Tuesday, December 24, 2024
Homeडेली पल्सस्वतःला झोकून देणारा...

स्वतःला झोकून देणारा क्रांतीकारक- खुदीराम बोस!

खुदीराम बोस! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर. हिंदुस्थानवर जुलमी सत्ता गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्यावर ज्यांनी अलौकिक धैर्याने पहिला बॉम्ब फेकला, शालेय जीवनातच वन्दे मातरम् या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले त्या खुदीराम बोस यांचा 11 ऑगस्टला बलिदानदिन साजरा केला जातो. 11 ऑगस्ट 1908 यादिवशी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी हातात भगवद्गीता घेऊन खुदीराम बोस यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले.

काळ होता 1903चा! बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने निश्‍चित केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला. देशासाठी काहीतरी करावे, असे सारखे वाटू लागल्याने मेदिनीपूर येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या.

फेब्रुवारी 1906मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक आणि शेतकी प्रदर्शन भरले होते. हे प्रदर्शन पाहण्यास आजूबाजूच्या प्रांतांतून शेकडो लोक येऊ लागले. बंगालमधील एक क्रांतीकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहिलेल्या सोनार बांगला, या जहाल पत्रकाच्या प्रती खुदीराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या. पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला. खुदीराम यांनी या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि शिल्लक राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्याच्या हातून निसटून गेले. याप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला, परंतु खुदीराम त्यातून निर्दोष सुटले.

मिदनापूर येथे युगांतर, या क्रांतीकारकांच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदीराम क्रांतीकार्यात ओढले गेले. वर्ष १९०५मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. या फाळणीच्या विरोधात असणार्‍या अनेकांना त्या वेळचा कलकत्त्याचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या. अन्य प्रकरणांतही त्याने क्रांतीकारकांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला. सरतेशेवटी युगांतर समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले. यासाठी खुदीराम आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.

खुदीराम यांना एक बॉम्ब आणि पिस्तूल देण्यात आले. प्रफुल्लकुमार यांनाही एक पिस्तूल देण्यात आले. मुझ्झफरपूरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी केली. त्यांनी त्याची चारचाकी आणि तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला. खुदीराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आले. 30 एप्रिल 1908 यादिवशी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्डच्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या दोन गुप्त अनुचरांनी त्यांना हटकले; पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.

रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी येताना दिसताच खुदीराम गाडीमागून धावू लागले. रस्त्यावर खूपच अंधार पडला होता. गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातांनी बॉम्ब वर उचलला आणि नेम धरून अंधारातच पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्थानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलांपर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसांतच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला.

खुदीराम यांनी किंग्जफोर्डची गाडी समजून बॉम्ब टाकला होता. पण, त्यादिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला. दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन महिलांना आपले प्राण गमवावे लागले. रातोरात खुदीराम आणि प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलांवरील वैनी रेल्वेस्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.

दुसर्‍या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकी यांना पोलीस पकडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि प्राणार्पण केले. खुदीराम यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेचा शेवट ठरलेलाच होता. 11 ऑगस्ट 1908 यादिवशी भगवद्गीता हातात घेऊन खुदीराम धैर्याने आणि आनंदी वृत्तीने फाशी गेले.

किंग्जफोर्डने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले, त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला. त्याचे नावनिशाणही उरले नाही. खुदीराम मात्र मरूनही अमर झाले!!

Continue reading

तथाकथित पर्यावरणवाद्यांचा नाद सोडा, शाडूच्या गणेशमूर्तीच आणा!

चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची...

चला चाळवूया क्रांतीवीर मदनलाल धिंग्रांच्या स्मृती!

भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर, पंजाबमधील आद्य क्रांतीकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मदनलाल धिंग्रा यांचा आज म्हणजेच 17 ऑगस्ट हा बलीदानदिन! त्यांच्याविषयी थोडेसे. मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी, 1883 साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. सन 1906मध्ये ते आगबोटीवर काम करुन...

चला.. सुराज्य स्थापनेचा संकल्प करूया!

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी असीम त्याग करून आणि आपल्या प्राणांचे बलिदान देऊन इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले, यामुळेच आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू शकत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळाले. मात्र, सुराज्य...
Skip to content