Homeब्लॅक अँड व्हाईट.. आणि भारतीय...

.. आणि भारतीय स्क्वॉश संघाने घातली विश्वविजेतेपदाला गवसणी

चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ माजवली. याअगोदर या स्पर्धेत भारताची मजल कांस्यपदकाच्या पुढे कधी गेली नव्हती. भारताने यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि चक्क जेतेपदावर कब्जा करुन नवा अध्याय लिहीला. अंतिम सामन्यात घरच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास चांगला उंचावला. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताने, दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य ईजिप्तला आणि त्यानंतर अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या हाँगकाँगला नमवण्याचा मोठा पराक्रम केला.

या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आशिया खंडातील दोन देश भारत, हाँगकाँग अंतिम सामन्यात जेतेपदासाठी आमनेसामने आले होते. त्यात भारताने ३-० अशी सहज बाजी मारली. सलामीच्या पहिल्या सामन्यात भारताची जागतिक क्रमवारीत ७९व्या स्थानावर असलेली अनुभवी महिला खेळाडू ३९ वर्षीय ज्योश्ना चिनप्पाने हाँगकाँगच्या विश्व क्रमवारीत ३७व्या क्रमांकावर असलेल्या का यी लीचा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये काहीशी अडखळत सुरूवात करणाऱ्या ज्योश्नाने नंतर स्वतःला सावरले आणि सामना खिशात टाकला. चिनप्पाने अवघ्या २३ मिनिटांत ७-३, २-७, ७-५, ७-१ असा चार गेममध्ये हा सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात आशिया स्पर्धेतील पदकविजेत्या २७ वर्षीय अभय सिंहने आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अॅलेक्स लाऊला तीन गेममध्ये आरामात नमवले. सुरूवातीपासून आक्रमक खेळ करुन अभय सिंहने सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. अभयने हा सामना ७-१, ७-४, ७-४ असा जिंकला. शेवटच्या तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताची १७ वर्षीय अनाहत सिंहने तोमातो होलाचादेखील तीन गेममध्ये पराभव करून भारताच्या ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अनाहतने ७-२, ७-२, ७-५ अशी ही लढत जिंकली. अनाहत या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू होती. भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. त्यामुळे या स्पर्धेचा योग्य विजेता संघ भारतच होता असे म्हणावे लागेल.

चेन्नईने सलग तीन जागतिक स्क्वॉश स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय संघ यशस्वी ठरला. उपांत्य फेरीत भारताने ईजिप्तचे आव्हान सहज परतवून लावत पहिल्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी रुबाबात गाठली. वेलवानने इब्राहिमला, अनाहतने नुरला आणि अभयने आदमचा आरामात पराभव केला. भारताच्या तीनही खेळाडूंनी आपल्या लढती सरळ तीन गेममध्ये जिंकल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीची हाँगकाँग-जपान लढत चांगली रंगली. दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रत्येकी‌ दोन-दोन सामने‌ जिंकल्यामुळे लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे मग सामन्याचा निकाल सरस‌ जास्त‌ गेम जिंकण्यानुसार लावला गेला. त्यात हाँगकाँगच्या खेळाडूंनी जास्त गेम जिंकल्यामुळे त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. याअगोदर भारताने स्वित्झर्लंड, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका संघाना नमवून उपांत्य फेरी गाठली होती. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अर्जुन पुरस्कारप्राप्त हरिंदर पाल संधू यांचादेखील भारतीय यशात मोठा वाटा आहे. त्यांनी खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. प्रत्येक खेळाडूशी चांगला संवाद साधून स्पर्धेसाठी त्यांची शंभर टक्के मानसिक, शारीरिक तयारी करुन‌ घेतली. पत्येक संघाविरुद्ध नवी रणनीती आखली. त्या-त्या संघाविरुद्ध खेळाडूंची योग्य निवड अंतिम संघात केली. त्यांची ही व्यूहरचना यशस्वी ठरली. खेळाडूंना त्यांच्या आहे त्या शैलीप्रमाणे खेळण्यास प्राध्यान दिले. त्यांच्यावर कुठले दडपण टाकले नाही. त्या सर्वाची फलश्रुती भारतीय विजयात झाली. अवघ्या १७ वर्षांच्या नवी दिल्लीच्या अनाहत सिंहने आपल्या चमकदार खेळाची छाप पाडली. पुढच्या काळात तिच्याकडून भारताच्या मोठ्या अपेक्षा आहेत. भारताचे हे ऐतिहासिक विजेतेपद स्क्वॉश खेळाला नवी झळाळी देईल अशी आशा करुया. 2028च्या ऑलिंपिक स्पर्धेत स्क्वॉश, हा खेळ पर्दापण‌ करणार आहे. त्यामुळे भारताच्या ऑलिंपिक पदकतालिकेत आणखी किती पदकांची भर पडेल हे काळच सांगेल!

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक आहेत.)

Continue reading

भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी फक्त खुर्चीच्या राजकारणात!

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये...

वाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला ८० कोटींचा फटका!

कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये झालेला चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि क्रिकेटविश्वात कसोटी‌ सामन्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु...

जर्मन हॉकी लिगमध्ये ज्युनियर खेळाडूंना मिळते पूर्ण स्वातंत्र्य!

चेन्नई येथे राधाकृष्ण मेयर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या १४व्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय हॉकी संघाने जोरदार कमबॅक करताना तब्बल ९ वर्षांनंतर आपला पदकाचा दुष्काळ संपवला. कांस्यपदकाच्या लढतीत माजी विजेत्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघ २-० गोलांनी...
Skip to content