प्रिय राज्यमंत्री योगेश दादूस,
पेशंट लाडकी बहीण यशवंतीचा सप्रेम नमस्कार…
दादूस, तुला त्रास देत आहे, माफी असावी. खरंतर मला मुंबईला जायचे होते. पण काल चिपळूणहून निघून खेडमार्गे मुंबईला जाण्याचे ठरवले. कारण माझ्या दातांचा भयंकर त्रास होऊ लागल्याने फारच अस्वस्थ झाली होते. दातांचे दुखणे थांबल्यावर मुंबईला जायचे ठरवले. कारण आमच्या दादूसचे दाताचे रुग्णालय व महाविद्यालय असल्याने तेथेच दातांवर उपाय करून पुढे जाण्याचे ठरवले. तेथे गेल्यावर दात ठीक होतील असा विश्वास होता. दादूस तुझ्यावर विश्वास दाखवून तुझ्याच रुग्णालयात येण्याचे ठरवले. याचा गेले एक दीड तास मी पश्चाताप करत आहे. खरंतर खेड ते दापोली हे अंतर केवळ २७ किलोमीटर्स असूनसुद्धा खेड ते खेडच हा प्रवासास दीड-दोन तास लागल्याने सर्व अंगच दुखू लागले. दाताचा त्रास त्याच्यापुढे काहीच वाटेनासा झाला रे! सर्व अंगच दुखू लागले याचे प्रमुख कारण भिकार रस्ता हेच होते. दादूस या पत्राबरोबर मी दोन फोटो पाठवत आहे. खात्री आहे की, फोटोतले ठिकाण तू लगेचच ओळखशील! आता ओळखायला वेळ लागू नये म्हणून मीच सांगते की, योगिताताईंच्या रुग्णालयाच्या समोरच्या रस्त्याचाच आहे. समोरच एक एसटी बसचा थांबा आहे. हा थांबा अत्यंत कळकट असून प्रवाशांना येथे बसावे असे कधीच वाटत नाही. कळकट, ओंगळवाण्या थांब्यात तू तरी बसशील का रे? तुला तर तेथे पाय ठेवायलाही आवडणार नाही. तू तर एसटीचा उद्धारच करशील याची खात्री आहे. गेल्या १०/१५ वर्षांत खेड ते दापोली हा रस्ता साधा दुरुस्तही केला गेलेला नाही. खेड दापोली – हर्णे ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची असूनही सरकारने खेड ते दापोली व हर्णे ते दापोली या रस्त्याकडे कधीच लक्ष न दिल्याने रिक्षा, एसटी व खासगी बसगाडयांना बराच त्रास सोसावा लागत आहे. अनेक रिक्षावाले अव्वाच्या सव्वा भाडे आकरतात किंवा भाडे नकारतातच.

संपूर्ण कोकणातच दुर्लक्ष
गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण परिसरातील रस्त्यांची बकवास अवस्था पाहिली. काल चिपळूण ते खेड तसेच खेड ते दापोली-हर्णे, अगदी दाभोळपर्यंतचे रस्ते मी पाहिले. गाडीतून प्रवास केला तेव्हा लक्षात आले की रस्तेबांधकामाशी संबंध असलेले पालकमंत्री उदय सामंत असताना रस्त्यांची शोचनीय अवस्था पाहून राज्यातील इतर भागातील रस्ते काय लायकीचे असतील याची कल्पनाच केलेली बरी! पंतप्रधान नरेंद्र मोदी ते महायुतीचे सर्वच नेते प्रयत्न करत असताना महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था? याबाबत मुख्यमंत्री देवाभाऊंनी एक श्वेतपत्रिका काढावी. असे सांगण्यासाठीही दादूस तूच पुढाकार घ्यावा. रामदासकाका हल्ली खेड, दापोली व हर्णे परिसरात येत नाहीत. (वयोमान व प्रकृती) सामान्यांचे प्रश्न जाणारा एक वेगळाच ‘सेन्स’ त्यांच्याकडे होता. माझेतर मत आहे की, रामदासकाकांनी आता यापुढे ठराविक अंतराने त्यांच्या या जुन्या मतदारसंघात सतत फेरी मारावी. आणि दादूस तूही येतोस रे मतदारसंघात. पण फिरतोस कुठे? तू तर नेहमीच मित्रांच्या गराड्यात असतोस. त्यातले एक-दोन ‘काळ्या यादीतले’ असल्याची माझी माहिती आहे. तुझ्या हातात गृह विभाग व पोलीस आहेत. तू चौकशी केल्यास चक्रावूनच जाशील. कुठल्याही गोत्यात येऊ नयेस हीच मनोमन इच्छा आहे. बाकी काही राहू दे. भेटशील तेव्हा आणखी कितीतरी गोष्टी सांगेन.
दातांच्या दुखण्याने पीडित
तुझीच बहीण यशवंती
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

