Homeडेली पल्सकाँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आहे. हा व्यवहार रद्द करून नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेसला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मुंबईत टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, मंत्रालयासमोर नरीमन पाईंट येथे काँग्रेस पक्षाचे गांधी भवन हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये अनेक वर्षांपासून होती. मुंबई मेट्रो टप्पा-३चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना MMRDA आणि MMRC यांनी कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे असे पत्र २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेसला दिले होते. आता मात्र मेट्रो कार्पोरेशन व सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेसशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. ५ सप्टेंबरला या व्यवहाराचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांना कार्यालये बांधून देणार असल्याच्या आश्वासनाची माहिती मेट्रो कार्पोरेशनने रिझर्व्ह बँकेला न देऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकार जर राजकीय पक्षांची अशी फसवणूक करत असेल तर सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणात किती फसवणूक करत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५२०० कोटी रुपये आहे. पण ३४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १८०० कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे. हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तत्काळ रद्द करावा अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली व त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही दाखवला. काँग्रेसला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट तेथील पूर्वीच्या जागीच काँग्रेस पक्षाला कार्यालय द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content