भारतीय नौदलाने काल विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका औपचारिक समारंभात आयएनएस आन्द्रोत, हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आपल्या सेवेत दाखल करून घेतले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी, मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयएनएस आन्द्रोत हे 80%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर असलेले एक झळाळते प्रतीक आहे. 77 मीटर लांबी आणि सुमारे 1500 टन वजन वाहून नेणारे, आयएनएस आन्द्रोत विशेषतः किनारी आणि उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी खास डिझाइन केलेले आहे. अत्याधुनिक पाणबुडी शिकारी असलेले हे जहाज प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि संप्रेषण प्रणालींनी सुसज्ज असून भूपृष्ठावरील धोके अचूकपणे शोधू शकते, मागोवा घेऊ शकते आणि निष्क्रिय करू शकते. ते उथळ पाण्यात दीर्घकाळ मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकते.
सागरी डिझेल इंजिनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टीमद्वारे आयएनएस आन्द्रोत अत्यंत चपळ आणि लढाऊ जहाज आहे. त्याची क्षमता सागरी देखरेख, शोध आणि बचाव, किनारी संरक्षण मोहिमा आणि कमी तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्सपर्यंत विस्तारलेली असून ते किनारी ऑपरेशन्ससाठी एक बहुआयामी जहाज ठरते.

आयएनएस आन्द्रोतचा समावेश नौदलाच्या एएसडब्ल्यू क्षमतेत, विशेषतः किनारी भागात शत्रूंकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण बळ पुरवते. लक्षद्वीप समूहातील सर्वात उत्तरेकडील बेट आन्द्रोतचे नाव या जहाजाला देण्यात आले आहे, जे भारताच्या सागरी क्षेत्रात ऐतिहासिक आणि धोरणात्मक महत्त्वासाठी ओळखले जाते. यावेळी बोलताना, प्रमुख पाहुण्यांनी आयएनएस आन्द्रोतसारख्या स्वदेशी निर्मित प्लॅटफॉर्मचे भारताच्या सागरी सामर्थ्याला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले.