वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने 645 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचे रॅकेट नुकतेच उघड केले असून या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली आहे. या पथकाने, दिल्लीतल्या एका टोळीचे बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचे लाभ मिळवण्याचा आणि फसवणुकीच्या माध्यमातून अशा लाभाच्या हस्तांतरणाचे एक मोठे प्रकरण उघडकीला आणले आहे. या टोळीने वस्तू आणि सेवा कराअंतर्गत नोंदणीकृत 229 बनावट कंपन्यांचे जाळे उभारले होते आणि या कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक केली जात होती, असे समजते.
यासंदर्भात वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने विश्वासार्ह स्रोताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीत अनेक ठिकाणी छापे मारत, एक समन्वित शोधमोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात फसवणुकीसाठी वापरले गेलेले दस्तावेज, डिजिटल उपकरणे आणि खातेवह्या जप्त केल्या आहेत. या पथकाच्या हाती आलेल्या या पुराव्यांतून, प्रत्यक्षात अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्या, प्रत्यक्षात वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता, केवळ देयके जारी करण्यासाठीच उपयोगात आणल्या जात असल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेत 162 मोबाइल फोनही जप्त करण्यात आले आहेत. हे फोन वस्तू आणि सेवा करविषयक अथवा बँकिंगशी संबंधित कामांबाबत ओटीपी मिळवण्यासाठी वापरले जात होते असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. याशिवाय या जप्तीत 44 डिजिटल सह्या आणि विविध कंपन्यांच्या 200पेक्षा जास्त चेकचाही समावेश आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, या सर्व बनावट संस्था कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्षात पुरवठा न करताही देयके जारी करण्याचे काम करत होत्या आणि त्यातून त्यांनी अंदाजे 645 कोटी रुपयांच्या अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिटच्या हस्तांतरणाची फसवणूक केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे सरकारी महसुलाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुकेश शर्मा हा इसम या बनावट संस्थांचे जाळे उभारून या फसवणुकीच्या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार असल्याचेही या तपासात उघड झाले आहे. हाती लागलेल्या पुराव्यातून, या इसमाने वस्तू आणि सेवा कर नोंदणी तसेच, प्रत्यक्षात अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांची विवरणपत्रे, त्यांच्या नोंदींचे व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार यासोबतच, विविध मार्गांनी अवैध निधीचे व्यवहार करण्यात सक्रिय भूमिका बजावली असल्याचेही आढळून आले आहे. मुकेश शर्मा याचे हे सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याने, त्याला 11 नोव्हेंबरला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, 2017च्या कलम 132(1)(b) आणि 132(1)(c)अंतर्गत अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवाना केले गेले आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासातून संभाव्य हवाला प्रकरणाचा पैलूही उघड झाला आहे. याअंतर्गत फसवणुकीच्या माध्यमातून मिळालेले पैसा कथितरित्या एका स्वयंसेवी संस्था आणि एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून व्यवहारात आणला गेला असल्याचे आढळले असून, आता त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

