अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे मुंबई वैश्य समाजाच्या सदडेकर सभागृहात मोकाशी यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदेश मोकाशी बोलत होते. आपण तसेच आपला परिवार या संपूर्ण काळात अभयच्या लढाऊ बाण्याचे साक्षीदार राहिलो आहोत. दादा, माझा आजार बरा होण्यासाठी एवढा मोठा खर्च करण्याची गरज आहे का? असे अभयने मला विचारले तेव्हा मी त्याला तू तुझ्या तब्येतीवर लक्ष केंद्रीत कर, बाकीची चिंता करु नकोस, असे सांगितले. तरीही ते त्याच्या मनाला पटलेले दिसत नव्हते. आमचे वडिल पासपोर्ट विभागात कोकण विभागाचे प्रभारी (इन्चार्ज) होते. संपूर्ण नोकरी त्यांनी प्रामाणिकपणे केली. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपले आयुष्य प्रामाणिकपणे पूर्ण करताना छोट्या खोलीत संसार केला. तोच प्रामाणिकपणाचा आदर्श अभयने तंतोतंत पाळला, असेही संदेश यांनी सांगितले.
आम्ही आईला बाई म्हणायचो. तिला स्वर्गवासी होऊन सात वर्षे झाली. आमचे वडील, पपा, तिच्या ३ आठवडे आधी गेले. दोघांची आठवण, त्यांच्या संस्कारांची आठवण, त्यांचे प्रेम, आम्हाला अजून आठवते. आमचे कुटूंब या सर्वांनी बांधलेले आहे. तुम्ही सर्वांनी अभयवर भरपूर प्रेम केलेत. तुम्हाला त्याच्या आजारपणाची प्रत्येक गोष्ट कळावी ही त्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्याने व्हॉट्सअप कम्युनिटीही सुरू केली होती. अभयला हॉस्पिटलमधून काही वेळा घरी यायला मिळाले. तेव्हा त्याला माझ्या घरी आणायचो. केमोचा चांगला परिणाम होऊन अभय थोडा

बराही होऊ लागला होता. आम्हाला खूप आनंद देणारे दिवस मिळाले. त्याबद्दल त्याने लिहिलेही होते. या सहा महिन्यांत त्याचे आजारपण आमच्या कुटुंबाला खूप जवळही घेऊन आले. आम्हा सर्वांचं, त्याला चांगलं वाटणं आणि बरं होणं, हे एकच ध्येय होतं. भाऊ शैलेश नाशिकहून १५ दिवस येऊन खूप मदत करून गेला. गौरव, सोनल, शौर्य यांनी खूप मदत केली. शौर्य तर त्याच्या काका आजोबांचे डोकं चेपणं, पाय चेपणं असे काम करायचा. गौरवच्या हॉस्पिटलमध्ये सतत फेऱ्या होत होत्या, असे ते म्हणाले.
माझ्या पत्नीचे आणि अभयचे नाते भावा बहिणीचेच होते. आल्हाद अमेरिकेहून आला होता. त्यामुळे त्यालाही सोबत राहण्याची संधी मिळाली. सुजाता, मुग्धा, मधुराचा अमेरिकेतून काकासाठी जीव तुटत होता. अभयचे कर्तृत्व तुम्हा सर्वांना माहित आहेच. पण अभयच्या कौटुंबिक जीवनाबद्दल तुम्हाला सांगावे असे वाटले कारण तुम्ही त्याची आपली माणसं आहात. अभयच्या जीवनाने तसेच आजारपणात दिलेल्या लढाऊ बाण्याने सत्याचा आग्रह, कुटुंबाप्रती बांधिलकी, स्नेह आणि लढवय्येपणा हे तीन संदेश दिले आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत बोलताना यांनी अभय मोकाशी यांच्यासमवेत दूरदर्शनवर झालेल्या चर्चेतील त्यांच्या परखड व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, प्रसाद मोकाशी, विजय तारी, अभय मोकाशी यांच्या भगिनी शुभांगी सारस्वत, अक्षरभेटचे संपादक सुभाष सूर्यवंशी, प्रगती खांबिया आदींनी आपापल्या आठवणी सांगितल्या. उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाच्या प्रसिद्धीप्रमुख नीलाबेन सोनी यांनीही अभय मोकाशी यांना पक्षातर्फे श्रद्धांजली वाहिली. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, प्रियेन पुरेचा, विजय परब, दिनेश सावंत, अनुष्का अनिलकुमार, नीलम पाटील, हर्षल खाडे, राजेश शाह, सत्यवान ताठरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

