सहा एप्रिल १९८०, हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) स्थापना दिवस. मुंबईत समता नगरमध्ये या पक्षाची स्थापना झाली. पूर्वाश्रमीचे जनसंघी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या पक्षात एकत्र आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून वाढलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून जनसंघाची ओळख होती. शहरातील मध्यमवर्गीयांचा आणि शेटजी-भटजींचा पक्ष अशी जनसंघाची टिंगलटवाळी केली जायची. आणिबाणीनंतर १९७७मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात जनसंघही सामील झाला. जनता पार्टीमध्ये काँग्रेस (ओ), लोकदल, समाजवादी विचाराचे विविध पक्ष सामील झाले होते. काँग्रेसला हटवून केंद्रात स्थापन झालेल्या जनता पार्टी सरकारमध्येही पूर्वाश्रमीचे जनसंघी मंत्री म्हणून सहभागी झाले. पण अंतर्गत कलहामुळे जनता पार्टी सरकार तीन वर्षांत कोसळले. समाजवादी आणि डाव्यांच्या विरोधामुळे जनसंघी जनता पार्टीतून बाहेर पडले आणि भारतीय जनसंघाची स्थापना झाली. भाजपाच्या स्थापनेला यंदा ४६ वर्षे पूर्ण झाली. कुठेही जवळपास सत्ता दिसत नसताना, या पक्षाने अथक परिश्रमातून, जिद्द बाळगून, काँग्रेस पक्षाशी देशभर सत्तासंघर्ष करून आणि काँग्रेस विरोधी प्रादेशिक पक्षांशी युती- आघाडी करून अखेर दिल्लीचे तख्त काबीज केले.

नरेंद्र मोदी यांचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यापासून भाजपाने विलक्षण प्रगती केली. महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, विधानसभा, लोकसभा अशा निवडणुकांमध्ये राज्याराज्यांत विजय मिळवत देशात नंबर १ चे स्थान प्राप्त केले. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. ४६ वर्षांत याच पक्षाने देशातील सर्वात मोठा, प्रभावी आणि शक्तिशाली राजकीय पक्ष म्हणून सत्ता काबीज केली आहे. सेहेचाळीस वर्षापूर्वी, सहा एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथील समता नगरमध्ये भारतीय जनता पार्टी नावाच्या एका राजकीय पक्षाचा भारतीय राजकारणात उदय झाला. अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. तेव्हा वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा… अटलजींचे शब्द चार दशकानंतर सत्यात उतरले. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी भाजपाला संजिवनी दिली. देशातील अन्य राजकीय पक्षांना धडकी भरवणारे यश भाजपाने गेल्या बारा वर्षांत संपादन केले आहे.

वाजपेयी यांनी भाजपाचे पहिले अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर गांधीवादी समाजवाद ही विचारसरणी पक्षाने स्वीकारल्याचे जाहीर केले. गांधीवादी समाजवाद म्हणजे नेमके काय, या प्रश्नानेच बहुतेक जण गोंधळले होते. ती विचारसरणी पक्षाच्या पचनी पडली नाही आणि जनतेनेही त्याला प्रतिसाद दिला नाही. नंतर लालकृष्ण अडवाणी पक्षाचे अध्यक्ष झाले, त्यांनीही त्यांच्या एका पुस्तकात गांधीवादी समाजवाद ही विचारसरणी लोकांना पसंत पडली नाही असे लिहिले आहे. त्यानंतर सांस्कृतिक राष्ट्रवाद व एकात्म मानवतावाद पक्षाने स्वीकारला. असे बोजड शब्द वापरून एखाद्या परिसंवादात पारितोषिक मिळवता येईल पण अशा घोषणांना सामान्य लोकांना कसे आकर्षित करता येईल? जेव्हा अडवाणी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी राम रथयात्रा सुरू केली तेव्हा कोट्यवधी जनता आकर्षित झाली. राम रथयात्रेनेच भाजपाला निवडणुकीतील यशाच्या मार्गावर नेले हे वास्तव आहे. विशेषत: उत्तर भारतातील राज्यांमध्ये, हिंदीभाषिक प्रदेशात भाजपाचा विस्तार झाला तो जय श्रीराम आणि मंदिर वही बनाएंगे, या भावनिक घोषणेमुळे…

१९९६, १९९८ व १९९९ अशा तीन वेळा अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधान म्हूणून शपथ घेतली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले पंतप्रधान झाले. पहिले सरकार तेरा दिवस, दुसरे सरकार तेरा महिने टिकले. शिवसेना व अकाली दल हे भाजपाचे दोन मूळचे मित्रपक्ष. पण एनडीए सरकार चालविण्यासाठी भाजपाला ममता, समता, जयललिता यांना बरोबर घ्यावे लागले. वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारमध्ये दिड डझन लहानमोठे मित्रपक्ष होते. वाजपेयी हे एक सर्वमान्य नेतृत्त्व होते, सर्वांना बरोबर घेऊन सरकार चालविण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यांच्यावर सर्व मित्रपक्षांचा विश्वास होता आणि विरोधी पक्षांना त्यांच्याविषयी आदर होता. सन २००४मध्ये फिलगुडच्या फाजिल आत्मविश्वासामुळे भाजपचा पराभव झाला आणि २००४ व २००९मध्ये काँग्रेसप्रणित युपीए सरकार केंद्रात आले व पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षे देशाचे नेतृत्त्व केले.

मोदी-शाह यांच्याकडे भाजपाची सूत्रे आली तेव्हा देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. सबका साथ, सबका विकास… अशा घोषणांनी आम जनतेला या नेतृत्त्वाने भाजपाकडे आकर्षित केले. मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेतृत्त्व आहे. गेल्या बारा वर्षांत त्यांना राष्ट्र्रीय पातळीवर समोर कोणतेही आव्हान उभे राहिलेले नाही. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणित एनडीएने केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली तसेच मोदींनीही पंतप्रधान म्हणून हॅटट्रीक संपादन केली. २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. तीस वर्षांनंतर प्रथमच देशात एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. मोदींची नेतृत्त्वशैली व पक्षाचा विकासाभिमुख अजेंडा याला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. २०१९मध्ये भाजपने आणखी मोठा विजय मिळवला व आपले वर्चस्व सिद्ध केले. २०२४मध्ये पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. पण २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष हे स्थान कायम ठेवले. पक्षसंघटन मजबूत ठेवण्यावर भाजपने नेहमीच भर दिला आहे. पक्षाचे नेतृत्त्व करताना घराणेशाही असता कामा नये हा कटाक्ष पाळला जातो. म्हणून ४६ वर्षांत भाजपचे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक अध्यक्ष हे वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या प्रदेशातील पदावर नेमले गेले आहेत. पक्षात कोणीही तहहयात किंवा वर्षानुवर्षे अध्यक्ष राहिलेला नाही. योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत, पुष्कर धामी, भूपेंद्र पटेल, मोहन यादव, विष्णुदेव साय, अशा दिड डझन दणकट व दिग्गज मुख्यमंत्र्यांनी राज्याराज्यात भाजप ताकदवान बनवली आहे. मजबूत संघटन, प्रभावी नेतृत्त्व व व्यापक जनाधार या बळावर भाजपने भारतीय राजकारणात नंबर १चे स्थान निर्माण केले आहे. उत्तर भारतात भाजपने चौफेर प्रगती केली आहे आणि आता दक्षिणेत पाया रोवण्यासाठी व भक्कम करण्यासाठी भाजपचे अटोकाट प्रयत्न चालू आहेत. वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जना कृष्णमूर्ती, बंगारू लक्ष्मण , एम. वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा अशा नामवंत राष्ट्रीय अध्यक्षांचे भाजपच्या ४६ वर्षांच्या वाटचालीत योगदान आहे. नितीन नबीन यांनी पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, नितीन नबीन हे माझे बॉस आहेत… यातच आले सगळे!

