बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खरोखरीच उत्तम आहे का? त्यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार सोपविण्याइतके ते फिट आहेत का, असे एक नाही तर अनेक प्रश्न सध्या बिहारच्या राजकीय नेत्यांमध्ये चर्चिले जात आहेत. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनताप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दोन-तृतियांशपेक्षा जास्त जागा जिंकत पाशवी बहुमत मिळवले खरे, पण त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजूनही जाहीर होणे सोडाच, निश्चितही होत नाही, याकडे सारे राजकीय निरीक्षक लक्ष वेधत आहेत.
बिहार विधानसभेसाठी याच महिन्यात दोन टप्प्यात मतदान झाले. १४ नोव्हेंबरला बालदिनी, मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीतल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पक्षकार्यकर्त्यांचा विजयी मेळावा घेत जल्लोषही साजरा केला. मात्र जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या पक्षाच्या जल्लोषात कुठेच दिसले नाहीत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नितीश कुमार यांना सौम्य प्रमाणात स्मृतीभ्रंशाचा विकार जडला आहे. बोलताबोलता ते पटकन वर्तमान विसरतात आणि भलतेच बोलतात. त्यामुळे त्यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचा कारभार कसा सोपवायचा हा यक्षप्रश्न त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे भागिदार असलेल्या भाजपाच्या नेत्यांना पडला आहे. स्मृतीभ्रंशग्रस्त व्यक्तीचा, त्यांच्याभोवती असलेले कोंडाळे कोणत्याही स्वरूपाचा फायदा उकळू शकते. एखाद्या अहितकारी निर्णयावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊ शकते. त्यामुळे उद्या त्यांचाच पक्ष नाही तर त्यांच्यासोबत असलेले एनडीएमधले सर्व घटकपक्षही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळेच सध्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नितीश कुमार यांना पर्याय शोधला जात आहे. याच चर्चेसाठी आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पाटण्याला पोहोचत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे निवडणूक प्रचारापासूनच यावर संबंधितांशी चर्चा करत असल्याचे कळते.
निवडणुकीच्या काळात विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रणित महागठबंधनच्या नेत्यांनी नितीश कुमार यांच्या आजारपणाचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नितीश कुमार यांची स्वतःची बेदाग प्रतीमा आणि भाजपा तसेच जदयूच्या नेत्यांच्या चातुर्यामुळे नितीशबाबूंचे आजारपण लपले गेले, असे कळते. त्यांच्या आजारपणाच्या कारणावरूनच नितीश यांचे पन्नास वर्षीय पुत्र निशांत कुमार यांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाला. इतक्या वर्षांत प्रथमच ते माध्यमांसमोरही आले. मात्र, घराणेशाहीला विरोध करण्याची जाहीर भूमिका घेतल्याने जदयू तसेच भाजपा नेत्यांनी निशांत कुमार यांना लांब ठेवले. परिणामी नितीश कुमार घराणेशाहीविरूद्ध असल्याची इमेज राखण्यात ते यशस्वी झाले आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याविरूद्धच्या प्रचाराला अधिक धार चढली. संपूर्ण प्रचारात नितीश कुमार यांची व्यासपीठावरची उपस्थिती फारच कमी काळ असायची. कागदावर लिहिलेले छोटेखानी भाषण वाचून झाले की काहीना काही कारणांच्या बहाण्याने त्यांना व्यासपीठावरून बाजूला नेले जायचे आणि नंतर ते दिसेनासेच व्हायचे, असे माहितगार सांगतात. मात्र, निवडणूक नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरच लढवायची असल्याने आजारी नितीश कुमार यांचा बुजगावण्याप्रमाणे वापर करण्यात आला. आताही बिहारचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेतेही जाहीरपणे नितीश कुमार यांचेच नाव सूचित करतात. परंतु पडद्यामागे बऱ्याच हालचाली चालू आहेत, ज्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण आणि शपथविधीची तारीख कोणती हे कोणीही सांगत नाही.


अंतिशय सुंदर विश्लेषण केले.छानच बातमी केली आहे.अभिनंदन किरण हेगडेजी.भाषा फार सुंदर आहे.