मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मुंबईत उभारण्यात येणार्या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक ७ला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक ७’ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. सर्वच स्तरातील जनसामान्यांची त्यांच्याप्रती आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसूड ओढले. मार्मिकसारख्या व्यंगचित्र मासिकामधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत ठेवण्याचे महानकार्य शिवसेनाप्रमुखांचे होते.
१९ जून १९६६ रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना होऊन या पदाच्या प्रमुखपदावर अर्थात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानने अत्यंत स्वाभिमानाने स्वीकारले. कुठल्याही राज्यातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम केल्यास त्या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास जास्त वेळ लागत नाही. ही त्यांची दूरदृष्टी १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर जनतेला पाहायला मिळाली, ती मुंबईत उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या रुपाने. उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे या महाविभूतीचे, व्यंगचित्रकाराचे, मराठी मनाच्या अस्मितेचे, हिंदुत्वरक्षकाचे नाव ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो क्रमांक ७’ देऊन त्यांच्या या कार्याचा यथेच्छ सन्मान करावा, असा प्रस्ताव आमदार वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
या प्रश्नी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला असून चर्चाही करण्यात आली आहे. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव तसेच एमएमआरडीएचे आतिरिक्त आयुक्त डॉ. सोनिया शेठ यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला आहे.