणत असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातील (पुणे जिल्हा. इंदापूर ता.). किस्मत शब्बीर शेख (वय 19, रा. टण्णू, आडेबावस्ती) हा तरुण आंतरधर्मीय विवाहाचा विचार करतो, एका परधर्मीय मुलीवर प्रेम करतो हीच त्याची मोठी चूक ठरते. धर्मआंधळे काही लोक किस्मतला पेटवून दिल्यानंतर लागलीच आपल्या मुलीचे दुसर्या तरुणासोबत लग्नही उरकून घेतात. हाच स्वत:ला माणूस म्हणवून घेणार्यांतील ठासून भरलेला धर्माभिमान?
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता जाती-पातींचे तंटे गावखेड्यांतून ठळकपणे समोर येऊ लागले आहेत. अगदी अमक्या एका पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने अमक्या एका व्यक्तीचे घर पेटवून दिले. प्रस्थापितांनी त्याच्यावर व कुटुंबीयांवर बहिष्कार घालणे, मारहाण करणे आदी घटना समोर येऊ लागल्या आहेत. ही जातीची मळमळ की सत्तेसाठी आदळआपट मानावी? देशाच्या विकासासाठी अहोरात्र खपणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कोणताही विचार न करता अगदी सहजपणे म्हणतात ‘मी खालच्या जातीतला असल्याने विरोधक माझ्यावर सडकून टीका करतात’,. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जानवेधारी काश्मिरी ब्राम्हण, असा त्यांच्या जातीचा उल्लेखही आवर्जून होतो. ते फक्त जातीपातीचीच समीकरणे, गणिते जुळवण्यासाठी? त्यानंतरही आम्हीच विकासाचे खरे ठेकेदार, आमच्या नसानसांत राष्ट्रवाद या गोष्टींवर सामान्यजनांनी तरी विश्वास कसा ठेवायचा? जाती-धर्माची बंधने झुगारून आंतरजातीय विवाहासाठी सरकार व समाजमान्यता, उमेदवाराच्या जातीपेक्षा प्रभागाच्या विकासाला महत्त्व, साहित्याला जातीची भिंग न लावता पाहणे आणि नेत्याला अमक्या-तमक्या समाजाचा म्हणून त्याच्या कार्य आणि कृर्तत्त्वाची ओळख जगाला पटू न देणे, थोर-पुरूष संताचे कार्य एका जातीपुरते, समाजापुरते मर्यादित न ठेवणे, साहित्यातही जात शोधणे ही जाती-धर्माची आपणच बंद केलेली कवाडे उघडणे हाच त्यावरील जालीम उपाय नाही का? या उपायांवर पिढ्यान्पिढ्या, वर्षानुवर्षे विचारमंथन व काही प्रमाणात अंमल होत असला तरी जातीचे किडे आणि जातीचे राडे माणसा-माणसांत देव शोधणार्या माणसालाच का अधिक वेदना देत आहेत?”

