काही महिन्यांपूर्वी ठाणे शहराच्या दैनंदिन समस्यांकडे कुणीही गांभीर्याने पाहत नसल्याबद्दल येथेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर टीका केली हॊती. त्यावेळी कारण होते रस्त्यावर कुठेही उभी करून ठेवलेली वाहने उचलून नेण्यावरून. लक्ष्य होते वाहतूक पोलीस! आताही वाहतूक पोलिसांनी कॅडबरी चौकात लावलेल्या विशेष कॅमेऱ्यावरून वाद! हा कॅमेरा सिग्नल तोडणाऱ्या वाहनाना अचूक टिपणारा असल्याने जवळजवळ सर्वच ठाणेकरांनी आणि काही राजकीय पक्षांनी, खास करून मनसेने ‘ओवा’ खाण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे. कारण ठाणेकर, मग तो स्कूटर चालवणारा असो, की स्मार्ट बाईकस्वार, रिक्शावाल्यांचे तर विचारूच नका. ते कुणाच्या पिताश्रींनाही न घाबरता लाल सिग्नल असला तरी रिक्षा दामटवतात! आलिशान गाड्यांचे सकाळी ठीक असते. मात्र रात्री तेही कुणाच्या पिताश्रींना घाबरत नाहीत! बाईकस्वार तर इतके मांजरपाट असतात की, माजिवाडा, कोलशेत रोड, घोडबंदर रोड, कासारवडवली, वर्तकनगर, उपवन आदी परिसरात बंदी असतानाही ‘रो रो’ आवाज करत सुसाट वेगाने हाणत असतात. अशा एवंगुणविशिष्ट ‘पब्लिक’ला हे असे कॅमेरे लावणे बापजन्मात पसंत पडणार नाही. परंतु जनसामान्यांची काळजी घेणाऱ्या सरकारने व त्यांच्या पोलीस प्रशासनाने मात्र या सर्वांचे काहीएक न ऐकता हा कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच झाले. कोणत्याही परिस्थितीत तो मुळीच मागे घेऊ नये.
निवडणुका जवळ आल्यानेच…
कॅमेऱ्याचा प्रश्न घेतला तर कुणाचेच लक्ष जाणार नाही म्हणून त्याच्या जोडीला घोडबंदर रोडवरील वारंवार होणाऱ्या अपघातांचा व प्रचंड वाहतूककोंडीचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, मनसेच्या अविनाश जाधव यांनी हाती घेतला आहे. ठाणेकरांना दररोज भेडसावणारा वाहतूककोंडीचा विषय हाती घेतल्याबद्दल जाधव यांना धन्यवादच दिले पाहिजेत. कारण हल्ली नागरी प्रश्नावरून कुठे आंदोलन होतानाच दिसत नाही. मात्र हे आंदोलन करताना पोलीस, त्यातही वाहतूक पोलिसांनाच ‘टार्गेट’ केल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. ज्या रिक्षावाल्यांची बाजू घेऊन त्यांनी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याशी बातचीत केली (खरंतर जाधवच भाषण देत होते) ते समस्त रिक्षावाले बाजू घेण्यासारखे आहेत काय? याची एकदा जाधव यांनी झाडाझडती घेणे गरजेचे आहे. सिग्नल पडला तरी वेगाने तो मोडणारे रिक्षावाले जाधव यांनी पाहिलेलेच नाही की त्यांना काही माहिती नाही? ठाणे शहरातील प्रत्येक चौकात जाधव यांनी स्वतःचे कॅमेरेवाले लावून रिक्षावाले कसे व काय वागतात यांचे चित्रण करून ते वेळ काढून पाहावे.

टीएमटीच्या बसथांब्यावर बस प्रवाशांना अडथळा होईल अशाप्रकारे रिक्षा कशा उभ्या करून ठेवलेल्या असतात तेही एकदा नजरेखालून घाला. हे तर काहीच नाही. संध्याकाळी गर्दीच्या वेळी सॅटिस पुलाखालील रिक्षाथाम्ब्यावर जाण्यास किती रिक्षावाले तयार असतात यांचे गणितही मांडा. इतकेच नव्हे तर रात्री साडेनऊ वाजल्यानंतर थांब्यावर न जाता आंबेडकर पुतळ्यानजिक उलट फिरून मागे जाणारे रिक्षाचालक मनसेला माहितीच नाही का? रिक्षावाल्यांनी बँकेचा हफ्ता कसा फेडावा याची चिंता करणाऱ्या जाधव यांनी ऐन गर्दीच्या वेळी सवारीला नकार देणाऱ्या रिक्षावाल्यांमुळे कितीजण उशिरा कामावर पोहोचतात याचीही आकडेवारी एकदा जमवावी ना! जाधवजी, ज्याला कर्जावर घेतलेल्या रिक्षाची व हफ्त्याची काळजी असते ना तो रिक्षावाला कधीच सिग्नल मोडणार नाही, हे लक्षात असू द्या! हे हफ्त्याची भाषा करणारे पाच-सहा रिक्षाचे गब्बर मालक असतात. सिग्नल मोडून सुसाट वेगाने बाईक पळवणारे ऑफिसात जाऊन काय दिवे लावतात हे एकदा पाहाच!
या सर्वात राजजी कुठे आहेत?
ठाणे शहर आणि आसपासाच्या समस्यांबाबत ठाणे शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी आवाज उठवत असतात. परंतु ठाण्यातील मनसैनिकांना मुंबईहून पुरेसे पाठबळ मिळत नाही, अशी रास्त तक्रार ज्येष्ठ सैनिकांची असल्याचे समजते. राजसाहेबांनी महिन्यातील दोनतीन दिवसतरी ठाण्यासाठी राखून ठेवावेत अशी यांची अपेक्षा आहे. ठाण्यातील मनसे आंदोलनाला मुंबईचा आशीर्वाद म्हणावातसा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याची कुजबूज कानावर आली आहे. मुंबईतील लढाऊ नेत्यावर ठाणे शहराची जबाबदारी द्यावी, अशी सैनिकांची मागणी आहे. ठाणे शहरात अन्य नेते आहेत. परंतु ते स्वतःच्या व्यापात इतके बिझी असतात की त्यांना मनसे आंदोलनात भाग घ्यायलाही वेळ नसतो, म्हणूनच आम्हाला मुंबईचा नेता बुस्टर म्हणून हवा अशी भावना वाढीस लागली आहे.

वाहतूककोंडी आजची नाही!
काही राजकीय पक्षांना ठाणे शहर व आसपासच्या भागातील वाहतूककोंडीचा साक्षात्कार आजकाल झाल्याच्या अविर्भावात जे बोलत आहेत त्यांची आजिबातच गरज नाही. कारण वाहतूककोंडी आणि प्रचंड वाहतूककोंडी हा शब्द गेली दहा-पंधरा वर्षे ठाणेकरांच्या रोजच तोंडात असतो, हे कुणीही सांगेल. मुंबई शहर व दोन्ही उपनगरांच्या तुलनेत ठाणे आणि आसपासच्या भागातील घराच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने नोकरदारांची येथे प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यातच या गर्दीचे नियोजन व शहर नियोजनाचा येथे काहीच पत्ता दिसत नसल्याने सध्याच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. “A traffic jam is collision between free enterprise and socialism. Free enterprises produces automobiles faster than socialism can build roads and road capacity” हे वाहतूककोंडी व गर्दीचे प्रमुख कारण कोणी समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. त्यामुळेच ही समस्या गंभीर होत आहे.
सरकारने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करत असतात. लोकप्रतिनिधी विविध ठिकाणी फिरून काही उपयुक्त माहिती गोळा करतात. विविध समित्यांशी चर्चा होतात व अंती नियम तयार होतात. नियम काही आकाशातून पडत नाहीत वा ते काही एकाधिकाऱ्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना नसते. म्हणूनच मनसेने पोलिसांवर आगपाखड करण्याऐवजी नियम तयार करणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, ठाण्याचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आदींशी चर्चा करून काही ठोस धोरण ठरवले तर त्यांचे स्वागतच होईल. पण एकट्या वाहतूक पोलिसांना बोल लावणे योग्य नाही. पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणेला वाव आहे. पण त्यांनाच सतत धोपटणे योग्य नव्हे. नागरिकांनाही चार गोष्टी सुनावा ना! की नागरिक कधीच चुकत नाही असे मनसेला वाटते! “When you factor in population growth it is clear that mobility model that we have today simply will not work tomorrow” हे साधे तत्त्व आपले प्रमुख राजकीय नेते व सनदी अधिकाऱ्यांना माहिती नसावे हे शहराचेच दुर्दैव नाही का?
छायाचित्रः प्रवीण वराडकर

