Monday, February 24, 2025
Homeमाय व्हॉईसअडचणींचे डोंगर संपल्यानंतरच...

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!, असे म्हणतात ते उगाच नाही. प्रयागराज क्षेत्राच्या नैनी तटावरील अरैल घाटावर पहाटे साडेपाच-सहा वाजता आम्ही चाललो होतो, तेव्हाही तिथे आमच्या आजुबाजूने किमान दोन-तीन हजार लोकं चालत होते. काही घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. काही पहाटे, रात्री आंघोळी उरकून घाटावरून परत निघाले होते. ही गर्दी कालच्या रात्री आम्ही अनुभवली होती त्यामानाने बरीच कमी होती. रात्री इथून चालताना दादर वा व्हीटी स्टेशनात गाडीचा गोंधळ असतो तेव्हा जशी घुसमटवणारी गर्दी असते, त्या घनतेने लोक रस्त्यावर होते. आजूबाजूला मराठीत बोललण्याचा आवाज आला, म्हणून चौकशी केली. तर एक तरूण मुलगा बॅग खेचत पुढे निघाला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी हातातील लहान बाळाला सावरत चालत होती. मुंबई शहरातील कुलाब्यातून हे कुटूंब आले होते. पहाटे नैनी रेल्वेस्थानकात उतरले. मजल दरमजल करीत चार तासांनी अरैल घाटाजवळ पोहोचले. त्यांनी सेक्टर चोवीसमध्ये तंबूचे बुकिंग केले होते. अशी कित्येक कुटुंबे लहानलहान बाळांना घेऊन कुंभच्या गर्दीत दिसली होती. पवित्र स्नान मुला-बाळांनाही घडावे म्हणून मंडळी थंडी, वाऱ्यातही येताना दिसली. रस्त्यावरून अक्षरशः हजारो माणसे फिरत होती.

तिथे जवळच डिव्हाईन कुंभ कँपमध्ये आमचाही निवासाचा तंबू होता. परिसरातील दिवे रात्रभर जळतच होते. मोटारसायकलींचे, सायरनचे आवाज निनादत होते आणि त्याहीपेक्षा अधिक आवाज जाणाऱ्या येणाऱ्या जनतेचा, कानी पडत होता. प्रयाग संगम क्षेत्राच्या अवतीभोवती सुमारे चार किलोमीटर नदीपात्रात लोकांना आंघोळीची सुरक्षित सोय हे या कुंभचे मोठे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. माती वाळूच्या पोत्यांचे तात्पुरते घाट केले आहेत. पण हे घाट आता महिनाभर दररोज करोडो लोकांच्या वावरातही टिकून राहिले, असे पक्के झाले आहेत. नदीकाठी चालण्यासाठी मोठे रस्ते केलेले आहेत. तेही तातपुरते.. म्हणजे माती व वाळूवर मोठमोठे पत्रे पसरून तयार केलेले, असे आहेत. गंगेच्या विस्तीर्ण पात्रात इकडून तिकडे जनतेला जाता यावे यासाठी लष्करी धाटणीचे पिंपावर पत्रे बांधून केलेले पुलिया नामक 27 पूल बांधले आहेत. शिवाय रस्ते व रेल्वेचे दोनतीन मोठे पूल दोन्ही तीरांना जोडतात, ते आहेतच. पण ही सारी व्यवस्थाही अपुरी पडावी अशा महाप्रचंड संख्येने लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. दररोज किमान एक कोटी व पर्व स्नानाच्या महत्वाच्या दिवशी किमान तीन कोटी जनता प्रयागमध्ये थडकते आहे. अद्भुत म्हणावे असेच हे दृष्य आहे.

प्रयागाला पोहोचणे हे मात्र एक दिव्य आहे. आम्ही लखनौवरून आधी अयोध्येला गेलो. तिथे पोहोचायलाही बराच ट्रॅफिक जाम सहन करावा लागला. तिथून दुसऱ्या दिवसी प्रयागकडे निघालो तो वाटेत किमान चार तास अडकत, थांबत, वाट पाहत घालवावे लागले. दुपारी 1 वाजता आम्हाला फाफामऊ गावातली पार्किंग 1मध्ये थांबवण्यात आले. पुढे जाण्याचे रस्ते वाहतुकीसाठी बंदच होते. गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. बसेसचा महासागर उसळल्याचे दृष्य होते. आम्हाला मुक्कामासाठी नैनी भागातील अरैल घाटाजवळ पोहोचायचं होते. पार्किंगमध्ये एक मदतकेंद्र दिसले. त्याला विचारले तर तो म्हणाला की “मला काहीच सांगता येणार नाही, तिथे कसे पोहोचायचं ते… पण पुष्कळ लांब आहे. तुम्ही पंधरा किलोमीटर चालण्याची तयारी ठेवा..” आम्ही हबकूनच गेलो. कुणीतरी भल्या बाईने सांगितले की, तिथे पलिकडे बसडेपो आहे. तिकडून तुम्हाला प्रयागच्या बँक रोडवर सोडतात. तिथून तुम्हाला ई-रिक्षा मिळेल. तसा प्रयत्न करावा म्हणून गर्दीतून गाड्यांच्या गदारोळातून धक्के खात, एकमेकांचे हात धरून वाट काढत गेलो. पण त्या स्टँडवर कोणती बस कुठे जाणार, ती कधी सुटणार काहीच माहिती सांगितली जात नव्हती. सांगणारे कोणीच दिसत नव्हते. ना अधिकारी होते, ना कंडक्टर-ड्रायव्हर. एक बस आत आली की त्यामागे शे-दोनशे माणसे पळत होती. काही लोक तासभर बसमध्ये बसून होते. सुटेल की नाही व जाईल कुठे, पत्ता लागत नव्हता. तिथे ना कोणी अधिकारी दिसत  होते, ना माईकवरून कोणती उद्घोषणा केली जात होती. कसलाच काही पत्ता लागत नव्हता.

बसचा नाद सोडला. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला पटवून चारपाच किलोमीटर गावात जाऊ असे म्हणून तयार केले. त्याच्या बॉसने त्याला बजावले होते की फाफामऊ पार्किंगमध्येच गेस्टना सोड, त्यापुढे जाऊ नको. ट्रॅफिकमध्ये गाडी फसून जाईल, वगैरे वगैरे… पण जादा पैशाच्या लोभाने तो तयार झाला. गावातील मुख्य रस्त्यावर पोहोचलो तेव्हा नशीबाने एक ई-रिक्षा मिळाली. तो म्हणाला की, एका पॉईंटपुढे आपली गाडीही जाऊ शकणार नाही. तिकडून चालत तीन किलो मीटरवर जा. बोट मिळेल व बोटीने स्नानासाठी संगमाकडे जाऊ शकाल. पण अरैल घाटाकडे तो म्हणाला, मीच काय, आम्ही कोणीच येऊ शकणार नाही. नया पूल पलिकडे तुम्हाला चालत जावे लागेल. तिकडून मोटारसायकलवाली पोरं भेटली तर त्यांच्यासोबतच जाता येईल. अरैलकडे रिक्षा, मोटार काही जाऊ शकणार नाही. आम्ही चिंतेत पडलो. पण निघालो. कारण पोहोचणे तर भागच होते. फाफामऊ ते संगमाजवळचा त्याचा पॉईंट यायलाच मुळी चार तास उलटून गेले होते. मध्येमध्ये इंच इंच लढवत ट्राफिक सुरु होते. त्याने जिथे सोडले तिथून संगमावर न जाता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू असा विचार करून आम्ही चालत सुटलो. मुक्कामाच्या दृष्टीने घेतलेल्या सॅका जड झाल्या होत्या. त्या सांभाळत गर्दीत एकमेकांना सांभाळत पुढे जात होतो. पुलाच्या अलिकडे दोन बाईकवाली पोरं भेटली. त्यांनी हो नाही करता करता आठशे रुपयात दोन लोक सोडायचे मान्य केले. प्रत्येक बाईकवर आम्ही दोघे व चालवणारा असे तिबल सीट प्रवास सुरु झाला. तो मात्र सुरळीत पार पडला व दुपारी 2 वाजता पार्किंगकडून सुरु झालेला आमचा प्रवास नैनी अरैल घाटाजवळ सायंकाळी सात वाजता संपला. टेंट कँपमध्ये पोहोचलो तेव्हा दमून दमून आमची हालत खराब झालेली होती. कँपवाला म्हणाला की बरे तुम्ही बाईकने आलात. कारण दुसरे आमचे गेस्ट मोटारने येताहेत, ते दहा दहा तास ट्रॅफीकमध्ये अडकले आहेत.

अडचणी

इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेला प्रयागला येण्याचे आवाहन करणाऱ्या मोदी व योगी सरकारांनी लोकांना नीट व सुयोग्य माहिती मिळण्याची तरी नीट व्यवस्था करायला हवी होती. पार्किंगमधून सुटणाऱ्या बसगाड्यांमध्ये थोडी शिस्त ठेवायला हवी होती. फलक हवे होते. गाड्यांत चढण्यासाठी नीट रांगा लावल्या असत्या, तर विनासायास लोक संगमाकडे कूच करू शकले असते. पण एकदा तुम्ही प्रयाग संगम व नदीपात्रात पोहोचलात की सारे भरून पावल्याचे समाधान मात्र मिळत होते. तपाशिवाय सिद्धी नाही, याचा प्रत्यय येत होता, म्हटले तरी चालेल! नदीच्या पात्रात उतरणे सुलभ व सेफ आहे यातही शंका नाही. आंघोळीसाठी कठडे लावून खोल पाण्याकडे तुम्ही जाणारच नाही याची चोख व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आणि मुळात गंगेचे पात्रच विस्तीर्ण असल्यामुळे आंघोळीच्या ठिकाणी गर्दी जाणवतच नाही. जी काही गर्दी, भीतीदायक चेंगराचेंगरीची शक्यता, ही सारी रस्त्यावर, नदीच्या वाळवंटापर्यंतच. पात्रात सारे सुटसुटीत. भरपूर लांब अंतरावर, असतात. हे अद्भुत आहे. गंगेचा त्रिवेणी प्रवाह अतिशय स्वच्छ नीतळ आरस्पानी असा आहे. त्यात पाय बुडवता क्षणीच थंडी वगैरे गायब होते. पण आपण म्हणू की पाण्यात बुडी मारायची आहे, तसे करता येत नाही. पाणी गुढघ्याच्या वर येतच नाही. दोन फुटांच्या वाहत्या पाण्यात तुम्ही मांडी घालून बसू शकता इतकंच. आडवा झोपलेला माणूसही डोकं, पोट, पायाकडून पाण्याच्या वरच राहतो!

पाण्यातील तो अनुभव विलक्षण म्हणावा, अद्भुत वाटावा असा आहे. आस्थेची बुडी मारण्याचा आनंद, तिथे पोहोचण्याचे कष्ट, भीती, अनिश्चितता सारे क्षणार्धात विसरायला लावतो. आंघोळीनंतर पुन्हा फाफामऊ पार्किंगला पोहोचण्याचे दिव्य त्याच उलट्या पद्धतीने पार पाडावे लागले. बाईक, नंतर काही अंतर चालत, नंतर ई-रिक्षा बँक स्ट्रीटपर्यंत, तिथून गंगा ओलांडण्याच्या पॉइंटपर्यंतच रिक्षा जाऊ शकली. कारण ट्रॅफिक जाममध्ये गाड्या हलतच नव्हत्या. सकाळी 9 वाजता सुरु केलेला परतीचा प्रवास तळपत्या उन्हात चालत पूल ओलांडून तीन किलोमीटरचे अंतर पायी पार करून नंतर संपला. तोही एका दयाळू मोटारवाल्याने लिफ्ट दिली म्हणून. जानेवारीपासून देशभरात एक लाट उसळली आहे, की “चला, कुंभ मेळाव्यात जाऊया!” या लाटेने आज मितीपर्यंत सुमारे पंचावन्न कोटी लोकांना तिकडे लोटले आहे. पुढच्या तीन दिवसात ही संख्या सहजच साठ कोटींच्या पुढे जाईल. एका अंदाजानुसार, 140 कोटींच्या भारत देशात सुमारे 110 कोटी लोक हे हिंदु संस्कृती, सनातन धर्माचे आहेत. आता धर्माला वा पंथाला ते मानतात की नाही हा भाग अलाहिदा. पण हे स्पष्टच आहे की तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक, आपल्यातील प्रत्येक दुसरा माणूस हा कुंभमेळाव्यात जाऊन स्नान करून परतला आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी प्रत्येक तिसरा व्यक्ती कुंभ स्नानाचे पाणी अंगावर घेऊन आलेला आहे. ही एक पर्वणी ठरली आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अमेरिकेतले बेकायदेशीर नागरीक हे भारतातल्या बांगलादेशींसारखेच!

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवायला सुरुवात केली आहे. जगभरातील जे लोक अमेरिकेत बेकायदा राहतात त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे वचन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. सत्तेवर येताच त्याच्या पूर्ततेची पावले टाकायला त्यांनी सुरूवात...

24×7 इलेक्शन मोडवर आहोत हे पुन्हा दाखवून दिले भाजपाने!

दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाप्रणित रालोआचे तिसरे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला प्रचंड सुखावणारी घोषणा केली. ती...

केवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने नाही मिळणार मते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर मेळावे झाले. दोन्ही सभांना साधारण तितकीच गर्दी जमली होती आणि दोघेही एकमेकांना दूषणे देत होते, हे मुंबईकरांनी पाहिले, अनुभवले. दिवंगत बाळासाहेब...
Skip to content