नानाविध कला,सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांनी पूर्वापार चालत आलेली भारतीय संस्कृती भौगोलिक दृश्यमान निसर्ग यातही अग्रेसर आहे. याच्याच शोधाच्या आनंदासाठी विदेशी पर्यटक इथे येत असतात. आता कोरोनामुळे हा ओघ आटलाय तरी ही खासियत नाहीशी होणार नाही! भारतीय आयुर्वेद असो, शिल्प कलाकुसर, अशा अनेक बाबी इथे आहेत. प्रादेशिक वैशिष्ट्ये आहेत. पण अनेकांना इथले सोडून परदेशी इमारती, तांत्रिक बाबी यांचच विलक्षण आकर्षण असते. हे एक गूढच नाही का?
असो. अनेक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण हजार वर्षांपासून भारतीय भूभागाच्या अति पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशाच्या तवांग इलाख्यात हस्तकागद निर्मिती होत होती. मोनपा या प्रकाराने निर्मितीची ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर होती. तिच्यावर काही वर्षं काम करून खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने तिचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले. एका विशिष्ट प्रकाराने या कागदाची निर्मिती होते. त्याला तिकडच्या भाषेत मोनपा संबोधले जाते. पुढील काळात तवांगच्या भागात स्थानिक रीतीरिवाज नि संस्कृतीचा अभिन्न घटक, घरोघरी उत्पादन अशी ओळख करत उपजीविकेचे प्रमुख स्रोत असे स्थान प्राप्त केले होते. मात्र, जवळपास गेल्या शंभर सव्वाशे वर्षाच्या औद्योगिक क्रांतीने ही हातकागद निर्मितीची कला लोप पावत चालली होती. सध्या मरणप्राय स्थितीत होती. एक आव्हान म्हणून याचा पुनरुद्धार करण्याची मोहीम खादी ग्रामोद्योग विभागाने घेतली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यावर पूर्वेकडे पाहा अशी नुसती घोषणा न करता त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय करून, राज्यमंत्री देऊन दुर्लक्षित उपेक्षित राहिलेला भाग देशाच्या प्रमुख प्रवाहात कसा येईल हे पाहिले गेले.
या राज्यातील तवांग शहरात मोनपा हस्त निर्मितीचे एक केंद्र चालू करून त्यातून युवकांना या कलेचे व्यावसायिक शिक्षण देत उदरनिर्वाहाचे साधन मिळेल. या कलेचे केवळ संगोपन, पुनरुज्जीवन करण्याचाच हेतू नसल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना या केंद्राच्या उदघाटनप्रसंगी म्हणाले. उत्तम प्रकारची बनावट असलेला हा कागद तवांग संस्कृतीचा अभिन्न हिस्सा आहे, ज्याला स्थानिक भाषेत मोन शुगू म्हटले जाते. या कागदाचं ऐतिहासिक नि धार्मिक महत्त्व असे आहे की, हा बौद्ध मठात धर्मग्रंथ नि स्तुती कवन लिहिण्यासाठी उपयोगात येतो. शुगू शेंग नावाच्या स्थानिक झाडाच्या सालीपासून बनवला जाणार आहे, ज्या सालीचे स्वतःचे असे औषधीय मूल्यदेखील आहे. येथील भागात याची उपलब्धता लक्षात घेता कच्च्या मालाची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय.
त्याकाळीही चिनी घुसखोरी!
या आधीच्या काळात मोनपा कागदाचे उत्पादन इतके व्हायचे की तो तिबेट, भूतान, थायलंड, जपान अशा देशांना विकला जायचा. कारण त्या देशाकडे कागद निर्मिती उद्योग नव्हता. मात्र, पुढील काळात या स्थानिक उद्योगात घसरण सुरू झाली. स्वदेशी हात कागदाऐवजी खालच्या दर्जाच्या चिनी कागदाची घुसखोरी होऊन दबदबा निर्माण झाला. या हातकागद निर्मिती प्रक्रियेचा पुनरुद्धार करण्याचा एक प्रयत्न १९९४मध्ये करण्यात आला. पण तो असफल ठरला. तवांग भागातील विविध भौगोलिक आव्हानांचा विचार करता हे एक कठीण कार्य बनले.
मोनपा कोण आहेत?
अति पूवेकडील अरुणाचल प्रदेशातील मोनपा नावाचा आदिवासी समूह आहे. सध्याच्या काळात त्याची लोकसंख्या नगण्य अशा आकड्यात आहे. यातील काही लोक तिबेट नि भूतानच्या भागात आढळतात. अरुणाचल भागातील तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यात यांची वस्ती आढळते. एकूण जनसंख्येचा विचार करता दहा वर्षांपूर्वी हे मात्र ८५ हजार इतके होते. यातील ६०,५४५ इतके अरुणाचलात, २५ हजार तिबेटात तर उर्वरीत ३ हजार भूतानमध्ये आहेत. त्यांना अन्य नावानेही ओळखले जाते जसे मेनबा, मोईनबा, मोंनबा, मेनपा, मोंगपा! केंद्रीय हिंदी संस्थानने विविध ८० बोली भाषांमधील भाषाकोष तयार करण्याचे ठरवले आहे. यात पूर्वेकडील हिंदी खासी, हिंदी गारो, हिंदी मोनपा, हिंदी मिजो हिंदी बोडो, अशा विचाराधीन आहेत. बदलत्या काळानुसार अनेक बोली भाषा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
अलीकडच्या काळात खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वरिष्ठ स्तरावरील भक्कम मानसिकतेमुळे अनेक अडचणी उद्भवूनदेखील या केंद्राची स्थापना यशस्वीपणे करण्यात यश मिळाले आहे. आयोग अध्यक्षांच्या निर्देशानुसार कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूट, जयपूर येथील संशोधक नि अधिकारीवर्गाच्या पथकाची नेमणूक या केंद्राच्या स्थापनेसाठी आणि स्थानिक लोकांच्या प्रशिक्षणासाठी केली गेली. सहा महिन्यांतून अधिक काळाच्या आव्हानात्मक प्रयत्नानंतर या उपक्रमास यश मिळून हे केंद्र चालू होऊ शकले.
सध्या या कागद केंद्रात नऊ कारागीर कार्यरत कारण्यात आले असून ते दररोज पाचशे ते सहाशे हस्त कागद शीटचे उत्पादन करतील. त्यांना सुरुवातीला चारशे रुपये प्रतिदिन असा रोज मिळेल. या कागद निर्मिती प्रक्रियेचे बारा महिला नि दोन पुरुषांना पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. कुमारप्पा इन्स्टिट्यूट, जयपूर ही खादी आयोगाची संस्था आहे. तवांगमधील खराब हवामान नि दुर्गम डोंगरी भाग हे अधिकाऱ्यांपुढे मशिनरी पोहोचवण्यासाठी मोठे आव्हान होते. अरुणाचल प्रदेश सरकारकडून सदर योजनेला पूर्ण पाठिंबा तर मिळालाच शिवाय केंद्र उभारणीसाठी किमान भाड्याची इमारत मिळवून देण्यात आली. मोनपा हातकागद उद्योगाचे पुनरुज्जीवन करून याची व्यावसायिक उत्पादनवृद्धी हेच मुख्य उद्दिष्ट होतं असं केव्हीआयसीचे अध्यक्ष सक्सेना म्हणाले. या हातकागदाच्या वैशिष्ट्यामुळे याचं व्यापारीमूल्य मोठं आहे. याचा उपयोग करून स्थानिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. याच्या उत्पादनवाढीमुळे दुसऱ्या देशात निर्यात करून गेल्या काही दशकात चीनने मिळवलेला ताबा परत आपल्याला मिळू शकतो. हे एक महान विश्व क्षमतेचे उत्पादन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्थानिक ते वैश्विक’ (local to global) या मंत्राशी जोडले आहे.
स्थानिक राज्य सरकारने दिलेल्या सहकार्याचे कौतुक करीत हा गौरवपूर्ण उद्योग सुरू करणं ही सौभाग्याची बाब आहे. तवांगला यासह अन्य दोन उद्योगासाठी ओळखलं जातं त्या म्हणजे हाताने बनवलेली मातीची भांडी आणि विविध लाकडी सामान (फर्निचर), जे काळाबरोबर लोप पावत चालले आहेत. या दोन्हीच्या पुनरुद्धारासाठी लवकरच योजना सुरू केली जाईल. कुंभार सशक्तीकरण योजनेंतर्गत मातीच्या भांड्यांसाठी लवकरच सुरुवात होईल. हे कागद निर्मिती केंद्र स्थानिक तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणूनही काम करेल. हातकागदाला केवळ वितरित करणार नाही तर बाजारही मिळावा म्हणून शोध घेतला जाईल. देशाच्या अन्य भागात अशा इतर प्रकारची केंद्र उभारण्याची योजना आयोगाची असेल. येथील प्लॅस्टिक कचऱ्यात घट व्हावी म्हणून तवांग येथे प्लॅस्टिकमिश्रित असा अभिनव हातकागद उत्पादन चालू करण्याचा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला. अलिकडेच पूर्वेकडील भागात होत असलेल्या आल्याच्या (अद्रक, जिंजर) निर्मितीला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकार योजना करत असल्याचे समोर आले आहे. त्याविषयी सविस्तर लवकरच!