पर्यावरणस्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून त्यामध्ये काल स्वाक्षरी करण्यात आलेले तीनही सामंजस्य करार महत्त्वाचे आहेत. सन २०२८पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसेस विद्युत ऊर्जेवर धावणाऱ्या अर्थात इलेक्ट्रीक असतील, असे उद्गार राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन असे हे तीन उपक्रम असून या तीनही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर पालिका मुख्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ठाकरे बोलत होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते.
बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे तीन नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहेत, असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे भान राखून त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी याआधीच निरनिराळ्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरी वनीकरणाचा भाग म्हणून गत दीड वर्षभरात लावलेली सुमारे अडीच लाख झाडे, असे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. त्यापुढे जाऊन आता पर्जन्य जलसंवर्धन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये परिसर व शक्य तिथे शोष खड्डे करुन त्यात पाणी मुरवले पाहिजे. वाहतूक बेटं, उड्डाण पुलांखालील जागा, मैदानांभोवती कुंपण स्वरुपात याप्रमाणे झाडांची लागवड केली पाहिजे. वातावरण बदल तीव्र होत असून त्याचा सामना सर्वच देशांना करावा लागत आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शाश्वत विकासासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रीक असेल. सन २०२८पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा इलेक्ट्रीक बसचा असेल, असा मानस व्यक्त करुन बेस्टच्या डबल डेकर बसेस इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन फ्युएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल, त्या ऊर्जेवर धावताना दिसतील, असेही त्यांनी नमूद केले.
काल झालेल्या करारांची संक्षिप्त माहिती
वुमन फॉर क्लायमेट, या उपक्रमातून मुंबई महानगरात पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्यासाठी, निरनिराळे उपाय सुचवून त्यांची प्रत्यक्ष व्यापक अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचे नेतृत्त्व विकसित करण्यात येणार आहे.
सिटीज् फॉर फॉरेस्टस् या वनसंरक्षण, वन जीर्णोद्धार, वन व्यवस्थापनाशी निगडित करारावर जगभरातील ५७ शहरांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी स्वाक्षरी केली आहे. त्यात मुंबईचाही समावेश आहे. या उपक्रमाला मुंबईमध्ये चालना देण्याच्या दृष्टीने तसेच त्यामध्ये जनतेचा सहभाग निर्माण करण्यासाठी रेडिओ मिर्ची एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन हा करार आहे.
ई-बस मिशन हा करार ट्रान्सफॉर्मेटिव्ह अरबन मोबिलिटी इनिशिएटिव्ह (टूमी) अंतर्गत, मुंबई महानगरात धावणाऱया बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या विद्युत बसेस उपक्रमामध्ये दर्जोन्नती करण्यासाठीचा करार आहे. यामध्ये बेस्ट प्रशासनाला वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया तांत्रिक सहाय्य करणार आहेत.
बेस्ट उपक्रमामध्ये विद्युत उर्जा आधारित बसेसची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. बेस्ट बसेस विद्युतभारित (चार्जिंग) करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीचे नियोजन, कामगिरीचे मूल्यमापन आणि नागरी धोरण यांची आखणी व इतर विषयांमध्ये बेस्ट प्रशासनाला तांत्रिक सहाय्य पुरवण्यासाठी डब्ल्यूआरआय या आंतरराष्ट्रीय संस्थेचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून बेस्ट उपक्रमाला पारंपरिक बसेसमधून विद्युत आधारित बसेसमध्ये परावर्तित होण्यासाठी सुलभ, सहज तांत्रिक मार्गदर्शन तर मिळेलच, सोबत किमान पाच लहान शहरांनादेखील भविष्यात विद्युत ऊर्जा आधारित बसेसचा अवलंब करण्याबाबत प्रोत्साहित करता येईल.
इलेक्ट्रीक बसेस कोणत्या मार्गांवर, किती संख्येने, कोणत्या वेळेत धावल्या पाहिजेत, विद्युत उर्जेवर धावणाऱ्या बसेसचा सुयोग्य आणि परिपूर्ण उपयोग कसा करता येईल, अधिकाधिक प्रवाशांपर्यंत ही सेवा कशी नेता येईल अशा सर्वांगीण पैलूंचा यामध्ये विचार केला जाणार आहे.

