Homeकल्चर +स्टोकहोल्ममध्ये रंगली अभंगवारी!

स्टोकहोल्ममध्ये रंगली अभंगवारी!

‘मोरया .. मोरया .. मोरया .. मोरया’ गणपती बाप्पाच्या गजरातून आणि ‘राम कृष्ण हरी… जय जय राम कृष्ण हरी…’ ह्या मंत्रोच्चारातून, तानपुऱ्याच्या ठेक्यावर एका सुंदर वातावरणनिर्मितीला सुरुवात होते.. मंचाच्या मधोमध लावलेल्या पडद्यावर झळकणारी पंढरपूरची चंद्रभागा आणि तिच्याकडे झेपावणाऱ्या वारकऱ्यांची तरल चलचित्रे प्रेक्षकांना हळूहळू वारीशी समरस करून घेतात. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली, कपाळावर बुक्का-चंदनटिळा लावलेली चमू लक्ष वेधून घेते.. काहींच्या डोक्यावर- ‘अभंगवारी’ कोरलेल्या शुभ्र टोप्याही असतात. उजवीकडे मांडलेली विठुरायाची लोभस मूर्ती, कर कटेवर ठेवून मंद स्मित करत अभंगवारीसाठी सज्ज झालेली असते. आणि त्याच मनोवस्थेत ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ हृदयाचा ठाव घ्यायला लागतो…

पार्श्वसंगीत गायनात साथ करणाऱ्या आपल्या मंचावरील संघाला थांबवत महेश काळे श्रोत्यांना ‘पांडुरंग माउली.. विठ्ठल माउली’ गाण्यासाठी खुणावतात आणि सभागृह विठ्ठल गजराने भारून जातं. मग ‘अबीर-गुलाल उधळीत रंग नाथाघरी मनाचे माझा सखा पांडुरंग’… अभंग ह्या आनंदाला वेगळ्या उंचीवर नेतो. मनोमन डोलणारे प्रेक्षक सहज ठेका धरतात. सोबतीनं गायला लागतात. ह्याच ऊर्जाप्रवाहाला पुढे नेत ‘आता मी अनन्य येथे अधिकारी’ म्हणत कधी चिपळ्या वाजवत, कधी गळ्यात अडकवलेली झांज वाजवत ते मंच आणि श्रोत्यांच्या मधली सीमारेषाच  पुसून टाकतात. ह्या क्षणी सगळं सभागृह एकरूप होऊन गात असतं.. उभं राहून टाळ्या वाजवत असतं.

महेश काळे आणि त्यांचा चमू मंचावरून उतरून, अनवाणी चालत, ‘विठ्ठल विठ्ठल’ गात, पारंपरिक पावली खेळत रसिकांमध्ये सामील होतो आणि हृदयाला भिडलेलं काहीतरी अव्यक्त, कित्येकांच्या डोळ्यांतून झराझरा वाहायला लागतं… गाण्यातून विठ्ठल उभा करणाऱ्यासमोर सगळ्यांनाच नतमस्तक व्हायला होतं. हातात हात मिळवले जातात. त्यांच्या सहज पाया पडल्या जातं. ते हात जोडून, वाकून रसिकांना नमस्कार करतात आणि रसिकांची रजा घेतात.

त्यांची अभंगवारी सुफळसंपूर्ण झालेली असते. त्यांनी गाण्यांतून दाखवलेला विठठल रसिकांच्या हृदयात कायम कोरला जातो. बहुमोल सन्मानाचं नोबेल पारितोषिक ज्या सभागृहात वितरित केलं जातं त्या १०० वर्षे जुन्या ‘Konserthuset’च्या भव्य दालनात ही अभंगवारी संपन्न झाली. ह्या सभागृहाला गर्दी आणि टाळ्या नवीन नसाव्यात. पण ‘विठठल’ नादाच्या अलौकिक ऊर्जेने त्यादिवशी, सभागृहाच्या भिंतींदेखील डोलल्या असाव्यात. गेल्या ६-७ महिन्यांचा अंधार आणि थंडी संपून इथे युरोपात वसंतागमन झालंय आणि ह्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात शास्त्रीय गायक महेश काळे आणि त्यांचा चमू, त्यांची अभंगवारी घेऊन स्टोकहोल्ममध्ये दाखल झाली होते. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच बाहेर ऊन पडल्यामुळे हा संगीतोत्सव स्टोकहोल्मकरांसाठी खऱ्या अर्थाने वसंतोत्सव झाला होता. ही पैलतीरावरील साद विठूरायाच्या काळजापर्यंत पोहोचली असावी म्हणूनच की काय भारतातील विविध शहरं-राज्यांतून निघालेली ही अभंगवारी देशाच्या सीमारेषा पुसून युरोपातील बर्लिन शहरी सुरु होत आमच्या स्टोकहोल्मला येऊन संपन्न झाली…

– शैला धाबे, स्वीडन

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content