देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यांतून अश्रू आपोआपच कधी झिरपतील, हे लक्षातच येणार नाही. हे पुस्तक शहरातील प्रत्येक कुटूंब सदस्यांसमोर रात्री झोपताना वाचलं जावं, जेणेकरून त्यांना ग्रामीण भागातील परिस्थिती किती भयावह आहे, याची जाणीव होईल.
‘गोष्ट नर्मदालयाची’, या पुस्तकावर भाष्य करताना अमिता बडे म्हणतात की, सुखवस्तू घरातील एक मुलगी जी नर्मदेसारखीच स्वच्छ मनाची आणि अवखळ! शाळेपेक्षा निसर्गात रमणारी! तारुण्यात अरुणाचल प्रदेशात अतिशय दुर्गम भागात विवेकानंद केंद्राची शाळा चालवते! वयाच्या मध्यात एका अनामिक ओढीने नर्मदा परिक्रमा पूर्ण करते. परिक्रमेत आलेल्या सामाजिक विषमतेच्या कटू अनुभवाने व्यथित होऊन मोठ्या रकमेची नोकरी सोडून नर्मदेच्या काठावर मुलांना शिकवण्यासाठी जाऊन राहते… फक्त दीड वाटी तांदूळ घरात असताना आलेल्या परिक्रमावासियांना खाऊ घालणाऱ्या मोठ्या मनाच्या दरिद्री मातेच्या श्रीमंतीने भारावलेल्या भारती ठाकूर ज्यांचे आदर्श आहेत स्वामी विवेकानंद आणि विवेकानंद केंद्राची स्थापना करणारे एकनाथजी रानडे! आज भारती ठाकूर परिव्राजक अवस्थेत आहेत. त्या आज संन्यस्त आहेत.
‘गोष्ट नर्मदालयाची’ पुस्तकातून सामाजिक विषमतेचे दाहक दर्शन पदोपदी घडतं. ते वाचत असताना नकळत वाचक म्हणून आपणही अंतर्मुख होतो. आजही २१व्या शतकात स्त्री-पुरुष विषमता, आर्थिक भेद, सामाजिक भेद, जातिभेद अशा गोष्टी किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचं सखेद आश्चर्य वाटतं राहतं. खोलवर रुजलेल्या विषमतेला निरागस मुलंदेखील कशी बळी ठरतात, हे जाणवतं. याबाबत भारतीताईंनी एक प्रसंग पुस्तकामध्ये नमूद केला आहे. ‘जोशी काकांच्या मदतीनं मंडलेश्वरपासून तीन-चार किलोमीटर अंतरावरील सेवावस्तीतल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. सरकारी शाळेच्या इमारतीमधील एक प्रशस्त खोली वापरायला मिळाली. मला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे, या शाळेत विद्यार्थी अथवा शिक्षकांसाठी संडास नव्हते. विजेचे कनेक्शन नव्हतं. कारण, त्याचं बिल कोण भरणार? लाईटची सोय केली, तर शाळेचा उपयोग गावकर्यांना रात्री दारू पिण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठीसुद्धा होऊ शकतो, ही त्यामागे भीती. आसपास अत्यंत कमी उत्पन्न गटातील लोकांची घरं होती. प्राथमिक शाळाच असल्याने वर्ग फक्त पाचवीपर्यंतच होते. पण, पाचवीपर्यंत शिकूनही मुलांना लिहिता-वाचता येत नव्हतं. शाळा सकाळी ११ला सुरू व्हायची. शाळेच्या आसपासच मुलं राहात होती. मुलांशीही दोस्ती झाली. ७०-८० मुले शिकायला येऊ लागली. खेळ, गाणी, गोष्टी आणि अभ्यासही. काही दिवसांनी एक नवीन चेहरा वर्गात दिसू लागला. सगळ्यात मागे जाऊन तो बसायचा. कोणाशीही बोलायचा नाही फारसा. मी त्याला विचारलं, “अरे, कोण आहेस तू?” मला त्याचं नाव अपेक्षित होतं. पण, तो उठून उभा राहिला, मान खाली घालून सावकाश पावलं टाकीत माझ्या खुर्चीजवळ आला आणि फक्त मला ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाला, “मॅडमजी, मी हरिजन आहे.” नकळत माझे डोळे पाणावले. केवढी मोठी चूक केली होती मी त्या लेकराला प्रश्न विचारताना! त्याला नाव विचारायला हवं होतं. मी खुर्चीतून उठून उभी राहिले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “बाळा, यानंतर पुन्हा कधी हे उत्तर कुणाला देऊ नकोस. आपण फक्त माणसं आहोत. मला फक्त तुझं नाव विचारायचं होतं. मला ‘मॅडम’ नको, या मुलांप्रमाणे तूदेखील ‘दीदी’च म्हण…” असे अनेक प्रसंग, घटना भारतीताईंना इथं काम करताना पदोपदी अनुभवास आले आणि त्याचं कथन त्यांनी पुस्तकात केलं आहे.
सामाजिक परिस्थितीबरोबर सरकारची गावखेड्यातील मुलांच्या शिक्षणाबाबत असलेली अनास्था, विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण आणि त्या पद्धतीमध्ये अनावश्यक गोष्टींचा बोजा मुलांवर असल्याने शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात असलेली अनास्था, तसंच शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवनानुभवात असलेली तफावत, तसंच आजची मुलं ही विद्यार्थी न होता केवळ परीक्षार्थी होत असल्याच्या मुद्द्याकडे भारतीताई नेमकेपणाने भाष्य करतात. या सर्व सामाजिक जोखडातून बाहेर पडत, सरकारनं आखून दिलेल्या शैक्षणिक चौकटीतच राहून मुलांना ज्ञानाची आणि नवीन विश्वाची ओळख भारतीताईंनी करून दिली. शिक्षण आणि वास्तव आयुष्य एकमेकांना सामावून घेत मुलांना नवीन विश्वाची ओळख करून दिली. यातूनच २०१०मध्ये मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदेच्या किनारी असलेल्या लेपा गावात ‘निमाड अभ्युदय रूरुल मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपेमेंट असोसिएशन’ अर्थात ‘नर्मदालय’ संस्थेची स्थापना केली. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील मुलांना समग्र शिक्षण मिळावं, या उद्देशाने ही संस्था सुरू झाली. संस्थेत शिकायला आलेल्या मुलांना नवीन शिक्षण घेताना त्यांची पाळमुळं मातीशी जुळलेली कशी राहतील, हे आवर्जून पाहिलं.

यासंदर्भात अनेक हृद्य प्रसंग पुस्तकात आहेत. पण, एक प्रसंग वाचून या मुलांचं आणि त्यांच्यावर संस्कार करणार्या भारतीताई आणि त्यांच्या सहकार्यांचं कौतुक वाटतं. भारतीताईंनी लिहिलं आहे की, ‘आश्रमातील लहान मुलं सरकारी शाळेत शिकत. अभ्यासात जी काही मदत लागेल ती आम्ही आश्रमात करत असू. एक गोष्ट लक्षात आली की, ही मुलं अभ्यासात मागं आहेत, होती. गोविंद आणि शिवम दोघं नववी नापास झाले होते. त्यांना पाचवीच्या परीक्षेला बसवलं असतं तरीसुद्धा ते पास होऊ शकले नसते. कारण, त्यांचे इंग्लिश आणि गणित हे विषय फारच कच्चे होते; पण तांत्रिक गोष्टींचं ज्ञान त्यांना भरपूर होतं. महाराष्ट्रातील पाबळ येथील विज्ञान आश्रमात ग्रामीण तंत्रज्ञानाच्या एक वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमासाठी त्यांना पाठवलं. मुलांची फी परिचितांनी भरली. दोन्ही मुलं तिथं छान रमली. शालेय अभ्यासाचा ताण नाही आणि आवडणार्या तांत्रिक गोष्टी त्यांना शिकायला मिळत होत्या. बघताबघता एक वर्ष सरलं. विज्ञान आश्रमात कॅम्पस सिलेक्शनसाठी अनेक कंपन्या येत. या दोघांचीही पुण्यातल्या काही कंपन्यांमध्ये निवड झाली. पण, “भारतीदीदी आमच्यासाठी शहर सोडून खेड्यात आलीय, तर आता आम्ही खेडं सोडून शहरात जाणार नाही,” असं सांगून त्यांनी शहरातली नोकरी नाकारली. एखादा खूप मोठा पुरस्कार मिळाल्यावरसुद्धा झाला नसता इतका आनंद त्यांच्या या वाक्यानं मला झाला.’’ हे कथन करताना भारतीताईंनी कोणताही अहंभाव न ठेवत अतिशय आत्मियतेनं, निर्मळपणं, ओघवत्या शैलीत केलं आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना वाचकही त्यात समरसून जातो.
‘नर्मदालय’ संस्थेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देऊन परीक्षार्थी केलं जात नाही, तर त्याच्या जोडीनं त्यांना सुतारकाम, वेल्डिंग, वीजजोडणी, प्लंबिंग, गोशाळा व्यवस्थापन, जैविक शेती, गृहव्यवस्थापन यासारखे विषय शिकवले जातात. त्यामुळेच हे विद्यार्थी शाळेसाठी लागणारे बेंच, डेस्क, टेबल असं फर्निचर तसंच वसतिगृहासाठी लागणारे पलंगदेखील बनवतात. ‘नर्मदालय’मध्ये ४५ गायी असून दूध काढण्यापासून ते गाईंचं बाळंतपण करण्यापर्यंत सर्व व्यवस्थापन शाळेतील मोठी मुलं करतात. त्याचप्रमाणे वसतिगृहातील भोजनासाठी लागणारी बहुतांश भाजीदेखील ही मुले शेतात काम करून उगवतात. या सगळ्यांमधून इथल्या मुलांमध्ये शहरातील मुलांपेक्षा सर्वकेंद्रित जीवनदृष्टी अधिक आहे. आत्मकेंद्री, स्वार्थी विचारांपासून इथली मुलं खूप दूर आहेत. संस्थेत आलेल्या ज्या मुलांना संगीताची आवड आहे. त्यांना संगीताचं शिक्षण दिलं जातं. त्यासंदर्भातील एक हृद्य किस्सा भारतीताईंनी सांगितला आहे. ‘नर्मदालय’ संस्थेतील मुलींची गाण्यातली जाण आणि प्रगती दिवसेंदिवस वाढत होती. स्पर्धांमध्ये बक्षीसंपण मिळत होती. मला मात्र त्यांनी कुठल्याही स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असं वाटायचं. त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी गाणं शिकावं, साधना म्हणून गाणं शिकावं असं वाटे. मध्य प्रदेश सरकारनं आयोजित केलेल्या नर्मदा जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय समूहगान स्पर्धेत एका परिचितानं भारतीताईंना न सांगता संस्थेचं नाव दिलं. स्पर्धेतील विजेत्यांना ५० हजारांचं पारितोषिक होतं. स्पर्धेत मोठे वाद्यवृंद, भजनी मंडळी त्यात सहभागी होणार असल्याने त्यांच्यासमोर पाचवी-सहावीत शिकणार्या चिमुरड्यांचा निभाव कसा लागणार, ही भीती भारतीताईंना होती. त्यांनी स्पर्धेत फार रस घेतला नाही. स्पर्धेच्या दिवशी संध्याकाळी आयोजकांचा फोन आला. तेव्हा भारतीताईंचा निकटचा सहकारी दिग्विजयनं उचल घेतल्यानं मुलींना घेऊन त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेल्या. मुलींनी तिथं गाणं गायलं. रात्र खूप झाल्यानं दिग्विजय सोडून आम्ही बाकी परत आलो. रात्री २.३० वाजता त्यानं फोन करून सांगितलं की, “दीदी, ‘नर्मदालया’ला ५० हजारांचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे.” मुलींना सकाळी ही आनंदाची बातमी सांगितली. त्यावर त्यांनी हो का? इतकीच प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हे बक्षीस संस्थेच्या खात्यात जमा झालं तेव्हा त्या चौघींना साडेबारा हजार रुपये दिले जातील असं सांगितलं. या पैशांचं काय करणार, असंही विचारलं. तेव्हा त्या चौघी मुलींनी मला सांगितलं, “दीदी, या पैशांतून आपण ‘नर्मदालया’साठी साऊंड सिस्टीम विकत घेऊ या…” त्या मुलींच्या घरच्यांनीहीदेखील हाच आग्रह धरला. जेव्हा संस्थेनं स्वतःची साऊंड सिस्टिम घेतली तेव्हा त्या मुलांना झालेला आनंद काही औरच होता…’ हे असे प्रसंग वाचताना ते डोळ्यासमोर उभे राहतात आणि आपणही त्यात गुंतून जातो.
इथल्या मुलांमधला समजूतदारपणा आणि परिस्थितीची जाण पाहून स्तिमीत व्हायला होतं. ‘नर्मदालय’ संस्थेच्या उभारणीमध्ये समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. त्यांच्या मदतीमुळे आणि सदिच्छांमुळे संस्थेच्या तीन शाळा, वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, १७००हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली १५ समग्र शिक्षण केंद्रं, रोज ४५०-५०० मुलांना मध्यान्ह भोजन असं कार्य सुरू आहे. अर्थात, या कामांमध्ये सरकारी बाबूंच्या आडमुठेपणालाही भारतीताईंना सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी अशा बाबूंसमोर रुद्रावतार धारण करत एकाही पैशाची लाच न देता काम करून घेतलं. अशा माणुसकी घालवणार्या लोकांपेक्षा माणुसकी जपणाऱे अधिक असल्यामुळे भारतीताईंच्या कार्याला नेहमीच बळ मिळालं. नर्मदा परिक्रमेनंतर आध्यात्मिक वाट निवडण्याचा विचार करणार्या भारतीताईंनी ‘नर्मदालया’च्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केलं. परंतु, या सर्वाचं श्रेय त्यांनी कधीच घेतलं नाही. त्या स्वतःला केवळ याचं निमित्तमात्र म्हणवतात. त्यांच्या या निरपेक्ष स्वभावामुळेच संस्थेची घडी स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याची धुरा तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात सोपवली आणि अतिशय शांतचित्ते त्यांनी संन्यस्त धर्माचा स्वीकार केला. ‘गोष्ट नर्मदालयाची’ हे पुस्तक पालकांनी आणि खास करून विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायलाच हवं. यातूनच शहरातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सहजपणं मिळणार्या शैक्षणिक सुविधा खेड्यापाड्यातील मुलांसाठी किती दुर्लभ असतात, याचं भान निश्चितपणे येईल. पुस्तक वाचताना वाचक म्हणून आपण प्रगल्भ होतोच. परंतु, माणूस म्हणूनही अधिक विवेकी होतो. हेच या पुस्तकाचं फलित आहे.
पुस्तक: गोष्ट नर्मदालयाची
लेखिका: भारती ठाकूर
प्रकाशक: विवेक प्रकाशन
मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- २४४
कुरिअर खर्च- ५० ₹. एकूण- ३०० ₹.मध्ये घरपोच

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)