विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये होणाऱ्या ए.एफ.सी. आशिया चषक फुटबाॅल स्पर्धेसाठीदेखील पात्र ठरू शकत नाही, हा किती मोठा विरोधाभास आहे. याच स्पर्धेत कधी नव्हे ते दुबळ्या बांगलादेश, हाँगकाँगसारख्या संघाकडून पराभूत होण्याची नामुष्कीची पाळी भारतीय संघावर आली. काही दिवसांपूर्वी अर्जेंटिना फुटबाॅल संघाचा माजी कप्तान मेस्सीच्या भारत भेटीने आपल्या येथील वातावरण फुटबाॅलमय होऊन गेले होते. मेस्सीचे जंगी स्वागत झाले. या अगोदरदेखील फुटबॉलसम्राट पेले, मॅराडोना, यांच्यासारखे महान फुटबाल खेळाडू भारत दौऱ्यावर येऊन गेले. तेव्हादेखील भारतीय फुटबाॅलप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात कुठे कमतरता ठेवली नव्हती. मेस्सीचे तुफानी स्वागत होत असताना प्रत्यक्ष भारतीय फुटबाॅलचे सध्याचे चित्र फार भयानक आहे असे खेदाने म्हणावे लागेल. भारतीय फुटबाॅल पार रसातळाला गेलाय. एका जमान्यात निदान आशिया खंडाततरी दादा असलेल्या भारतीय फुटबाॅलची आता वाट लागलीय. जागतिक क्रमवारीत भारत १४२व्या क्रमांकावर फेकला गेलाय. हा या क्रमवारीतील भारताचा आजवरचा सर्वात खालचा क्रमांक आहे. या अगोदर हाच भारतीय संघ या क्रमवारीत ९८व्या स्थानावर होता. म्हणजे भारताची किती घसरण झाली याची कल्पना येते.

जिथून उद्याचे युवा फुटबाॅलपटू पुढे येणार त्या स्थानिक फुटबाॅलची वाताहात झाली. पदाधिकाऱ्यांचा एकमेकांतील अहंभाव आणि सत्तासंघर्ष यामुळे भारतीय फुटबाॅलची साफ कोंडी झालीय. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय फुटबाॅलमध्ये सन्नाटा पसरलाय. व्यावसायिक करार संपुष्टात आल्याने इंडियन सुपर लीग आणि आय लीग या दोन प्रमुख फुटबाॅल स्पर्धा आयोजित करणे अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाला शक्य झाले नाही. त्या कधी सुरु होणार याची शाश्वती नाही. त्यामुळे या स्पर्धात खेळणाऱ्या खेळाडूंचा आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाचे आर्थिक गणित साफ कोलमडून पडलेय. भारतीय फुटबाॅलचा हा सारा गंभीर मामला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. लोकसभेतदेखील त्याची चर्चा झाली. या साऱ्यात गंमतीचा भाग असा २०२५मध्ये भारतीय फुटबाॅल संघ १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. सर्वोच न्यायलयात अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाच्या अधिकाऱ्यांना १६ वेळा सुनावणीच्या दरम्यान हजर राहवे लागले. १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला अवघे कसेबसे ३ सामने जिंकता आले. ५ सामन्यांत भारत पराभूत झाला तर ३ सामने भारताने बरोबरीत सोडवले. मे २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत भारतीय फुटबाॅल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने तीन प्रशिक्षकांची नियुक्ती केली. पण भारतीय फुटबाॅल संघाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झाली नाही. शेवटी मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय खेळाडू खलीद जमील यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. पण ते पण या पदाला फारसा न्याय देऊ शकले नाहीत. त्यांनी माजी कप्तान सुनील छेत्रीला निवृत्ती मागे घेण्याची गळ घातली. सुनीलने भारतातर्फे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त गोल केले आहेत. पण तो आपली जुनी जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे थोड्याच दिवसात त्याने परत आपण आंतरराष्ट्रीय सामन्यातुन निवृत्ती होत असल्याची घोषणा केली.
आयपीएल क्रिकेट लीग, प्रो कबड्डी लीग, अल्टिमेट खो-खो लीग, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन या सर्व खेळांच्या व्यवसायिक लीगने आपला आर्थिक पाया भक्कम केला असताना साऱ्या विश्वात प्रचंड लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची व्यसायिक लीग भारतात कशी अपयशी ठरु शकते, पुरस्कर्ते पाठ फिरवतात हे न सुटणारे कोडे आहे. इथे या लीगचे योग्य नियोजन करण्यात अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाला अपयश यावे ही भारतीय फुटबाॅलसाठी धोक्याची घंटा आहे. या संबंधित संघटनेचे पदाधिकारी केवळ खुर्चीच्या राजकारणात दंग होते की काय असा प्रश्न पडतो. अखिल भारतीय फुटबाॅल महासंघ आणि फुटबाॅल स्पोर्ट्स डेव्हलपमेन्ट लिमिटेड यांचातील १५ वर्षांचा करार डिसेंबरमध्ये संपला. हा करार आय.एस.एल. लीगचा मोठा आधार होता. अखिल भारतीय फुटबाॅल महासंघातील संघर्ष आणि त्यावरुन झालेला कायदेशीर वाद यामुळे कराराचे नूतनीकरण करण्यास फुटबाॅल स्पोर्टस् डेव्हलपमेन्ट लिमिटेडने नकार दिला. ऑक्टोबरमध्ये आय.एस.एल.च्या प्रक्षेपणासाठी कोणीही फारशी तयारी दाखवली नाही. त्याचवेळी लीगचे भवितव्य अनिश्चित असल्याचे स्पष्टं झाले. लीगच्या कार्यक्रमाबाबत असलेली अनिश्चितता, कमी होणारी फुटबाॅलप्रेमींची संख्या, त्यात अनेक कायदेशीर बाबी यामुळे लीग संकटात सापडली. त्यातच आता मुंबई सिटी एफसी या ताकदवान क्लबनेदेखील लीगमधून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे हा आणखी एक मोठा धक्का लीगला बसलाय. ही स्पर्धा त्यांनी दोन वेळा जिंकली होती. तसेच एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये सामना जिंकणारा पहिला भारतीय फुटबाॅल क्लब ठरला होता. त्यामुळे आता खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफसमोर उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लीगमधील सर्व सहभागी क्लबनी इंग्लिश पिमियर लीगच्या धर्तीवर सामने घेण्याची सूचना केली होती. पण ती सूचना महासंघाने नाकारली आणि स्वतः पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. फुटबाॅल शिबिरातदेखील खेळाडूंची संख्या अर्धीच असायची. बरेच क्लब खेळाडूंना सराव शिबिरात जाण्यास मज्जाव करत होते. काही क्लबनी सराव शिबिराच्या आयोजनाबाबत बऱ्याचवेळा नाराजीचा सूर आळवला होता. नवे प्रशिक्षक जमील यांनी प्रशिक्षकपद स्वीकारुन सहा महिनेपण झाले नाहीत. आता भारतीय फुटबाॅल संघाच्या खराब कामगिरीमुळे एवढ्यात कुठल्या मोठ्या स्पर्धेत भारत नाही. नोव्हेबर २०२७मध्ये आता भारताच्या आंतरराष्ट्रीय लढती होणार आहेत. तोपर्यंत जमील काय करणार हा मोठाच प्रश्न आहे. शाळा, कॉलेजमध्येदेखील फारसे उत्साहवर्धक चित्र दिसत नाही. अनेक जुन्या नामांकित फुटबाॅल स्पर्धा बंद पडल्या आहेत. अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने खेळाच्या वाढीसाठी काही योजना राबवल्या. पण त्यांचे पुढे काय झाले हे एक कोडेच आहे. २०१७मध्ये फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या निमित्ताने मिशन ११ मिलियन राबवण्यात आले. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. २०२२मध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फिफाचे अध्यक्ष जियानिनी इन्फाटिनो यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत फिफा फुटबाॅल फाॅर स्कूल उपक्रमाचा शुभारंभ झाला. देशभरातील २.५ लाख शाळांमधील २५ लाख मुला-मुलींना फुटबाॅलच्या माध्यमातून व्यतिमत्व विकास घडवण्यात येणार होता. आतापर्यंत या उपक्रमातुन किती मुला-मुलींचा विकास झाला तो आकडा आतापर्यंत तरी पुढे आलेला नाही. आता मेस्सीच्या भारत भेटीदरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेव हा युवा फुटबाॅल खेळाडू घडवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे किती युवा फुटबाॅल खेळाडू पुढे प्रकाशात येतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल. एकंदरच भारतीय फुटबाॅलचे सध्याचे चित्र अंधःकारमय दिसतेय. आता या सर्वातून अखिल भारतीय फुटबाॅल महासंघ काय मार्ग काढणार यावरच भारतीय फुटबाॅलचे भवितव्य अवलंबून आहे.
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

