मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेला ३१ डिसेंबर २०२५पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याआधी आजपर्यंत म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२५पर्यंत ही मुदत होती.
नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य होत आहे. ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. पात्र महिलांना न्याय मिळावा आणि तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

