ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्या प्रकरणातला प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय साधारण ४२ वर्षे होते. जामीनावर सुटल्यापासून तो सांगलीतल्या घरी कुटुंबासह राहत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. समीर गायकवाड याचे निधन झाले नसून तो महाराष्ट्रातल्या राज्यव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे, तर समीर गायकवाडच्या मृत्यूने त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध करण्याची संधी हुकली, अशी प्रतिक्रिया हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रतिक्रियेत राजहंस म्हणतात- सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांचे आज दुर्दैवी निधन झाले. समीर यांना २०१५मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्त्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. एका गाडीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी ही हत्त्या केली. त्यातील एक समीर गायकवाड, असे तपास यंत्रणांनी सांगितले. एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला; पण वर्षभरातच ते दोन खूनी भलतेच आहेत म्हणून जाहीर केले. याचाच अर्थ समीर गायकवाड निर्दोष होते. तुरुंगातही त्यांना त्रास भोगावा लागला. १९ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते जामीनावर होते; मात्र न केलेल्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण होता. पानसरे खून खटल्यातील आरोपी, ही प्रसिद्धीमाध्यमांतून झालेली बदनामी इतकी मोठी होती की व्यवसाय, नोकरी अशा सर्व ठिकाणी त्यांना त्रास झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील या निष्पाप साधकाचा तपासयंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली बदनामी, यामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले होते. लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य धाब्यावर बसवत समीर गायकवाड यांना कोल्हापूरातून वकीलही मिळू दिला गेला नव्हता. या आणि अशा अनेक व्यवस्थेच्या अत्याचारांना त्यांना सामोरे जावे लागले; दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. हे निधन नसून व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे, असेच म्हणावे लागेल.
जेव्हा समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली, त्यावेळी तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, पानसरेंच्या हत्त्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही. बचाव करताना हे समीर गायकवाड न्यायालयासमोर आणू शकले असते; पण कदाचित आता ती संधी गेली. या प्रकरणात आजही त्यांची आरोपी क्र. १ म्हणून त्यांची नोंद आहे; परंतु समीर यांना जामीन मिळाल्यावर पोलिसांनी नवीन ‘थिअरी’ मांडत पानसरे यांचा खून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी केला, असे जाहीर केले. काही महिन्यांनी पुन्हा नवीन दोन नावे समोर आणली. समीर हे या सदोष तपासाचा नाहक बळी ठरले. पुरोगाम्यांच्या दबावामुळे सनातनच्या साधकांना अडकवण्याचे पाप पोलिसांनी केले का? असा सवाल त्यांनी केला.
गायकवाड कुटुंबियांशी वेळोवेळी बोलणे झाले, तेव्हा समजले की, या प्रकरणात नाहक गुंतवल्याचा ताण समीर यांच्या मनावर नेहमी होता. त्यांचे सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त झाले होते. खूनातील आरोपी म्हणून त्यांना नोकरी मिळत नव्हती. या सर्व गोष्टींची भरपाई कोण देणार? अजमल कसाबसारख्या नराधम अतिरेक्याला सरकारी खर्चाने वकील मिळतो, फाशीच्या शिक्षा झालेल्यांसाठी रात्री १ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून समीर यांना वकील मिळू दिला जात नाही. शासन त्यांचा जमीन रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात जाते. उलटसुलट पुरावे न्यायालयात पोलीस कोणाच्या दबावामुळे दाखल करतात? पुरोगाम्यांच्या वैचारिक दहशतवादाने शासनावर दबाव आला आणि आज शेवटी त्याचा बळी गेला. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी शोक व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्र संघाने शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. समीर गायकवाडसाठी कोणी उभा राहणार का, हा प्रश्नही इथे नमूद करण्यासारखा आहे, असेही राजहंस यांनी म्हटले आहे.
मृत्यूने त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध करण्याची संधी हुकली! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
भगवा आंतकवाद सिद्ध करण्यासाठी पुरोगाम्यांनी जी फेक नरेटिव्हची साखळी रचली होती, त्यातीलच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणातील समीर गायकवाड यांची अटक होती. समीर गायकवाड यांच्या निधनामुळे त्यांना या खटल्यात कशाप्रकारे गोवण्यात आले हे सिद्ध करण्याची संधी हुकली, अशी खंत या खटल्यातील समीर गायकवाड यांचे अधिवक्ता आणि हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली.
इचलकरंजीकर म्हणाले की, पानसरे खटल्यामध्ये २ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली तेव्हापासून समीर गायकवाड याचा आत्मविश्वास प्रचंड खचला होता. जामीन खूप उशिरा मिळणे, त्यानंतर सरकारने पुन्हा उच्च न्यायालयत जाणे, खटला उशिरा चालू होणे या प्रकारांमुळे तो दु:खी होता. या सर्व काळात ‘कॉ. पासनसरे हत्त्या प्रकरणातील आरोपी’ म्हणून अपकीर्ती आणि संघर्ष त्याच्या नशिबी आला. या खटल्यामुळे त्याला कुणी काम देईना. कॉ. पानसरे हत्त्याकांडातील आरोपी म्हणून त्यांची जी हेटाळणी झाली ती अतिशय वाईट आहे. कॉ. पानसरे हत्त्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जेव्हा जन्मठेपीची शिक्षा झाली तेव्हा समीर याने मला ‘त्यांना शिक्षा का झाली?’ असे विचारले. त्यावेळी ‘त्यांना खरे सोडायला हवे होते. उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयात ते निश्चित निर्दाेष सुटतील; परंतु त्याला किती वर्षे लागतील ? हे सांगता येत नाही, असे मी त्याला म्हटले होते. त्यावेळी चालू असलेल्या ‘मीडिया ट्रायल’मुळे त्याचा पडलेला तोंडावळा मला आजही आठवतो. ‘कॉ. पानसरे हत्त्येच्या प्रकरणात मी निर्दाेष असूनही मला शिक्षा होईल का?’, असे समीर याने मला विचारले होते. यावरून कुठेतरी व्यवस्थेकडून होणार्या खच्चीकरणाचा हा बळी असल्याचे मला जाणवले.
वर्ष २००८मध्ये मालेगाव बाँम्बस्फोट ज्या प्रकारे स्वाधी प्रज्ञासिह यांना न्यायालयात आणण्यात आले ते पाहून न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या साहू नावाच्या त्यांच्या भक्ताचा भर न्यायालयात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला; परंतु त्याची बातमीही कुठे प्रसिद्ध झाली नाही. कोरेगाव-भीमा दंगलीच्या प्रकरणातील आरोपी स्टॅम्प स्वामी यांचे निधन झाले, तेव्हा उच्च न्यायालयासह संयुक्त राष्ट्र संघानेही शोक व्यक्त केला. समीर गायकवाड यांच्या निधनाची संवेदनापर्यंत कुणापर्यंत पोहोचेल का? समीर मराठा होता म्हणून जरांगे पाटील काही बोलतील का? ही एक अधिवक्ता म्हणूनही आणि एक सामान्य नागरिक म्हणूनही माझी व्यथा आहे, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.

