मुंबईत आज आणि उद्या म्हणजेच २७ व २८ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या छठपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनामार्फत समुद्र किनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी छठपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांपैकी सर्वाधिक तलाव व टाक्या ह्या घाटकोपर परिसरात (एन विभाग) ४४, दहिसर (आर उत्तर विभाग) २२ तर कांदिवली परिसरात (आर दक्षिण विभाग) १६ इतक्या आहेत. यासह उर्वरित ठिकाणीदेखील कृत्रिम तलाव व टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी पाण्याची उपलब्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई महापालिकेने ३९ ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी उत्सव साजरा करण्यासाठीची ठिकाणे आणि कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे.

निर्माल्यकलश व स्वच्छतेची विशेष व्यवस्था
छठपूजेच्या काळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने व साधनसामग्री उपलब्ध असेल. पूजास्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूम्रफवारणी यावर भर दिला जाणार आहे. सर्व पूजास्थळांवर पुरेशा प्रमाणात निर्माल्यकलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी पूजेसाठी आवश्यकतेनुसार टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्सवकाळात ४०३ वस्त्रांतरगृह (चेंजिंग रुम)
या उत्सवासाठी ४०३ वस्त्रांतरगृह उभारण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात आला आहे. वाहनतळासाठीदेखील पोलिसांशी समन्वय साधण्यात येत आहे.

प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था
उत्सवस्थळी पिण्याच्या पाण्याची तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. छठपूजेच्या काळात सर्व उपाययोजना योग्यरितीने राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित अधिकारी नियमितपणे भेट देतील.
प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी
छठपूजा आयोजित करणाऱ्या संस्था/मंडळांना आवश्यक परवानग्या व समन्वयासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलीस व वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी व छठपूजा उत्सव शांततेत व सुसंवादाने साजरा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी खोल समुद्रात जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीत पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त (परिमंडळ-२) तथा समन्वय अधिकारी प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

