सूक्ष्म उद्योग सुरू करा. पुढे लघु उद्योजक बना. नंतर मध्यम उद्योजक बना. ३-४ वर्षांपासून पुढे २०-२० वर्षांचे नियोजन करून उद्योग सुरू करा. यासाठी हवे ते मार्गदर्शन, मशीनरी, निर्यातीसाठी हवी ती मदत करण्याचे काम आमचे मंत्रालय करते. केंद्र सरकार करते. राग हा विकासाच्या कामातला व्यत्यय आहे. एखाद्याला भेटायला गेलो. तास-दोन तास उभे राहवे लागले तर राग येतो. आपण निघून जातो. पण त्याने काम होत नाही. चिकाटी ठेवा. उत्तर भारतात फक्त .७ टक्के उद्योग होते. आता तेथे किती पटीने वाढले आहेत ते बघा. चिकाटी आणि जिद्द बाळगली तर सर्व काही करता येते. मी व्यवसायातूनच प्रगती करत त्यातून राजकारण केले. दुसऱ्याच्या पैशावर, दुसऱ्याच्या खिशात हात घालून राजकारण करत पेपरमधून झळकत नाही राहिलो, असा टोला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला.
दुपारी दोन ते चार, या वेळेत राणे यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना उद्योजक होण्यासाठी तसेच इतरांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी आपले मंत्रालय कोणते प्रयत्न करत आहे, याची माहिती देत मार्गदर्शन केले. त्यांच्या मंत्रालयातले अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या मुंबईतूनच देशाच्या तिजोरीतले ३४ टक्के उत्पन्न जाते. पण, यात आपण नेमके कुठे आहोत हे पाहिल्यास आपण कुठेच नाही हे दिसून येईल. त्यामुळे आत्मपरीक्षण करा. उद्योजक होण्याची आणि उद्योजक घडवण्याची मानसिकता तयार करा. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करा. यासाठी लागेल ती मदत तयार करण्यासाठी आमचे मंत्रालय तयार आहे, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज दिली.
या दरबारात अनेकांनी आपापल्या समस्या मांडल्या. या समस्यांचा अभ्यास करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. काहींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विषय मांडला. पण, तो विषय केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांच्याशी थेट संबंधित आहे. त्यावर आपण काहीही करू शकत नाही. देशाचा अर्थसंकल्पच ३४ लाख कोटींचा आहे. यंदा तो आणखी वाढेल. जितका अर्थसंकल्प मोठा तितके उत्पन्न वाढायला हवे. देशाला आत्मनिर्भर करायचे असेल, महासत्ता होण्याकडे वाटचाल करायची असेल तर यादृष्टीने विचार करावाच लागेल, असे ते म्हणाले.
देशात साधारण सात कोटी उद्योजक आहेत. त्यातून ११ कोटी रोजगार निर्माण झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेत उद्योजक होण्याची मानसिकता दिसत नाही. मी लहान वयातच उद्योजक झालो. मला मार्गदर्शन करणाऱ्यांनी सांगितले की, आता तुम्हाला पगार किती मिळतो- पाच हजार.. पुढे तो १० हजार होईल.. त्यात पुढे प्रमोशन मिळाले तर एक लाख होईल. पण पुढे काय? सल्ला ऐकला आणि उद्योजक झालो. आज दोन लाख, पाच लाख, २५ लख, ५० लाख मिळवणारेही आहेत. मुंबईत हातगाडी ढकलणारा आज जुहूला बंगल्यात राहतो. मर्चिडीस घेऊन फिरतो, असे नारायण राणे म्हणाले.
नारळाच्या किशीवर आधारीत उद्योग केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा चार राज्यांतच होते. आता दुसऱ्या राज्यांमध्येही, जेथे नाहीत तेथे मदत केली पाहिजे, असे धोरण आपण स्वीकारले आहे. पुढच्या २०-२५ वर्षांत कोणत्या उद्योगांना चांगला वाव आहे, याची चाचपणी करून उद्योग सुरू करा. आता कोकणातही उद्योग जाणार.. महाराष्ट्रात इतत्रही जाणार.. असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला.
आज दोन तरूणी येथे आल्या होत्या. त्यांनी नवीन प्रॉडक्ट तयार केले आहे. जम्मूमध्ये त्यांनी फॅक्टरी चालू केली आहे. इतक्या लांब जाऊन उद्योग उभारण्याची त्यांची जिद्द पाहून समाधान वाटले. अशी उदाहरणे बघितली पाहिजेत. पुढच्या वेळी येईन तेव्हा प्रत्येक पुढाऱ्याने आपण किती उद्योजक तयार केले हे सांगायला पुढे आले पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी अशा भेटीगाठी घेणार आहे. तेव्हा भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझे आवाहन राहील की, त्यांनी जास्तीतजास्त उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने दरबारात सहभागी व्हावे. दिवसातून १६-१६ तास मी काम करतो. फक्त बरे नव्हते तेव्हा आयुष्यात एकदाच २२ दिवस आराम केला. प्रत्येकाने तशी मेहनत घेण्याची तयारी दाखवावी, असे आवाहनही राणे यांनी केले.

