महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. आणि आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते महापौरपदाचे. अर्थात प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येप्रमाणे महापौर निवडून येणे ही झाली एक सर्वसामान्य पद्धत. पण आताच्या काळात हे महापौरपद मिळवण्यासाठी कमी जागा असूनही आपलाच महापौर कसा होऊ शकतो ह्यासाठी खलबतं, घोडेबाजार आणि पक्षांतर असे प्रकार सुरू झाले आहेत. आणि त्यात आघाडी घेतली आहे राज ठाकरे ह्यांच्या मनसेने. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या ५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे ह्यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उबाठा सेनेचे प्रवक्ते अक्षरश चवताळले आहेत आणि प्रसारमाध्यमांसमोर थयथयाट करत आहेत. बरं.. राज ठाकरे ह्यांनी ह्याबाबतीत तो स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे असे सांगून अंगच काढून घेतले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात ठाकरे ब्रँड म्हणून सर्व प्रसारमाध्यमांनी फुगवलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचे काम ह्या मनसेच्या नगरसेवकांनी केले आहे.
राज ठाकरे ह्यांनी ह्याबाबत हात झटकले असले तरीही त्यांचे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी स्वत: तिथे जाऊन श्रीकांत शिंदे ह्यांच्याशी बोलणी केली आहेत आणि मगच मनसेचा हा निर्णय जाहीर झाला आहे. उबाठाचे आणखी ४ नगरसेवकही ह्याच मार्गाने जात आहेत. कारण ते आता नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी प्रसारमाध्यमांनी डोक्यावर घेतलेली दोन भावांची जवळीक, त्यांचे एकत्र येणे, त्यांचे कुटुंबीय एकमेकांना भेटणे, त्यांनी एकमेकांच्या घरी जाणे ह्या सगळ्या गोष्टी केवळ निवद्णुकीपुरत्या होत्या हेच सिद्ध होत आहे. उद्धव ठाकरे ह्यांनी वारंवार संगितले की, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. पण आता कल्याण-डोंबिवलीप्रमाणे इतर ठिकाणचे मनसैनिक नगरसेवक काय निर्णय घेतात हे बघावे लागेल. आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीपूर्वी फडणवीस म्हणाले होते की, निवडणुकीनंतर राज ठाकरे माझ्याबरोबर चहा पिताना दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका तर उद्धव ठाकरे ह्यांनी निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की, देवाच्या मनात असेल तर उबाठाचा महापौर होईल. त्यामुळे आता काय घडामोडी होत आहेत त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ह्या महापालिका निवडणुकीत मुंबईत उबाठाला ६५ जागा मिळाल्या तर मनसेला फक्त सहा. म्हणजे ह्या निवडणुकीत मनसेचा फायदा उबाठाला झाला. पण उबाठाचा फायदा मनसेला झाला नाही, अशीच मनसैनिकांची सर्वसाधारण भावना आहे. २० वर्षांनी दोन भावांचे मनोमिलन झाले म्हणून आनंदित झालेल्या मंनसैनिकांचा निवडणुकीनंतर चांगलाच भ्रमनिरास झाला आहे. आणि आता जर राज ठाकरे हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असे म्हणून हात झटकत असतील तर इतर मनसे नगरसेवकांना चांगलेच फावेल. खरेतर महापौरपदाला फारसे काही अधिकार नसतात. ते फक्त मा मानाचे पद आणि सभा चालविण्याचे अधिकार असतात. खर्या आर्थिक नाड्या तर स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती ह्यांच्या हातात असतात. त्यामुळे ह्या समित्यांवर जाण्यासाठी सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू आहे.
एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडत असताना दुसरीकडे महानगरपालिकांच्या महापौर निवडीच्या निमित्ताने पुन्हा पक्षांमध्ये एकमेकांचे नगरसेवक फोडणे, वेगळ्याच पक्षांशी युती करणे हे सुरू झाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेल्यामुळे अफवांना ऊत आला आहे. अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील असे महायुतीचे नेते सांगत आहेत. त्यातच अजून महापौरपदाची सोडत बाकी आहे. त्यानंतरच महापौरपदाचा उमेदवार ठरेल. पण त्याआधीच माध्यमे पतंग उडवत आहेत. संक्रांत नुकतीच झाली ना… तिकडे, मुंबई महापालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवार ह्यांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी अशी ६ नगरसेवकांची आघाडी होण्याच्या बेतात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे दादांच्या हातून गेल्यामुळे आणि अजितदादांना जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे निवडणूकप्रमुख केल्यामुळे दादांचा पुढे काय विचार आहे, हे कळेनासे झाले आहे. म्हणजे ते महायुतीत राहणार की नाही ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. ह्यामुळे निवडणुकांच्या परिणाम महायुतीवर काय होतो हेही बघणे महत्त्वाचे ठरेल.
(लेखिका वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

