Homeन्यूज अँड व्ह्यूजसोशल ड्रिंकिंग, वाईन,...

सोशल ड्रिंकिंग, वाईन, बियर, व्हिस्की.. सारेच कॅन्सरला निमंत्रण देणारे!

अट्टल दारुडे तसेच सोशल ड्रिंकिंगच्या नावावर अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारे संशोधन समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जारी केलेल्या अल्कोहोलच्या आरोग्य धोक्यांवरील ताज्या माहितीतून हे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. या ताज्या माहितीनुसार, अल्कोहोल असलेले सर्व पेये, जसे की रेड आणि व्हाईट वाईन, बिअर आणि व्हिस्की वैगेरे कर्करोगाचा (कॅन्सर) धोका वाढवतात.

अमेरिकेत दरवर्षी सुमारे 20 हजार रुग्णांचा अल्कोहोलशी संबंधित कर्करोगाने मृत्यू होतो. याच्या 25पट म्हणजे पाच लाख 22 हजार जणांना अल्कोहोलमुळे कर्करोगाची लागण होते. यात तीन लाख 67 हजार महिला अन् एक लाख 55 हजार पुरुषांचा समावेश असल्याचे 2021मधील डेटा विश्लेषणातून समोर आले आहे. प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध असलेल्या अमेरिकेतील ही आकडेवारी हादरवून टाकणारी आहे. अमेरिकेवर योग्य आरोग्यसेवा उपलब्धता नसलेल्या आणि लवकर रोग निदान न होणाऱ्या देशांमध्ये तर ही संख्या कित्येकपटींनी अधिक आणि भयावह असू शकेल.

अमेरिकेतील ताज्या अधिकृत माहितीवरून असेही दिसून येते की, तोंड, घसा (फॅरिंक्स), स्वरयंत्र (लॅरिंक्स), अन्ननलिका, मोठे आतडे (कोलन), गुदाशय (रेक्टम), यकृत (लिव्हर) आणि स्तन हे सात प्रकारचे कर्करोग अल्कोहोल सेवनाने बळावतात. याशिवाय, अल्कोहोल सेवन हे स्वादुपिंड (पॅनक्रियाटीक), जठर (स्टमक) आणि पौरूष ग्रंथी (प्रोस्ट्रेट) या अन्य तीन प्रकारातील कर्करोगालाही अभ्यासांमध्ये इतर तीन कर्करोगांचादेखील निमंत्रण देणारे असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांमध्ये अल्कोहोलशी संबंधित कर्करोगांची सर्वाधिक संख्या कोलोरेक्टल कर्करोग आहे तर महिलांमध्ये स्तन कर्करोग आहे.

कॅम्पेन टू सेव्ह अर्थ नाऊचे मानद संयोजक भरत डोगरा यांनी विस्तृतपणे अल्कोहोल सेवन आणि कर्करोगाच्या संबंधांचे विश्लेषण केले आहे. डोगरा यांच्या अलीकडील पुस्तकांमध्ये प्रोटेक्टिंग अर्थ फॉर चिल्ड्रन, प्लॅनेट इन पेरिल, अ डे इन 2071 आणि मॅन ओव्हर मशीन यांचा समावेश आहे. त्यांचा दावा आहे की, आरोग्य आणि अल्कोहोलवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी मद्यपानामुळे सुमारे 30 लाख मृत्यू  होतात. याच अहवालात असे निदर्शनास आणून दिले गेले आहे की, अल्कोहोलचा हानिकारक वापर 200हून अधिक आजार आणि दुखापतींचे मुख्य कारण आहे. यात सर्वात लक्षणीय म्हणजे अल्कोहोल अवलंबित्व (दारूचे व्यसन जडणे), यकृत सिरोसिस, कर्करोग आणि अन्य अंतर्गत दुखापतींचा समावेश आहे. अल्कोहोल सेवनामुळे क्षयरोग आणि एचआयव्ही/एड्ससारख्या संसर्गजन्य रोगांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

जागतिक हिंसाचार आणि आरोग्य अहवाल (WRVH) म्हणतो की, मद्यपान हे नैराश्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. अधिक भयानक म्हणजे WRVH अहवालात म्हटले आहे की, मद्यपान आणि ड्रग्जचे सेवनदेखील आत्महत्त्येच्या वाढत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावते. अमेरिकेतील एकूण सर्व आत्महत्त्यांपैकी किमान एकचतुर्थांश आत्महत्त्यांमध्ये मद्यपान हे मुख्य कारण असल्याचे नोंदवले जाते. म्हणूनच ब्रिटनने मद्यपानाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केले आहेत. केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर इतर देशांमध्येही मद्यपानाच्या बहुआयामी धोक्यांविरुद्ध प्रचारकांना त्याची मोठी मदत होत आहे. ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डेम सॅली डेव्हिस यांनी मद्य उद्योगातील लॉबिस्ट्सच्या अनेक विरोधांवर मात करून दोन दशकांपूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आमूलाग्र बदल केला. यात मद्याचे आरोग्यधोके कमी लेखले गेले होते, तर लॉबिस्ट आणि मद्य विक्रेत्यांनी पसरवलेल्या काही आरोग्य फायद्यांच्या (उदाहरणार्थ रेड वाईनच्या संदर्भात) काल्पनिक दाव्यांचे स्पष्टपणे खंडन केले गेले होते.

1970च्या दशकापासून ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या वयोगटातील लोकांमध्ये यकृताच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 500 टक्के वाढ झाल्याच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. रेड वाईनसह दारूशी संबंधित विविध कर्करोगांच्या वाढत्या जोखमीच्या पुराव्यांसह आणखी एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे.  ब्रिटनमधील कर्करोगजन्यतेवरील समितीच्या नवीन पुनरावलोकनाद्वारे दारू आणि विविध प्रकारच्या कर्करोगांमधील जवळच्या संबंधांबद्दलच्या पुराव्यांचे समर्थन करण्यात आले. नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या विकासाचे अध्यक्षपद लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमधील पब्लिक हेल्थ इव्हॅल्युएशनचे प्रोफेसर प्रो. मार्क पेटीक्रू आणि ग्लासगो विद्यापीठातील प्रो. एमेरिटस प्रो. सॅली मॅकिन्टायर यांनी भूषवले.

मद्यसेवनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दोन दशके जुनी मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. त्यात असा इशारा देण्यात आला आहे की, कोणत्याही पातळीचे अल्कोहोल प्यायल्याने विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही स्पष्ट केले आहे की, गरोदरपणात कोणत्याही पातळीचे अल्कोहोल पिणे सुरक्षित नाही. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, कालांतराने नियमितपणे मद्यपान केल्याने कर्करोग, स्ट्रोक, हृदयरोग, यकृताचे आजार आणि मेंदू तसेच मज्जासंस्थेचे नुकसान यासह विविध आजार होऊ शकतात. दुसरीकडे, या मार्गदर्शक तत्त्वांमधून हेदेखील स्पष्ट होते की, आरोग्यासाठी मद्यपानाचे कोणत्याही कारणास्तव समर्थन करता येणार नाही.

Continue reading

का होतोय निरोगी आणि तरुण भारतीयांचा अचानक मृत्यू?

गेल्या काही काळापासून, निरोगी आणि तरुण भारतीयांच्या, विशेषतः तिशी आणि चाळीशीत असलेल्यांचा अचानक कोसळून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या बातम्यांपासून ते व्हायरल व्हिडिओंपर्यंत, या घटनांनी आपल्याला हादरवून सोडले आहे. जेव्हा आपण...

‘धुरंधर’मधले रहमान डकैतचे ‘ल्यारी’, जिथे फक्त रक्त भळभळते!

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमधील कराची शहरातील 'ल्यारी' या वादग्रस्त भागाला आणि तेथील रहमान डकैत आणि एसपी...

काय आहे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे?

कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात...
Skip to content