तुम्ही आता इतरांसाठी आदर्श ठरल्या आहात. तरुण पिढीला, विशेषतः मुलींना, आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. हा संघ भारताचे प्रतिबिंब आहे. या संघात वेगवेगळ्या प्रदेशांतून, वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमींतून, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तरीही हा संघ सर्वजण मिळून एकच आहे- टीम इंडिया. हा संघ भारताच्या सर्वोत्तमतेचे दर्शन घडवितो, असे प्रशंसोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल काढले.

महिला क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय संघाच्या सदस्यांनी काल दिल्लीत, राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. क्रिकेट संघाच्या सदस्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडविला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात लाखो भारतीय या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. सात वेळा विश्वविजेत्या राहिलेल्या आणि स्पर्धेतल्या अपराजित ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून भारतीय महिला संघाने सर्व देशवासीयांचा त्यांच्या क्षमतेवर असलेला विश्वास अधिक बळकट केला. कठीण सामन्यात एका मजबूत संघाविरुद्ध मोठ्या फरकाने अंतिम सामना जिंकणे हे टीम इंडियाच्या उत्कृष्टतेचे एक संस्मरणीय उदाहरण आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

हे खेळाडू आता समाजासाठी आदर्श बनले आहेत. तरुण पिढी, विशेषतः मुली, या खेळाडूंच्या यशातून प्रेरणा घेऊन जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतील. ज्या गुणांमुळे या खेळाडूंनी इतिहास घडविला, त्याच गुणांच्या बळावर त्या भविष्यातही भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानी ठेवतील. संघातील सदस्यांनी आशा आणि निराशेचे अनेक चढउतार अनुभवले असतील. कधीकधी त्यांची झोपही उडाली असेल. परंतु त्यांनी सर्व आव्हानांवर मात केली. न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला होता की, अनेक चढउतार असले तरी आपल्या मुली नक्कीच विजयी होतील, असे त्या म्हणाल्या.

या यशामागे संघाचे कठोर परिश्रम, उत्कृष्ट क्रीडाकौशल्य, दृढनिश्चय तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आणि क्रिकेटप्रेमींचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. क्रिकेटसारख्या सांघिक खेळात, सर्व संघ सदस्यांना नेहमीच पूर्णपणे समर्पित राहणे आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींनी मुख्य प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या योगदानाचीही यावेळी प्रशंसा केली.


