नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी – २०२४ सत्रातील टप्पा-४च्या लेखी परीक्षेला येत्या शनिवारपासून, २२ मार्चपासून प्रारंभ होत आहेत. या परीक्षेत वैद्यकीय विद्याशाखेतील दुसऱ्या वर्षाच्या (Old /2019 Supplementary), 1 year BAMS/BUMS (2021) and BHMS (CBDC-2022) या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचे संचलन २२ मार्च २०२५ ते ०९ एप्रिल २०२५दरम्यान होणार आहे.
राज्यातील एकूण १०४ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेसाठी उक्त अभ्यासक्रमांचे एकूण १६४१४ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. हिवाळी-२०२४ टप्पा-३मधील तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. व अंतिम वर्ष एम.बी. बी.एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Basis) ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. हिवाळी २०२४ टप्पा-४ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठवून, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेंचेही संपूर्ण डीजीटलायझेशन करण्याचा मानस असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.
वैद्यकीय विद्याशाखेच्या दुसऱ्या वर्षातील (Old /2019 Supplementary), 1 year BAMS/BUMS (2021) and BHMS (CBDC-2022) या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ९.०० वाजता व दुपारच्या सत्रासाठी दुपारी १.०० वा. परीक्षाकेंद्रावर हजर राहणे आवश्यक असल्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.