महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जागतिक व्यासपीठावर भारताच्या विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने

पाहत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल 1 ट्रिलियन डॉलरकडे नेण्याच्या दृष्टीने दावोसमधली ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवाना होण्यापूर्वी सांगितले.
महाराष्ट्राने गेल्या वर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्यशासनाने ठेवले आहे. दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

